थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.*
1 min read

थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.*

Loading

*थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.*

जळगांव प्रतिनिधी
माझे मित्र भटकन या कादंबरीचे लेखक रवींद्र सोनवणे यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या लेखन कौशल्याचा वापर करीत अस्सल ग्रामीण बोली भाषेत भटकन कादंबरीचे लेखन केले. तसं त्यांचे आणि माझे गाव एकच. आम्ही दोघेही धानोरा या गावाचे रहिवासी. आम्ही एका वर्गात नसलो तरी लहानपणापासून आम्ही चांगले मित्र आहोत. दुसरे म्हणजे लेखक ज्या चिंचेच्या झाडाखाली सांधनं शिवण्यासाठी दुकान मांडत असत त्या शेजारीच आमचे सलून ची टपरी होती.
ज्या वयात मित्रांसोबत खेळायचे, हिंडायचे, फिरायचे, मौज मस्ती करायचे. त्या लहान वयातच जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी लेखकाला याच चिंचेच्या झाडाखाली बूट पॉलिश पायदान सांधण्याचे काम करावे लागे. जसा वेळ मिळाला तसा शाळेचा अभ्यास पूर्ण करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास लेखकाला कोवळ्या वयातच आला होता.
लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने सुरुवातीला लहान-सहान कविता करायचे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी वर्तमानात जगणारी हृदयाला भिडणारी मनाला एक विलक्षण आनंद देणाऱ्या अनेक कवितांचे लेखन केले होते. अशातच रवींद्र सोनवणे यांनी भटकन कादंबरीचे लेखन केल्याचे सांगितले. त्यावेळीच मला त्यांच्या या नवीन साहित्या विषयी उत्सुकता होती. मला मनोमन वाटत होते की या कादंबरीत काहीतरी खास असणारच आणि ती इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण झाली. लेखकाने प्रस्तुत साहित्यात अस्सल ग्रामीण बोली भाषांचा म्हणजे तावडी बोली, लेवागण बोली, खान्देशातील अहिराणी बोली, गावगाड्यातील हिंदी बोली, मराठी बोली भाषांचा चपखल वापर करीत दर्जेदार लेखन केले आहे. त्यामुळे या कादंबरीला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. असे माझे स्पष्ट मत झाले आहे.
जसं जसं कादंबरीचे वाचन करीत गेलो तसं मन तीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात रमून गेले. कादंबरीत वर्णन केलेले आमच्या धानोरे गावाचा परिसर, शाळा, चिंचेचे झाड, समोर असलेलं मारुतीरायाचे मंदिर, बाजूला असलेले भागवत भाऊची चहाची दुकान, लगतच असलेली पान टपरी, शेतातून दमून भागून येऊन चिंचेच्या त्या झाडाखाली गर्द सावलीत निवांत चहाचा फुरका मारून हळूच वीडीचा झुरका मारत निघणाऱ्या धुराकडे हरखून बघत आपला दिवसभराचा शीण घालवणारे शेतकरी व मजूर असा सर्व भूतकाळ आठवण्याचे कारण म्हणजे लेखकाने केलेलं गावचे वर्णन आणि उभे केलेले प्रसंग. हे आपणास वाचूनच भावनिक करणारे आहे.
लहानपणापासून ते महाविद्यालय शिक्षण व नोकरी पर्यंतचा प्रवास अत्यंत कुशलतेने त्यांनी मांडला आहे. लेखकांचे काका पंढरी, नईम शेठचे सायकल दुकान अजूनही नजरेच्या कप्प्यात भरून आहेत. मावशीकडे कामासाठी जाणे त्यानंतर तिथला परतीचा प्रवास, माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांशी असलेला लळा, बहिणीच्या लग्नासाठी बकरी विकल्यानंतर झालेली जीवाची घालमेल बहिणीच्या सासरी जाऊन बहिणीची भेट घेण्याची आतुरता यावरून कवी मनाच्या लेखक मित्राचे करुणामय हृदयाचे दर्शन होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक प्रकारची कामे करून उच्च शिक्षण पूर्ण केले फी भरण्यासाठी पैसे नसताना उच्चपरा कोटीचे ध्येय उराशी बाळगून बी.एड पूर्ण केले. शिक्षक म्हणून नामांकित संस्थेत नोकरीची सुरुवात केली. या सर्व घटना वाचताना मन हरखून जाते.
शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या परिस्थितीत जन्माला येऊन त्या परिस्थितीशी दोन नाही तर चार हात करून कुटुंबाची जबाबदारी लिलीया पेलत आपल्या कुटुंबाला नातेवाईकांना समाजाला आधार देताना शिक्षणाचे महत्व अधोरेखित करीत रवींद्र सोनवणे यांचे जीवन म्हणजे एक यज्ञच ठरतो यात शंका नाही. या कादंबरीच्या निमित्ताने मित्र रवींद्र सोनवणे यांचे मी पुन्हा अभिनंदन करतो व यापुढे त्यांच्या लेखणीतून अधिकाधिक सशक्त व उत्तमोत्तम साहित्य निर्मिती साकार होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

 

कादंबरी – भटकन
लेखक- रविंद्र भास्कर सोनवणे
धानोरा.ता.चोपडा
मुखपृष्ठ – सरदार जाधव
पाने-120
किंमत- 230
प्रकाशन – जेके मिडिया ठाणे.

समिक्षा – सुनील आत्माराम महाले.
सहाय्यक.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि जळगाव.
मो.नं. 9420943874

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *