हर्षदा….. तू तर साक्षात ‘देवरूप’ च
![]()
हर्षदा….. तू तर साक्षात ‘देवरूप’ च
धुळे येथील माझे महाविद्यालयीन जीवनातील गुरु, बुद्धशासन सुरी प्राचार्य जे.जी. खैरनार सर यांचे जावाई स्टेशनरोडवरील ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश पाखरे यांच्या ‘किमया’ हॉस्पिटल मधील परिचारिका हर्षदा माणिक चौधरी हिच्या हाताने ‘किमया’ केली आणि एका पोलीस अधिकाऱ्याला जीवदान मिळाले. सिस्टर हर्षदा या धुळे कोर्टात कामानिमित्त आल्या होत्या यावेळी न्यायालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भाईदास साळुंके यांना हृदय विकाराचा झटका आल्याने काही क्षणातच त्यांच्या हृदयाची गती बंद झाली त्याच क्षणी हर्षदा या देवदूत बनून पुढे आल्या व प्रसंगावधान राखत त्यांनी पोलीस अधिकारी साळुंखे यांना तातडीने कार्डियल पंपींग करून सीपीआर पद्धतीने उपचार देऊन जीवदान दिले. या ‘जीवदानी’ हर्षदास भेटावे व तिचे कौतुक करावे म्हणून मी ‘किमया’ हॉस्पिटल गाठले आणि डॉ. जगदीश पाखरे यांच्या उपस्थितीत तिचा छोटेखानी सत्कार केला. तिच्याशी चर्चा करीत काही गोष्टी जाणून घेतल्या.
आज 25 वर्ष वय असलेली हर्षदा केवळ दोन वर्षाची असतांनाच अपघातात तिचे पितृछत्र हरपले. घरात ‘अठराविश्व दारिद्र्य’ तरीही खचून न जाता हर्षदाची आई अचला म्हणजे स्थिर, पहाड नावाप्रमाणे अचलाताईने विचलित न होता पहाडाप्रमाणेच स्थित राहत न खचता श्रमाची कष्टाची कामे करून 2 वर्ष वयाची हर्षदा व आठ महिन्याचा तुषार यांचे पालन पोषण करून आपल्या संसाराचा गाडा पुढे रेटला. परिणामी मुलगा तुषार आज बारावी उत्तीर्ण झाला असून परिचारिका म्हणून कार्यरत असलेली हर्षदा एम.ए.बी.एड्. असून ए.एन.एम. (ANM) च्या द्वितीय वर्षाला आहे. गेली 8 वर्ष ती किमया हॉस्पिटलला बालरुग्णांच्या सेवेत आहे. जेव्हा मी हर्षदाला विचारले की, ‘हृदयग्रस्त व्यक्तीवर उपचार करायचे ते तुला कसे सुचले? कसे जमले? त्यावर ती उत्तरली, याबाबत आमचे गुरु डॉ. जगदीश पाखरे आहेत. ही ‘किमया’ मी त्यांच्यामुळेच करू शकले. डॉ. जगदीश पाखरे व डॉ. सुषमाताई पाखरे हे आम्हाला स्वत:च्या मुलीप्रमाणे वागवितात, दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाची ट्रायल समजावून सांगतात, काही ज्ञान मेडिकल व्हिडीओ बघून मिळते. मी जे केले, त्या क्षणी जे सूचले याचे सर्वश्री श्रेय आमचे गुरु डॉ. पाखरे यांचेच आहे.
भविष्यात मेडीकल क्षेत्रात तुला काय करायला आवडेल? असा प्रश्न विचारताच तात्काळ हर्षदा म्हणाली, जे रंजलेले-गांजलेले आहेत, शोषित पिडीत, श्रमीक, कष्टकरी, गोरगरीब वर्ग आहे त्यांची वैद्यकीय सेवा करण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा स्वर्गानंद कुठला असू शकतो? अवघे 25वर्ष वय असलेल्या या मुलीला एव्हढे उच्च विचार सुचले कसे? महान संत महात्म्यांनी पेरलेली मानवधर्माची मानवतेची ‘विण’ मला या मुलीच्या विचारात दिसली. हर्षदा तुझे विचार हे आकाशाला गवसणी घालणारेच आहेत. हर्षदाताईच्या निमित्ताने मला आठवण होतेय त्या नर्मदेच्या खोऱ्यात कार्यरत असणाऱ्या रुग्णसेवकांची. सध्या वाई तालुक्यातील अकोशी येथे आयुर्वेदिक दवाखान्यात मेडीकल ऑफीसर असलेल्या डॉ. रेवती जोशी व त्यांच्या टीमची. नर्मदेच्या खोऱ्यात धडगाव अक्कलकुवा तालुक्यात जनआंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले ‘जीवन शाला की क्या है बात, लढाई-पढाई साथ साथ’ असं म्हणत शिक्षण घेणारी जीवनशाळेची बालके, ‘लढेंगे, जितेंगे’ चा नारा देणारे आदिवासी बांधव यांच्या प्रकृतीची ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता डॉ. रेवती जोशी व त्यांच्या टीमने केलेली सेवा विसरता येणार नाही, तोच सेवाभाव मला हर्षदाच्या विचारात दिसून आला. हर्षदा, कोर्टाच्या आवारात तू विद्युत वेगाने केलेल्या कृतीतून आणि उक्तीतून संपूर्ण वैद्यकीय सेवेची मान उंचावली आहेच. तद्वतच या क्षेत्रासाठी उच्च कोटीचा संदेशही दिला आहे. हर्षदाताई गरीबीशी दोन हात करीत तुझ्या संघर्षशिल कार्यकर्तृत्वाला आणि तुला प्रेरणा देणाऱ्या डॉ. जगदीश पाखरे व डॉ. सुषमाताई पाखरे यांच्या प्रेरक शक्तीला माझा सलाम.
हर्षदा तुला,
देवदूत म्हणावं की देवरुप,
पडला क्षणभर भ्रम
हुनर पाहता हर्षदेचे अन्
ठेचाळला बघा यम !

