कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्य साधारण महत्व- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू
![]()
कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्य साधारण महत्व- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन
प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो.
अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील यांनी प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे ११ ते १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण क्रमांक ५ ला भेट देताना मार्गदर्शन करतांना विचारले की, “शिक्षकांच्या क्षमतांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, टीकात्मक विचार आणि शिकण्याची आवड निर्माण होते.”
तज्ञ मार्गदर्शक चंद्रकांत साळुंखे, भगवान पाटील, महेंद्र रत्नपारखी आणि श्रीमती संगीता बाविस्कर यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे स्वागत केले.
तज्ञ मार्गदर्शकांनी सांगितले की, या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण) २०२३, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमताधारित मूल्यांकन आणि कार्यनीती, क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया यांसारख्या विषयांचा समावेश आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना अपडेट राहणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रताप हायस्कूलमध्ये होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये पंचायत समितीचे समन्वयक देवेंद्र पाटील आणि प्रमोद पाटील यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले आहे. सर्व प्रशिक्षण वर्गांमध्ये तज्ञ मार्गदर्शक आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

