“ईन मीन तीन बिघे” रोचक कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय धुळेकर दिलीप भावसार यांच्या लेखणीची जादू कळणार नाही
![]()
“ईन मीन तीन बिघे” रोचक कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय
धुळेकर दिलीप भावसार यांच्या लेखणीची जादू कळणार नाही
पुस्तक-परिचय लेख –
ले.अरुण वि.देशपांडे -पुणे.
————————————–
पारिवारिक महाभारतातील चक्रव्युहाची रोचक गाथा ”
” ईन मीन तीन बिघे ” कादंबरी ,
ले. दिलीप भावसार
—————————————-
सर्वांना नमस्कार ,


माझे जेष्ठ स्नेही श्री.ईश्वरलाल भावसार आणि मी “कुबेर “या समुहातील मित्र आहोत. त्यांनी लेखक दिलीप भावसार लिखित ” ईन मीन तीन बिघे ” ही कादंबरी माझ्याकडे अगत्याने पाठवली. वाचून झाल्यावर या कादंबरीचा परिचय करून देतो आहे. २०२४ मध्ये लेखक दिलीप भावसार यांची “ईन मीन तीन बिघे ” ही २७२ पृष्ठांची कादंबरी आर्ष पब्लिकेशन्स -पुणे यांनी प्रकाशित केली असून. याचे मूल्य- रु. चारशे आहे. मित्र हो- मुखपृष्ठावरील लेखकाचे नाव माझ्यासाठी अनोळखी, अपरिचित असल्यामुळे एवढी मोठी कादंबरी लेखनाची क्षमता असलेल्या या लेखकाबद्दल माझ्या मनात उत्सुकता वाढली होती. पहिल्या निरीक्षणात लेखकाच्या इतर तीन कादंबऱ्या आहेत हे कळाले ..त्या अशा- १. जिव्हार , २.गोबड, ३. जिताड. याहून अधिक आश्चर्य म्हणजे प्रस्तुतच्या कादंबरीत लेखकाबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. ना लेखक परिचय , ना मनोगत प्रस्तावना सुद्धा नाहीये ” यामुळे केवळ लेखन -स्वरूपात लेखक दिलीप भावसार यांची ही आगळी-वेगळी भेट झाली आहे” असे म्हणावे लागेल.
या कादंबरीचे कथानक एकदम वेगळे आहे आणि ही कथा नसून “एका मोठ्या एकत्र कुटुंबाची भावनिक गाथा आहे ” आणि यातील विविध व्यक्तिरेखा , त्याचे सूक्ष्म असे चित्रण आणि भावनांचा कल्लोळ ” यांची तपशीलवार कहाणी लिहून लेखक दिलीप भवसार यांनी ही कादंबरी लक्षणीय केली आहे. ग्रामीण परिसरातल्या शेतीवर आयुष्य जगणाऱ्या यातील परिवाराकडे जमीन आहे ती “ईन मीन तीन बिघे “, परिवारातील व्यक्तीन ऐवजी ही तीन बिघे जमीन ” या कथानकाची खरी नायिका आहे असे वाटेल. कारण पारिवारिक महाभारत घडण्याचे कारण हीच तीन बिघे जमीन आहे. या मोठ्या कुटुंबातील दोन मोठ्या भावांचा मोठा परिवार ..यातील लहान मोठ्या व्यक्तिरेखा ठसठशीत स्वरूपात आहेत हे लेखकाचे मला भावलेले कौशल्य आहे .कथानकाच्या ओघात हे लक्षात ठेवणे खूप कठीण आहे. शहरातील आधुनिक सुखवस्तू जीवन ,आणि जवळच्या ग्रामीण परिसरातील अभावग्रस्त आयुष्य जगणारी माणसे यांचे चित्रण यात प्रभावीपणे आले आहे. बोलीभाषेचा वापर , परिसरातील समाजिक -सांस्कृतिक घडामोडींचे उल्लेख ,आणि परस्पर-स्नेहाची ओढ यातून ही माणसे जोडलेली आहेत अंतरी दुराव्याची भावना मूळ धरते आहे. हा आशय या लेखनाचे पार्श्वसंगीत आहे.
