पक्षी: निसर्ग संवर्धनातील स्वच्छतेचा अग्रदूत — पक्षीमित्र अश्विन पाटील
![]()
पक्षी: निसर्ग संवर्धनातील स्वच्छतेचा अग्रदूत
— पक्षीमित्र अश्विन पाटील
अमळनेर प्रतिनिधी
नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात दि.१९ जुलै २०२४ रोजी पक्षी मित्र अश्विन पाटील सर अमळनेर, यांच्या ‘निसर्ग संवर्धनातील महत्त्वाचा घटक पक्षी ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती ए बी साळुंखे मॅडम होत्या.
यावेळी बोलतांना अश्विन पाटील म्हणाले,निसर्ग संवर्धनातील महत्त्वाचा स्वच्छतादूत पक्षी असून त्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. पक्षांचे विविध आवाज, त्यांच्या हालचाली, सवयी, खाद्यविविधता निसर्गाला परस्परपूरक आहेत. निसर्गसंवर्धनात पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.
मानवाने केलेला अतिरेकी हस्तक्षेप व त्यामुळे विस्कळीत झालेली निसर्गसाखळी भविष्यात खूप मोठ्या संकटाची नांदी ठरेल. अशी भीती व्यक्त करताना अश्विन पाटील सर यांनी पक्षी संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक होऊन महत्त्वाची भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्षांची छायाचित्रे व माहिती सांगताना पक्ष्यांचे निसर्गातील बहुमोल योगदान याविषयी सोदाहरण माहिती दिली. पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री वाय डी ठाकूर सर, पर्यवेक्षक श्री ए सी आमले सर, श्री व्ही बी गहरवाल सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जी यू पवार सर यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री एस डी देवरे सर यांनी करून दिला; तर आभार एस पी बावस्कर सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील ६७५ पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

