सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खुडी व माय
![]()
सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खुडी व माय
आमच्या धुळ्याची ओळख ‘खड्डेपुर’ म्हणून सर्वदूर असली तरी ‘नजर’ लागावी असा आमचा साक्री रोड आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण काय कोण जाणे साक्रीरोडवर, पत्रकार भवनाकडे वळण रस्त्यालगत आयकर भवनच्या प्रारंभी दिवंगत पत्रकार अतुलभाई जोशी मार्ग च्या फलकासमोर एक एव्हढूसा काही इंच बाय इंच एक खड्डा आहे. लहान मुले गोट्या कवड्या खेळतात तेव्हढाच त्याचा आकार; परंतु खड्डा म्हणजे चांगल्या रस्त्याला गालबोट म्हणावे की कुणाची नजर लागू नये म्हणून किंवा अहिराणी भाषेत ‘कुईक’ लागू नये म्हणू काळा टिळा तर नसावा? हे सुपर रस्त्याला लागलेले ‘बुथडं’ जवळ गेले तरी दिसत नाही. येथे ड्युटीवर असलेल्या हवलदार दादाला फोटो काढायची विनंती केली तर जवळ जावूनही हे खड्ड त्यांना दिसत नव्हते. माजी आमदार स्व. शंकरराव बापूंचे सुपुत्र पत्रकार कॉलनीतील प्रकाश पाटील यांनी देखील महाप्रयासाने खड्डा शोधून मला फोटो पाठविला पण तो खट्याळ खड्डा सुपर फोटोच येऊ देईना.
परवाची गोष्ट कमलाबाई कन्या शाळेची एक बालिका सायकलने जात असतांना त्या खड्ड्यात आदळली, मी सायकल उभी करून त्या बालिकेला लागलं का बाळ? म्हणून चौकशी केली तर हसतमुखाने ‘नाही बाबा’ म्हणत परत गेली. याक्षणी मला मी चार महिन्याचा असतांना माझे मातृछत्र हरपल्यानंतर वडजाईरोड शिवाजी नगर झोपडपट्टीतील माझे पालनपोषण केलेल्या माझ्या ‘सुंदरमाय’ च्या शब्दांची आठवण आली. खेळत बागडत असतांना पडलो तर सुंदरमाय म्हणायची ‘पडत झडत माल मोठा व्हस’ याची मला आठवण झाली. या चौकाजवळ आज बहाळची काकडी खरेदी करीत असतांना आमच्या यशवंतनगरचे फळविक्रेते सुभाष नानकर माझ्या जवळ आले, काल मोहन मेडीकल जवळचा धोकेदायक खड्डा पालिकेमार्फत जमिनीवर आणला म्हणून माझे अभिनंदन करीत असतांना या खड्ड्याचे भविष्य वर्तविले. तर जवळच फळविक्रेत्या ताईने तेथे झालेल्या अपघातांची जंत्रीचा वर्तमान-भूतकाळच कथन केला. या ताईने खड्ड्यात पडलेल्या अनेक मुलींना उभे करून पाणी पाजले. काही दिवसांपूर्वी एक विवाहिता पायी जात असताना थोडी नजर चुकली आणि खड्डोबाने आपला पराक्रम दाखविला आणि त्या विवाहितेच्या हातातील तांदूळ-दाळीची पिशवी पडली. दाळ, तांदुळ सर्वत्र विखुरले. बिचारी विवाहितेचा मनातला भाव सांगत होता, ‘‘आते सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खूडी व माय’ सध्या परीक्षचे दिवस आहेत. हा खड्डा शोधण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची परीक्षाच आहे. परीक्षेत कॉपी केली तर नवीन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल होतो. उत्तीर्ण व्हायचे असेल तर खड्डा शोध मोहीम राबवावी लागेल; पण हा खड्डा अशा ठिकाणी बसला आहे की पोलीसांच्या हद्दीचे वाद होतात तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्रकार भवनाकडे वळणाऱ्या रस्त्याच्या कडेला हा खड्डा आहे. दोघांच्या हद्दीच्या वादात खड्डेपुराणकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा बाळगतो. अन्यथा जवळच चाळीशीत असलेले आमचे वैभवशाली दिमाखात उभे असलेले पत्रकार भवन आपल्याकडे ताठ उभे राहुन तिरपी नजर ठेवून आहेच याची नोंद घ्यावी.

