बारासनी माय, खाटलावर जीव जाय
1 min read

बारासनी माय, खाटलावर जीव जाय

Loading

बारासनी माय, खाटलावर जीव जाय

धुळे येथील साक्री रोडवरील मोतीनाला ते जे. के. ठाकरे कॉर्नर पर्यंत असलेल्या दुभाजकांवरील विजेच्या दिव्याच्या खांबांना असंख्य जाहिरातदार जाहिरातींचा रतिब घालतात. याला पालिकेची परवानगी असेल असं गृहित धरले तरी कालावधीचे बंधन आहे की नाही? विविध राष्ट्रीय किताबांची धनी असलेल्या रोटरी व रोटरॅक्ट क्लबने 10 ऑक्टोबर रोजी संपलेल्या ‘सेव्हर बिल्डकॉन 25’ कार्यक्रमांचे फलक ‘बारा दिवस’ उलटले तरी तसेच लटकलेले आहेत. असंख्य किताबांची मानकरी असलेल्या संस्थेने छटाकभर कामाकडे दुर्लक्ष करावे हे बरे नाही. फलकांचे विद्रुपीकरण झालेले आहे. दुचाकी वाहन-चालकांना वळण घेतांना त्यांच्या लाकडी कांबड्यांचे फटके सहन करावे लागतात. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असे साक्री रोडचे झाले आहे. विद्रुपीकरण करणाऱ्यांना जाब कोण विचारणार? पालिकेने जाहीर केलेल्या तक्रारीच्या नंबरवर फोन करावा तर या नंबरची सेवा तात्पुरती रद्द करण्यात आली आहे असे उत्तर मिळते. पालिकेच्याच एका कर्मचारी बांधवाकडून समजले की, ‘बॅलन्सच’ भरलेला नाही- अब्जावधीची धनी असलेल्या पालिकेकडून एव्हढा ‘कढी खाऊपणा’ कशासाठी? नका जनाचं एैकु पण मनाची तर बाळगा आणि एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी हे लटकणारे फलक हटविण्याची जबाबदारी निश्चित करा. सर्वच घटक बेजबाबदारपणा दाखविणार असतील तर ‘बारासनी माय आणि खाटलावर जीव जाय’ असेच म्हणावे लागेल. पालिकेच्या सभागृहात राणा भिमादेवी थाटात ईशारे देण्याचे कौतुकच आहे पण स्पॉटवरही या आणि विद्रुपीकरण करणाऱ्यांना आपल्या शक्तीचे दर्शन घडवा ही नम्र विनंती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *