“समता वैश्विक होण्यासाठी वंजारी साहित्यिकांनी लेखणी कृती रूप करावी संमेलनाध्यक्षा- प्रा.डॉ.संगीता घुगे”
1 min read

“समता वैश्विक होण्यासाठी वंजारी साहित्यिकांनी लेखणी कृती रूप करावी संमेलनाध्यक्षा- प्रा.डॉ.संगीता घुगे”

Loading

“समता वैश्विक होण्यासाठी वंजारी साहित्यिकांनी लेखणी कृती रूप करावी संमेलनाध्यक्षा प्रा.डॉ.संगीता घुगे”

जळगाव प्रतिनिधी: समाज आणि देश सशक्तीकरणात साहित्यिकांचा सहभाग पूर्वापार राहिला आहे या सशक्तीकरणाचे मूळ हे समतेत असून वर्तमानासह उज्वल भविष्याला समतेचा मंत्र गरजेचा व आवश्यक झालाय.म्हणूनच वंजारी समाजाचे हे प्रस्तुत चे साहित्य संमेलन आयोजनाचे दमदार पाऊल आहे .ही सकारात्मकता प्रतिभावंतांनी समाजमनात पेरण्यासाठी आपली लेखणी परजावी असे आवाहन प्रा.डॉ.संगीता घुगे यांनी उपस्थित समाज बांधवांसमोर केले त्या वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे उपस्थित जनसमुदायासमोर संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी वाङ्मय इतिहासाचे संदर्भ उलगडत त्यांनी समाज साहित्य वाटचालीचा परामर्श घेताना सन 2022 या वर्षी नाशिक येथे सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वंजारी समाजाच्या पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची झालेली मुहूर्तमेढ किती योग्य व आवश्यक होती असे कथन करीत समाजातले प्रतिभावंत या निमित्ताने एका व्यासपीठावर येऊ लागलेत व समाजासह साहित्यिकही या निमित्ताने अधोरेखित होऊ लागलेत याचे समाधान नोंदवित
महासंघाचे अध्यक्ष प्रबोधनकार तथा सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. गणेश खाडे यांना संमेलन अध्यक्षांनी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिलेत.
या संमेलनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय प्रा.डॉ.गजाननराव सानप यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून समाजातील प्रतिभावंतांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले संमेलन व्यासपीठ प्रज्ञावंतांचा प्रेरणा स्रोत झाल्याशिवाय राहणार नाही अशा व्यासपीठाची आवश्यकता होती ती महासंघाने पूर्णत्व असलेल्याचे मनस्वी समाधान व्यक्त करीत मी आपल्या सोबतच सदैव आहे अशी ग्वाही दिली. उद्घाटन समारंभामध्ये अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार तथा संमेलनाचे प्रमुख अतिथी माननीय संग्राम भैया जगताप यांनी साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन वैचारिक क्रांती घडते असे सांगत संत भगवान बाबा यांचे विचार समतेचा पुरस्कार करणारे होते त्यांनी केलेले प्रबोधन समाजाच्या कामी आले दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज शिक्षण प्रवाहात आला आणि उच्चशिक्षित व प्रज्ञावंत झाल्याचे नोंदवित बाबांच्या तात्विकतेला कृतज्ञ वंदन करीत संमेलनाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि विजेता राजकुमार आघाव यांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजऋण फेडता आल्याचा आनंद व्यक्त करीत संत भगवान बाबांच्या तपसाधनेला यानिमित्ताने अभिवादन करण्याची ही संधी मला मिळाली सकारात्मकता समता या गोष्टी समाजाला चिरंजीव करतात बळकटी देतात ओळख देतात त्या ओळखीचा भाग होण्याचे भाग्य मला वंजारी महासंघाने दिल्याची कृतज्ञता आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केली.
संमेलनाचे निमंत्रक मल्हारी खेडकर यांनी उपस्थित सर्व साहित्यिकांना अहिल्यानगरीत आणण्याचे व त्यांना ऐकण्याचे स्वप्न आज रोजी पूर्ण झाल्याचा आनंद नोंदवीत यापुढेही अशा सकारात्मक जाणीवांना पेलण्याची संधी मिळावी ती समर्थपणे पेलू असे आश्वासन मनोगतातून उपस्थितांसमोर मांडले.
संमेलनाचे सर्वेसर्वा अर्थात वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशजी खाडे यांनी आपल्या मनोगतातून सुसंस्कृत समाज सामाजिक समतेला बळकटी देऊ शकतो व त्यासाठीच विख्यात तत्वज्ञानी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या तत्त्वज्ञानाचा ठाई ठाई अनुनय करण्याचे व समाज समृद्ध करण्याचे विनम्र आवाहनही चिंतनपूर्वक मांडले.
