शिक्षणगाथा:* *ललित पाटील,* चलभाष क्र.९२०९५१६५३५ *सेवा सहयोगातून होतोय शाळांचा कायापालट!*
![]()
*शिक्षणगाथा:*
*ललित पाटील,*
चलभाष क्र.९२०९५१६५३५
*सेवा सहयोगातून होतोय शाळांचा कायापालट!*
समाजातील विविध समस्यांवर मात करून एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांचे उद्दिष्ट समाजातील दुर्बल,वंचित आणि गरजू घटकांना मदत करून त्यांचे जीवनमान सुधारण्याचे असते.अशा संस्थाद्वारे विविध क्षेत्रात कार्य केले जाते.
समाजसेवेची बांधिलकी जपून सामाजिक न्याय,समता आणि स्वालंबन यांना प्रोत्साहन देतात.अशा संस्थांचे कार्य हे समाजाच्या विकासासाठी आवश्यक असून त्या समाजातील परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन ठरतात.अशा संस्थांचे योगदान अतुलनीय असते.असेच पालघर जिल्ह्यात ‘वाडा’ सारख्या दुर्गम,बहुल आदिवासी भागातल्या तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्माण करण्याचे खऱ्या अर्थाने कार्य करीत असेल;तर ती संस्था म्हणजे मुंबईतील सेवा सहयोग फाउंडेशन होय.
सेवा म्हणजे निरपेक्ष चाकरी,मदत,परोपकार.
सहयोग म्हणजे सहकार्य,साथ.
‘मानवसेवा हिच ईश्वरसेवा’!ही भावना डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे.
ही स्वयंसेवी संस्था कॉर्पोरेट क्षेत्रातील सामाजिकदृष्ट्या जागरूक व्यावसायिकांनी समाजातील संघर्षशील आणि महत्वाकांक्षी घटकांमधील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने सन २००९ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली.
‘थोडा उजेड ठेवा,अंधार फार झाला, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला.
आले चहू दिशांनी तूफान विस्मृतीचे, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला’.
या काव्यपंक्तीचा प्रत्यय संस्थेच्या
बोधचिन्हात दिसून येतो.
एक जळणारा दिवा हातात दाखवला आहे,जो परोपकार आणि समाजसेवेचे प्रतीक आहे.ज्यातून समाजातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा होऊन गरीब,वंचितांचे जीवन प्रकाशमान होईल.असा हेतू असावा.
संस्थेचे १७ शाश्वत विकास ध्येयावर पाऊलं टाकत शिक्षण,सक्षमीकरण व पर्यावरण या तीन प्रकल्पावर संस्था काम करीत आहे.
१६० सदस्य संख्या असलेल्या मजबूत समूहाचे कार्य आज संपूर्ण भारतात सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी आवश्यक घटकांपैकी एक म्हणजे ते शिकत असलेले वातावरण, जेवढे सकारात्मक आणि आनंददायी तितकं त्याची शैक्षणिक प्रगती चांगली होईल.
ज्या शाळांमध्ये मूलभूत भौतिक सुविधांचा अभाव आहे.अशा शाळांमध्ये ‘शिक्षा विकास’ काम करते.
यात वाडा तालुक्यातील बा. य.पाटील विद्यालय,असनस,बा.ल. शिंगडा विद्यालय,पोशेरी, विद्या मंदिर,आंबिटघर,माध्यमिक विद्यामंदिर व आ.ल.चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालय,तुसे,न्यू.इंग्लिश स्कूल,सोनाळे आदी शाळांच्या इमारतीचे नूतनीकरण,विविध शाळांना प्रयोगशाळा,क्रीडा साहित्य वितरण,ग्रंथालयासाठी पुस्तके,इयत्ता दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेकरिता कृतिपत्रिका व उत्तरपत्रिका उपलब्धता,स्वछतागृहे,शुध्दपाणी सयंत्र व सोलर पॅनल,हेल्मेट वितरण करण्यात आलेत.
राज्यातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांना ‘स्कूल किट’योजनेंतर्गत शालेय दप्तरे व शैक्षणिक साहित्य दरवर्षी पुरविले जातात.
गरीब,वंचित व शिक्षणाचा अभाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘समुत्कर्ष अभ्यासिका वर्ग ‘संस्थेने सुरू केलेत.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पाठ्यपुस्तके आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करू शकत नाहीत.अशा विद्यार्थ्यांना ‘पुस्तक पेढी’ योजनेखाली पुस्तके उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
‘किशोरी विकास’ प्रकल्प अंतर्गत झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना भेडसावत असणाऱ्या समस्यांचे निराकरण व शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन संस्था करत असते.
‘विद्यार्थी विकास’ व ‘विद्याश्रय योजनेत’ समाजातील गुणवत्ताधारक आणि क्षमता असलेले अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षण घेता येत नाही.अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
‘फिरती प्रयोगशाळा’च्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमावर आधारित दुर्गम भागातील शाळांमध्ये विज्ञान प्रायोगिक शिक्षण देण्यात येत आहे.
तसेच महिला सक्षमीकरण उपक्रमाद्वारे स्रियांना स्वयंरोजगार मिळवून देणारे कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.
सामाजिक नेतृत्व विकास,मोबाईल सायन्स लॅबोरेटरी, संजय हेगडे स्पोर्ट्स अकॅडमी, ग्रामीण विकास,राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान,पर्यावरण जागृती,वृक्षारोपण,निर्मल वारी,जलसंधारण असे विविध उपक्रम राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, धाराशिव व लातूर जिल्ह्यात व इतर राज्यात संस्थेद्वारे राबविले जात आहेत.
या स्वयंसेवी संस्थेला मुंबईतील मोतीलाल ओसवाल फाउंडेशन यासारख्या देशातील अनेक स्वयंसेवी संस्था त्यांच्यासोबत काम करीत आहेत.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या सेवा सहयोग फाउंडेशनच्या मुख्य व्यवस्थापक दीपालीताई देवळे,प्रकल्प प्रमुख राम रोकडे, मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या अमिता चौरसिया, वाडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नरेश राऊत,सचिव दिलीप पाटील,गोपीनाथ अहिरे सर यांच्या अतोनात प्रयत्नातून
तालुक्यातील शाळांचा कायापालट होतो आहे.ही अभिमानास्पद बाब आहे.
शेवटी कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात,
‘देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’ ।।
*लेखक मराठी भाषा विषयाचे गाढे अभ्यासक,साहित्यिक व संशोधक आहेत.*