हे दीर्घ कथानक, यातील व्यक्ती, यांच्यात कुठेही विस्कळीतपणा न येऊ देता , सुसांगतपणे ही पारिवारिक गाथा रोचक शैलीत लिहिणे ” याबद्दल लेखक दिलीप भावसार यांचे कौतुक करतो. यातील कथानकाची ढोबळ कल्पना देतो- रामलाल ( मोठे बाबा ) आणि लक्ष्मण (लहान बाबा ) या दोन भावांचा परिवार त्यातील ही मंडळी पहा : १. रामलाल ( मोठे बाबा )- बदलाभाऊ , पन्नालाल , नलू , रतिलाल , आणि- २. लक्ष्मण ( लहान बाबा ) – धानालाल , बदलीताई , सुकलाल , निम्बालाल , बाबुलाल , कमळी , नंदलाल .. यात आणखी एक गम्मत आहे .यातले सख्खे बहिण-भाऊ हे एकमेकांचे चुलत भावंडे आहेत ,वरील नामावलीतील बदला भाऊ आणि बदली ताई दोघे मोठ्या बाबा कडून लहान बाबाकडे , या भावाकडून त्या भावाकडे गेले आहेत , दिले आहेत. या कथानकाचा निवेदक आणि नायक म्हणून आपल्या लक्षात राहतो तो यातील निम्बालाल , तोच आपल्याला कादंबरीत प्रत्येक प्रसंगात भेटतो , बोलतो , खूप काही सांगतो . वरील सगळ्या भावांचे स्वतंत्र पारिवारिक जीवन आहे. यातील सगळ्यांना शिक्षणाची ओढ आहे, त्याचे महत्व कळालेले आहे. पण परिस्थिती आणि मनस्थिती या दोन्हीमुळे काही भावांना गाव सोडून बाहेर पडता आलेले नाहीये. शेतीत सर्वांचे भागत नाही म्हणून छोटी मोठी दुकानदारी करणारे हे भाऊ संसार चालवतात. या सर्वांच्या मनाचा कोंडमारा हरघडी व्यक्त करणाऱ्या व्यक्ती यात आहेत. यातील निम्बालाल आणि नंदलाल उर्फ नंदू .. हे दोन भाऊ रीतसर शिक्षण घेऊन शहरात रहाणारे नोकरदार आहेत आणि इतर भावांच्या मनाने सुखवस्तू आयुष्य जगत आहेत . या दोन्ही भावांचे परिवार एकत्र आहेत. ईन मीन तीन बिघे जमीन ” विकायची की नाही ? या प्रश्नावर” विकायचीच नाही “यावर एकमत आहे आणि , विकावी ,काय हरकत आहे ” याला काहींची मनातून आणि उघडपणे सहमती पण आहे. यातील निम्बालाल आणि नंदू हे दोन भाऊ आपल्या परिवाराचे हे भावनिक वैभव , ही ईन मीन तीन बिघे जमीन टिकवण्यासाठी जी धडपड करतात , ती एका अर्थाने “पारिवारिक महाभारताची लढाईच आहे ” ही भावना निम्बालाल साखरे, एका हतबल, हताशक्षणी व्यक्त करतो. या पारिवारात एकाच वेळी शीत युद्ध आहे, आणि छुपे यद्ध खेळले जाते आहे. याची कहाणी सांगणारा निंबालाल परिवाराचा हितचिंतक आहे, बेबनाव होऊ नये, बेदिली होऊ नये यासाठीची त्याची धडपड भावनिक करून जाते. या ‘ईन मीन तीन बिघे’ जमिनीचे काय होते ?हे जरूर जाणून घ्यावे असे आहे. कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय लेखक दिलीप भावसार यांच्या लेखणीची जादू कळणार नाही. एका वेगळ्या भाव-विश्वाचे सखोल,सूक्ष्म भावनिक पारिवारिक “महाभारत ” आपल्याला अंतर्मुख करते.
लेखक दिलीप भावसार यांना लेखन शुभेच्छा.
****
– अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342