याच उद्घाटन सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे लिहित्या हातांचा व मनांचा यथोचित गौरव करण्यात आला साहित्यिकां समवेत पत्रकारांना सन्माननीय अतिथींकडून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.त्यात महाराष्ट्रातून आपल्या लेखन सामर्थ्याने सर्वश्रुत झालेले साहित्यिक छत्रपती संभाजी नगर येथून डॉ. शिवाजीराव हुसे अकोला येथून डॉ. शिवाजीराव नागरे परभणी येथून डॉ. विठ्ठल जायभाये पुणे येथून डॉ. चंद्रकांत धस मुंबई येथून श्रीमती रेखा शेळके संख्ये छत्रपती संभाजीनगर येथून डॉ. रामकिशन दहिफळे बीड येथून डॉ. द्वारका मुंडे तर सातारा येथून श्रीमती रंजना सानप चाळीसगाव येथून मनोहर ना आंधळे छत्रपती संभाजीनगर येथून सौ. अलकनंदा आंधळे अकोला येथून तुळशीराम बोबडे मुंबई येथून रमेश आव्हाड पुणे येथून सौ. प्रीती बेटकर जालना येथून श्रीमती छाया जायभाये यांचा सहभाग होता.
तर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्यांची लेखणी अहोरात्र समाज व्यवस्थेला बळ देत आली आहे अशा पत्रकारितेचा अर्थात पत्रकारांचा सन्मानही संमेलनाने मनस्वी जपला त्यात प्रामुख्याने दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बाळासाहेब फड दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवंत दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे वंजारी पुकारचे संपादक दत्ता जायभाये दैनिक लक्ष्यराजचे संपादक निलेश पुराणीक व साहित्य दर्पण चे संपादक गुलाब राजा फुलमाळी या सर्व पत्रकारांना मान्यवर अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरवण्यात आले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या साहित्य सोहळ्यात दुसऱ्या सत्रात परिसंवादाने जणू चैतन्याची धुवाधार बरसातच केली त्यात परिसंवाद सत्राचे अध्यक्ष अकोला येथील डॉ. शिवाजीराव नागरे यांनी सामाजिक समता व सुसंस्कृत समाज या घटकांचे केलेले बहुआयामी विवेचन श्रोत्यांच्या मनाला गवसणी घालून गेले. तर सहभागी वक्ते डॉ.शिवाजीराव हुसे यांनी सामाजिक समता या घटकाला अनेक दृष्टांत आणि दाखल्यांनी समृद्ध करीत केलेले अभ्यासपूर्ण भाष्य रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेले .प्रा. डॉ. रामकिशन दहिफळे यांच्यातला संशोधक व समीक्षक त्यांच्या व्याख्यानातून सदर विषयाला यथोचित न्याय देत गेल्याचे समाधान श्रोत्यांना झाले. ते छत्रपती संभाजीनगर येथून आले होते. तर परभणी येथील ह .भ.प.प्रा विठ्ठल जायभाये यांनी ज्ञानेश्वरी व तुकोबांच्या अभंग ओव्यांच्या संदर्भातून श्रोत्यांना चांगलेच मंत्रमुग्ध करीत समतेच्या अधिष्ठानाचे ययथोचित मर्म आणि महत्त्व विशद केले.
मुंबई येथून आलेल्या वक्त्या श्रीमती रेखा शेळके संख्ये यांनी सामाजिक समतेची सुरुवात स्त्री पुरुष समानतेपासून व्हावी असे विधान करीत स्त्रियांनी वर्तमानकाळी घेतलेल्या गगनभरारीचे सम्यक दर्शन आपल्या सुबोध मांडणीतून श्रोत्यांना घडविले .तर सौ प्रीती बेटकर या पुण्याहून आलेल्या वक्त्या यांनी समतेचे अधिष्ठाते संत भगवान बाबा यांच्या जीवन प्रवासातून समतेच्या चिंतनशीलतेवर चांगलाच प्रकाश टाकला.
