महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाचा कोकण विभागातून संचालक म्हणून यशवंत म्हात्रे यांची निवड.
![]()
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाचा कोकण विभागातून संचालक म्हणून यशवंत म्हात्रे यांची निवड.
*कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचा आणि इतर समस्या तातडीने सोडवण्यासाठी कायम कटिबध्द राहील:: डॉ.यशवंत म्हात्रे.*
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची सभा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शेगाव येथील हॉटेल साई गजानन येथे आयोजित केली होती. सदर सभेमध्ये एकमताने राज्यामध्ये नोंदणीकृत कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघ स्थापन करणे बाबत निर्णय घेण्यात आला. सदर सभेमध्ये शेगाव (बुलढाणा) बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांची सचिव संघाचे अध्यक्षपदी तर काटोल (नागपूर) बाजार समितीचे सचिव पराग दाते यांची उपाध्यक्ष तसेच संघाचे सचिव पदी फलटण (सातारा) बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, सहसचिवपदी कर्जत (अहमदनगर) बाजार समितीचे सचिव सतीश कदम आणि खजिनदार पदी बार्शीटाकळी (अकोला) बाजार समितीचे सचिव सतीश शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर कार्यकारीणी मध्ये संचालक म्हणून कोकण मुंबई विभागातून भिवंडी बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे,नाशिक विभागातून यावल बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे,अमरावती विभागातून अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर, नागपूर विभागातून आष्टी बाजार समितीचे सचिव नंदकुमार वरकड,पुणे विभागातून बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप,छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना बाजार समितीचे सचिव मोहनराव राठोड, लातूर विभागातून माजलगाव बाजार समितीचे सचिव हरिभाऊ सवने,यवतमाळ विभागातून वणीचे सचिव अशोक झाडे,कोल्हापूर सातारा विभागातून जावळी बाजार समितीचे सचिव महेश देशमुख व महिला प्रतिनिधी म्हणून राजुरा (चंद्रपूर) बाजार समितीच्या सचिव कु. मंगला मेश्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राज्यातील बाजार समितीचे सचिवांचे केडर नेमण्यासाठी प्रयत्न सुरू असून सदर सचिवांचे केडर बाबतचा अहवाल शासनास सादर करणे, शासन स्तरावरून सचिव केडर बाबत अध्यादेश काढण्यासाठी पाठपुरावा करणे, तसेच राज्यातील सचिव लोकांना भयमुक्त वातावरणात कामकाज करण्यासाठी मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाकडून परिपत्रक काढणे अशाप्रकारच्या सर्व कामकाजाबाबत रूपरेषा आणि धोरण ठरविण्यासाठी सचिव संघाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, पालघर ठाणे आणि मुंबई विभागातील बाजार समिती सचिवांचे समस्या तातडीने सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहील असे नवनिर्वाचित संचालक डॉ. यशवंत म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

