महाराष्ट्रातील उद्योजक व व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ५ जुलै रोजी अमळनेरात.
![]()
महाराष्ट्रातील उद्योजक व व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ५ जुलै रोजी अमळनेरात.
महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची सुमारे १०० वर्ष जुनी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री ललित गांधी व वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रविंद्र माणगावे हे आज अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ संगीता पाटील व उपाध्यक्ष श्री संजय सोनवणे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.
शहरातील युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची नुकतीच उत्तर महाराष्ट्रातून गव्हर्निंग कौन्सिल पदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सवर नियुक्ती झाली आहे. त्यानंतर अमळनेरच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वतः अमळनेरातील उद्योजक व व्यापाऱ्यांशी हितगुज साधून स्थानिक समस्या जाणून घेणार आहेत. विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांनी मिळून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष व वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांचा सत्काराचा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे.
दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ४:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, अमळनेर येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांना संघटित करणे, शासन दरबारी उद्योजक व व्यापारांचे प्रश्न सोडवणे, राज्य सरकारच्या उद्योग व व्यापार क्षेत्राविषयी आराखडा निर्माण करण्यात योगदान देणे, उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बाजारपेठ उपलब्ध करून देणे या आणि अशा अनेक प्रकारच्या उपक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गेली ९८ वर्षे कार्यरत आहे. अशा संस्थांचे पदाधिकारी व आपल्या अमळनेर येथील स्थानिक उद्योजक व व्यापारी यांच्यात हितगुज होऊन व्यावसायिक वृद्धी तसेच अनेक समस्यांचे निवारण याद्वारे होण्याची शक्यता आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी आडत असोसिएशन, अमळनेर, अमळनेर मार्केट यार्ड व्यापारी संघटना, व्यापारी महासंघ अमळनेर, एम.आय.डी.सी. अमळनेर व युवा उद्योजक वेदांशू पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अमळनेरातील सर्व उद्योजक, व्यापारी व सेवा क्षेत्रातील बांधवांनी आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

