इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा केंद्रांसाठी घोषित केंद्रसंचालक,पर्यवेक्षक नियुक्ती निर्णय रद्द करा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) पदाधिकारी यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
![]()
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा केंद्रांसाठी घोषित केंद्रसंचालक,पर्यवेक्षक नियुक्ती निर्णय रद्द करा
माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) पदाधिकारी यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक संबधीत व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचा-यांमधून करण्या बाबतची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष यांना दिले आहेत.
राज्यातील बहुतांश शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रामध्ये मुख्याध्यापकच केंद्रसंचालक म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. परीक्षा कालावधीत बोर्डाच्या वतीने शाळेतील शिक्षकांना तपासणीसाठी येणा-या उत्तर पत्रिका सोडवून घेणे व त्यांची कस्टडी देखील मुख्याध्यापक यांच्याकडेच असते व त्या विहीत कालावधीत मुख्याध्यापकांच्या नियंत्रणात शाळेतच उत्तरपत्रिका तपासून नियोजित ठराविक कालावधीतच तपासून घेण्याची जबाबदारी देखील मुख्याध्यापकांवर असते. यामुळे केंद्राव्यतिरिक्त केंद्रसंचालक (मुख्याध्यापक) पर्यवेक्षक संबधीत व्यक्तीची नियुक्ती झाल्यास सदर केंद्रावर परीक्षा कालावधीत अनेक अडचणी निर्माण होतील व परीक्षे दरम्यान गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजपर्यंत राज्यामध्ये सर्वच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक (मुख्याध्यापक) यांनी आपल्याच केंद्रात राहून यशस्वीरित्या परीक्षा पार पाडलेल्या आहेत. पण अचानक मंडळाने मुख्याध्यापकांवर गैरविश्वास दाखवून त्यांची केंद्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे ही गंभीर बाब आहे
शासनाने शालांत परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी या प्रक्रियेतील सहभागी सर्वंकष घटकांचा अभ्यास करून त्यांचे विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे केली पाहिजे.मात्र मूळ कारणांचा शोध न घेता परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी नियुक्त शिक्षक पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे “आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी!” या थाटाचा असल्याने निरूपयोगी व हास्यास्पद आहे.
शिवाय या निर्णयातून जणू “शिक्षक पर्यवेक्षक” हेच परीक्षेतील “कॉपी” गैरप्रकारांस जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे परिक्षा मंडळाकडून/शासनाकडून ध्वनित होत असल्याने शिक्षकांच्या सामाजिक प्रतिष्ठेस गालबोट लावण्याचा निंद्यप्रकार आहे.
म्हणून परीक्षा मंडळाने शिक्षकांवर अविश्वास व्यक्त करणारा सदर निर्णय तातडीने रद्दबातल करावा अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ-फेडरेशन गांभीर्यपूर्वक करीत आहे.
सदर निर्णय रद्द न केल्यास संघटनेस या निर्णया विरूद्ध आंदोलन करावे लागेल व त्याची पुढील परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शालांत परीक्षा मंडळाची राहील
असे ज्ञानेश्वर कानडे अध्यक्ष व सचीव शालिग्राम भिरुड महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन) यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

