मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न… छ.शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील
![]()
मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न…
छ.शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव : तालुक्यातील मुसळी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित शिव जयंती सोहळ्यातील चौथ्या दिवशी लक्ष्मणराव पाटील यांचे शिवव्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिशय बहारदार शैलीत नितीन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प.सदस्य गोपाल चौधरी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. विष्णू रामदास गुंजाळ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराने- धुळे) रावेर येथील कृषी अधिकारी एल.ए.पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख मोहन हरी पाटील, माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार आबासाहेब वाघ धरणगाव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वल करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पुजनाने झाली. तद्नंतर आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर रावेर येथील कृषी अधिकारी एल.ए. पाटील यांनी जल, जमीन, जंगल, जनता आणि जनावरे यांच्या बाबतीत शिवरायांचे बेजोड नियोजन असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी भारताच्या इतिहासातील छ.शिवरायांचे तेजस्वी चरित्र आजही सगळ्यांचा अंतःकरणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होवून राहिले आहे. सद्यस्थितीत छत्रपतींचा विरगाथेचा आदर्श संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिला आहे. शिवरायांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मनोगत श्री. गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी यांनी गावाच्या एकतेची स्तुती केली त्याचप्रमाणे शिवविचार डोक्यात रुजावा या उद्देशाने शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित शिवसप्ताह कार्यक्रमाची स्तुती केली. मुख्य व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी ‘छत्रपती शिवरायांचे’ तेजस्वी रूप, जीवनशैली, मॅनेजमेंट स्किल, शिवनिती, पराक्रम, प्रेरणादायी चरित्र आठवून एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ज्यामुळे सर्व जाती-धर्मात माणुसकी टिकून राहील व आपल्या भारत देशात आनंदमय सुखमय वातावरण दिसेल, पुढे सांगितले की, महाराजांसारखे दिसण्यापेक्षा महाराजांचा एक जरी गुण अंगीकारला म्हणजे आयुष्याचे सार्थक होईल. यांसह शिवरायांकडे सुसंस्कार, नीतिमत्ता, युद्धशास्त्र, राजकारण, न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार, राज्यव्यवस्था याबाबतीत महाराज पारंगत होते. महाराज केवळ एक युद्धकुशल योद्धे नव्हते तर ते एक उत्कृष्ट प्रशासक, दूरदृष्टीचे नेते,आणि एक प्रेरणादायी पराक्रमी व्यक्तिमत्व होते. त्यांचा पराक्रमामुळे केवळ मराठा सम्राज्यच नाही, तर संपूर्ण देशाची शान वाढली. तसेच महाराजांचे कष्टमय बालपण, माँसाहेबजिजाऊंनी दिलेले शिक्षण, स्वराज्याची स्थापना, परकीय सत्ता, स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशही सारख्या शक्ती, साम्राज्यविस्तार, तोरणा किल्ल्याला पहिले तोरण, अफजलखान वध, सिंहगड विजय, १६७४ चे दोघंही राज्याभिषेक, अष्टप्रधान मंडळ, शेतकऱ्यांच्या योजना, न्यायव्यवस्था, मावळ्यांना प्रशिक्षण व काळजी, सागरी आरमार, इंग्रज, डच, पोर्तुगीज, आणि इतर परकीय शत्रूंवरच्या हालचाली, त्याचप्रमाणे शिवरायांचे खरे गुरु जिजाऊ माँसाहेब, शहाजीराजे व जगद्गुरु तुकोबाराय हे आहेत. यासोबतच राष्ट्रपिता जोतीराव फुले, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही आपल्या ओघवत्या वाणीतून शिवचरित्र प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुसळीचे पोलीस पाटील नितीन पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट शिवप्रतिज्ञा व जिजाऊ वंदनेने झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती व मुसळीच्या गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

