शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्ञानाचा उत्सव
![]()
शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्ञानाचा उत्सव
अमळनेर प्रतिनिधी
पूज्यश्री सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी वाय चौधरी हायस्कूल आणि हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आज राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर आर पाटील यांनी भूषवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभात विज्ञान शिक्षक एन आर जैन यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी शास्त्रज्ञ सी व्ही. रमण यांचे २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रात झालेले संशोधन आणि त्या संशोधनाला १९३० मध्ये मिळालेला नोबेल पुरस्कार यावर प्रकाश टाकला. हे संशोधन अद्यापही विज्ञानातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे.
कार्यक्रमात बॉम्ब शोध पथक, नार्को टेस्ट, आणि कर्क रोगाचे शेल्स शोधण्यासाठी रमन इफेक्टचा कसा वापर केला जातो, याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. उपशिक्षक पी आर पवार यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून कृषी व शिक्षण क्षेत्रात विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याविषयी माहिती दिली आणि मोबाइल क्रांतीच्या फायदे-तोटे विशद केले.
विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना विज्ञानाच्या अंगाने विचारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जोया अन्वर खाटीक, आरसीन युनूस मणियार, धनश्री दिनेश चौधरी, रूपाली विनोद पाटील आणि अन्य विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचे सुंदर शब्दात व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रथमेश गणेश जगदाळे (इयत्ता पाचवी), कुंजल श्रीकांत चव्हाण, तेजस्विनी योगेश पाटील आणि ललिता मल्हार भिल (इयत्ता सातवी) या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले, ज्यामुळे सर्वांच्या मनात विज्ञानाविषयी अधिक जिज्ञासा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व उपस्थितांचे आभार मानले गेले. हा उत्सव विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या महत्त्वाची जाणीव करून देत नवे विचार साकार करण्यासाठी प्रेरित करतो. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..


