महाराजांनी अंतर्बाह्य महान संघर्षातून रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले-ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे
![]()
महाराजांनी अंतर्बाह्य महान संघर्षातून रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले…. ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे
उरुळी कांचन: छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समाजसेवेचे व्रत घेणाऱ्यांना त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व जिज्ञासू अभ्यासक यांना नेहमी स्फूर्तीदायक व चैतन्यमय वाटते. सर्वसामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराज हे स्फूर्तीचा जिवंत झरा वाटतो. शिवाजी महाराज हे महान योगी पावन मनाचे होते व सर्व जगाचे होते. हिंदवी स्वराज्य हे रयतेचे व्हावे यासाठी त्यांनी सर्व जाती धर्मियांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेतले होते. ते अद्वितीय ,शौर्यवान महान रणनीतीकार तर होतेच मात्र त्यांनी कोणत्याही व्यक्तीवर समाजावर ,अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली. त्याचप्रमाणे अधर्माने वागणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. महाराजांच्या जीवनपट उघडताना त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची माहिती अनेक वेळा सांगितले जाते, मात्र त्यांच्या जीवनातील सुख दुःख, हाल अपेष्टा, आजारपण आपण विसरून जातो. महान संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यांना अंतर बाह्य संघर्ष करावा लागला. महाराजांच्या दरबारी अठरापगड जातींबरोबर सर्व धर्मांचे लोक अनेक चांगल्या हुद्द्यावर होते. शिवाजी महाराज हे धर्माचरण करणाऱ्यांचे राजे होते.शिवाजी महाराजांनी महान संघर्षातून रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले असे मत ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथे कल्पतरू बाल मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील,कार्तिक विशाल बाबर, सिद्धी संदीप इंगळे, शौर्य संतोष चौरे, आर्यन मदने, वेदांत आशिष सावंत, हामजा शेख, राहत इनामदार, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल झोपे, अंकुश दळवी याचबरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

