टार्गेट पब्लिकेशन्सच्या ‘संपर्क’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या भवितव्यासंबंधी प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन
![]()
टार्गेट पब्लिकेशन्सच्या ‘संपर्क’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या भवितव्यासंबंधी प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन
चिपळूण, २३ डिसेंबर, २०२४: टार्गेट पब्लिकेशन्स प्रा. लि. द्वारे चिपळूण येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या भविष्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी ‘संपर्क’ उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील ५० हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ या सत्रात सक्रियपणे सहभागी झाले होते. सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या एनईपी समन्वयक आणि सहा. प्राध्यापिका डॉ. हेमा भादावकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेले हे चर्चासत्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ला अनुसरून शिक्षणक्षेत्राच्या भवितव्याबद्दल सखोल चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. हेमा भादावकर यांच्या सखोल आणि ज्ञानवर्धक सत्राने झाली. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० आणि त्यातील प्रमुख पैलूंचा आढावा दिला. या सत्रात प्रामुख्याने प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठीची धोरणे, समग्र आणि परस्परसंवादी अभ्यासक्रम रचना, सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण, संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन आणि शालेय शिक्षणासाठी मानके निश्चित करणे यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यांनी आपल्या अनुभवातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची व्यावहारिक उपयुक्तता आणि त्याची परिवर्तनीय क्षमता समजावून सांगितली.
कार्यक्रमादरम्यान आपला उत्साह व्यक्त करताना डॉ. हेमा भादावकर म्हणाल्या, “प्राचार्यांचा सक्रिय सहभाग आणि प्रतिसाद खरोखरच प्रोत्साहन देणारा होता. टार्गेट पब्लिकेशन्सच्या या ‘संपर्क’ उपक्रमात सहभागी होणे, हे माझे सौभाग्य होते. भविष्यातही टार्गेट पब्लिकेशन्सच्या सहयोगाने अशा अभिनव उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, अशी मी आशा करते.”
टार्गेट पब्लिकेशन्सचे कार्यकारी संचालक श्री. सचिन कोडोलीकर यांनी सर्व प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांचे त्यांच्या उपस्थितीसाठी आभार मानले. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने डॉ. भादावकर यांनी दिलेली सर्वसमावेशक माहिती या सत्रासाठी फार मोलाची ठरली. एनईपी २०२० विषयीच्या आपल्या विविध शंकांचे नक्कीच समाधान झाले असेल, परिणामी सर्व सहभागी सदस्यांना आपापल्या संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अधिक प्रभावीपणे लागू करण्यास नक्कीच साहाय्य होईल, अशी आम्हाला खात्री आहे.” असे श्री. कोडोलीकर म्हणाले.
शैक्षणिक क्षेत्रातील संवाद आणि विकासाला चालना देण्यासाठी टार्गेट पब्लिकेशन्स वचनबद्ध असून त्या अनुषंगाने ‘संपर्क’ उपक्रम हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