तिसऱ्या सत्रात कथाकथनाचा श्रवणप्रिय समारंभ सुरू झाला कथाकथन सत्राचे अध्यक्ष अकोला येथून आलेले तुळशीराम बोबडे यांनी सूत्र स्वीकारित कथाकथन समारंभास सुरुवात केली. यात छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सौ अलकनंदा आंधळे यांनी अर्धा कोयता ही स्त्री सामर्थ्याचे दर्शन घडवणारी व श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारी कथा दमदारपणे सादर केली.तर सातारा येथील कथा लेखिका सौ रंजना सानप यांनी पत्र नावाची वास्तववादी कथा सांगून शिक्षणाला वयाचे बंधन नसते .पाहिजे फक्त प्रचंड इच्छाशक्ती व याच बळावर वार्धक्याकडे वाटचाल करणारी निरक्षर स्त्री ज्ञानेश्वरीचं वाचन करण्याची धम्मक सिद्धीला नेते. हे सांगत श्रोत्यांची दाद मिळवून गेली. यानंतर सौ नीता सानप घुले यांनी ऊसतोड कामगारांच्या स्त्री जीवनावर तसेच समाज व्यवस्थेच्या निष्ठुरपणावर भाष्य करीत विचारगर्भ अशा कथेची मांडणी श्रोत्यांच्या डोळ्यात अंजन घालून गेली. तर बबनराव महामुने यांनी आपल्या वैदर्भि शैलीने सादर केलेल्या कथेने श्रोत्यांमध्ये आनंद लहरीं मनसोक्तपणे पसरवल्यात. कथाकथन सत्राचे अध्यक्ष यांनी कथा कशी आटोपशीर असावी व कथेचे पारंपारिक वैभव सांगत आपल्या विनोदी शैलीने मांडलेली बाहुलीची कथा सादर केली. भाग्य हे सर्वांच्याच नशिबी फळफळत नाही हे खुमासदार शैलीने कथन करीत श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या.
चौथ्या आणि शेवटच्या सत्रात कवी संमेलनाचे अध्यक्ष खानदेश कवी मनोहर ना आंधळे यांनी काव्य महात्म्य थोडक्यात मांडून कवी संमेलनाची मशाल धगधगत्या शब्दांनी पेटवली यात सौ छाया जायभाये यांनी कलियुग या शीर्षकाची कविता सादर करीत माणसातलं माणूसपण जागृत केलं व श्रोत्यांच्या बुद्धीलाच या कवितेने आवाहन केले डॉ. चंद्रकांत धस यांनी आपल्या गोड गळ्यातून तुझी पुण्याई या शीर्षकाची कविता सादर करीत आईच्या आठवणी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत नेल्या. तर गुलाब राजा फुलमाळी या अष्टपैलू कवीने तुझ्या कुंकवात माय मले दिसते पंढरी ही दमदार कविता सादर करीत संमेलनात रंगत आणली कवी संमेलनाचे अध्यक्ष मनोहर आंधळे यांनी बुरखाच फाड बाई ही गझल सादर करीत समाज व्यवस्थेचा बुरखाच फाडून टाकण्याचे कौशल्य आपल्या अंगी असलेल्या शब्द सामर्थ्याने निर्माण केले. तर सुनीताताई कपाळे यांनी बाप नावाची कविता सादर करीत बापाच्या आभाळ उंचीला गवसणी घालत श्रोत्यांच्या अश्रूंचे बांध फोडलेत.संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांना व्यासपीठावरील व श्रोत्यांमधील रसिकांनी स्नेहाग्रहाने कविता म्हणण्यास भाग पाडले.प्रा. आंधळे यांनी विडंबनाकडे जाणारी व वास्तवाचे दर्शन घडवणारी कर कविता या शीर्षकाची कविता सादर करीत श्रोत्यांना खळखळून हसवलेच पण रंजना सोबतच अंजन घालणाऱ्या या कवितेने जाणकारांची उत्स्फूर्त दादही मिळवली. डॉ. विजयकुमार कस्तुरे या जेष्ठ कवींनी चल सखे बोलू काही ही प्रेम कविता सादर करीत श्रोत्यांची मनसोक्त दाद मिळवली तर प्रीती कायंदे या बालकवयित्रीने स्वप्न माझे ही बाल सुलभ पण मनाला भिडणारी कविता सादर करीत काव्य संमेलनाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण संमेलनाचं बहारदार सूत्रसंचालन खानदेशातील सुप्रसिद्ध कवी तथा अभ्यासक्रमातील कवी श्री मनोहर आंधळे यांनी खास वाङ्मयीन शैलीच्या साह्याने केल्यामुळे श्रोतावर्ग दिवसभर व्यासपीठांसमोर खिळून राहिला.
ग्रंथदिंडी बैठक व्यवस्था व्यासपीठ उभारणी अतिथी स्वागत सुरुची भोजन सन्मान चिन्हांचे वितरण या साऱ्यांची चोख अंमलबजावणी नजरेत भरणारी व मनाला भारणारी होती.संमेलनाचा,आयोजकांसह सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येकास झालेला आनंद हा शब्दात निश्चितच सामावणारा नक्कीच नाही सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चाललेल्या या संमेलनातून समाज मनापर्यंत पोहोचण्याचे समाधान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *