“शिक्षकांचे न्याय मागण्यासाठी जळगावच्या महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची महत्त्वाकांक्षी मोहीम: जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन”
![]()
“शिक्षकांचे न्याय मागण्यासाठी जळगावच्या महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची महत्त्वाकांक्षी मोहीम: जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशांन्वये आज संपूर्ण राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देऊन एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचण्यासंदर्भात विनंती केली. या शिष्टमंडळात प्रा. सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक) प्रा.प्रदीप पाटील, प्रा.गजानन वंजारी,डॉ.अतुल इंगळे (उपाध्यक्ष), प्रा.धनराज भारुडे (जिल्हा कार्यकारणी सदस्य), प्रा.सुधाकर ठाकूर (अध्यक्ष जळगाव ग्रामीण), प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष), प्रा.अनिता ओवाळ (उपाध्यक्ष जळगाव महानगर),प्रा.राजेश कोष्टी (सचिव महानगर) यांचा समावेश होता. याचबरोबर आज संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार महोदयांना देखील निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनामध्ये वाढीव पदांवर कार्यरत शिक्षकांचे तसेच आय.टी.विषय शिक्षकांचे मान्यता देऊन त्वरित समायोजन करण्यात यावे, अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षकांना 14ऑक्टोबर 2024रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशानुसार जाहीर झालेला वीस टक्के वाढीव टप्पा लागू करण्यात यावा,10,20,30 आश्र्वसित प्रगती योजना शिक्षक संवर्गास लागू करण्यात यावी, ग्रामीण व शहरी भागातील कला शाखेच्या विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी या व अशा अनेक समस्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. शासनाने आजवर कुठल्याही मागणीची पूर्तता न केल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने किमान आता तरी आम्हास न्याय द्यावा या भावनेने संपूर्ण राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार,जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाधिकारी मा. जिल्हाधिकारी महोदयांना निवेदने देण्यात आलेली आहे.

