स्वदेश फाळणीच्या वेदनेत होरपळत राहिलात आयुष्यभर तुम्ही गुलज़ार..
1 min read

स्वदेश फाळणीच्या वेदनेत होरपळत राहिलात आयुष्यभर तुम्ही गुलज़ार..

Loading

गुलज़ार/

शशिकांत हिंगोणेकर

स्वदेश फाळणीच्या वेदनेत
होरपळत राहिलात आयुष्यभर
तुम्ही गुलज़ार…

जन्माचे गाव सोडून
नव्या गावात
नव्या स्वतंत्र देशात
स्थलांतरीत होऊन निष्ठेनं
वसलात तुम्ही

तेव्हाच शब्दांचे अद्भूत काफिले
उगवून आलेले होते तुमच्या मनात

मोठ्या धीराने तुम्ही उभे राहिलात
या देशात कवितेच्या प्रदेशात

तुम्ही लिहित राहिलात
अस्वस्थ सभोवताल
जगत गेलात धगधगता
सत्य सर्वकाल

तुमच्या हरएक श्वासातून
उमलत गेली तुमची प्रत्यकारी
लक्षवेधी अंतःस्वर कविता

प्रेमालाही हळुवार फुंकर
घालत गेलेत तुमचे शब्द
एवढेच नव्हे तर
अंतःर्मुख होऊन
जगण्याचे तत्वज्ञानही
मांडत गेलीय तुमची कविता

देशाचे भंगणे
आणि प्रेमाचे दुभंगणे
पचवत राहिलात तुम्ही आयुष्यभर

तक्रारीचे कुठलेही पाढे
म्हटले नाहीत तुम्ही

जगण्याचे सार झालेले
तुमचे आयुष्य अनेकांच्या मनात
घर करून संजीवकही झालेयेत

पुरस्काराचा कधीही
ध्यास नव्हता तुमच्या शब्दांना
कुणासमोरही न झुकता
शब्दगौरवाचा ज्ञानपीठ पुरस्कार
चालत आलाय तुमच्या घरापर्यंत

तुमची त्रिवेणी
रात पश्मीने की
माझ्याही आयुष्यात आली
आणि माझ्याही वेदनेची त्रिदले
उगवून आलीत माझ्या मनात
माझ्याही नव्या शब्दात

जगण्याच्या हरएक क्षणी
तुमच्या कवितेनं मलाही
केवळ धीरच दिला नाही तर
गंभीर आणि खंबीर
जगण्याचे धडेही देत राहिली
तुमची कविता मला

तुमची अद्याप भेट नाही
पण तुमच्या भेटीची
आसही संपत नाही…
असे जरी असले तरी
तुमची रोजंच भेट होते
तुमच्या कवितेतून

खरं तर तुमची खरी भेट
म्हणजे तुमची कविताच आहे

गुलज़ार,
तुम्ही जे लिहिताहेत तोच तर
माझ्याही कवितेचा श्वासच झालाय

तुमचे शब्दश्वास जपतोय मी
आयुष्यभर काळजाच्या तळघरात

माझे आयुष्यच झाली आहे
तुमची सर्जक कविता आजकाल.

✍️✍️✍️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *