ममता विद्यालयाची २५ वर्षांची आठवण: माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!**
![]()
**ममता विद्यालयाची २५ वर्षांची आठवण: माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित ममता विद्यालयातील नऊ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका माधुरी शुक्ल यांनी रविवारी २५ वर्षांपूर्वी शाळा सोडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. या अनोख्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद वैद्य उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याची सुरुवात ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देताना आणि मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाळेतील शिक्षिका माधुरी शुक्ल, मंगला पुराणिक आणि इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे जीवन स्वावलंबी व आनंददायी झाले आहे.
तब्बल २५ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर आनंद स्पष्ट दिसत होता. शालेय जीवनाच्या आठवणींमध्ये रमलेल्या सर्वांनी एकमेकांचे सुख-दुख ऐकता ऐकता भावनिक क्षण अनुभवले. विवेक शिरसाठ यांनी पसायदानाचे गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या मेळाव्यात ११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, ज्यात गप्पागोष्टी, गाणी आणि कविता यांचा समावेश होता. मेळव्यात सामील झालेल्या सर्वांनी मिळून राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचा समारोप मधुकर शुक्ल यांनी सर्वांचे आभार मानून केला. नंतर सर्व उपस्थितांनी सुर्रुची भोजनाचा आस्वाद घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आल्या. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मनीषा वैद्य, रवींद्र चौधरी, मोर्विका वैद्य यांचे विशेष योगदान होते.
हा कार्यक्रम ममता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आपल्या आठवणींमध्ये इंद्रधनुष्याचे रंग भरणारा ठरला, आणि त्यांच्या मैत्रीचा बंध अजून दृढ झाला.

