प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार
1 min read

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार

Loading

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. रमेश माने यांनी मराठीतील सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. शॉल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच त्यांना गडचिरोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला धाराशिव येथील युगप्रवर्तक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार लाभला आहे.
प्रा. डॉ. रमेश माने यांनी ‘निवडक दहा कथा : आशय आणि स्वरूप’, म. सु. पगारे लिखित बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’, संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ इत्यादी ग्रंथांचे संपादन केले आहे. तसेच अलीकडेच त्यांनी अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले आहे. शिवाय यापूर्वी त्यांनी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अक्षरपेरणी’ या नियतकालिकेचे काही काळ सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे साहित्य, शिक्षण व विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *