संस्कृत भाषा ही शाश्वत सांस्कृतिक मूल्यांची वाहक.–डॉ. लिना पाटील.
![]()
संस्कृत भाषा ही शाश्वत सांस्कृतिक मूल्यांची वाहक.–डॉ. लिना पाटील.
मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयात संस्कृत विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न.


जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचा संस्कृत विभाग व संस्कृत प्रसारिणी सभा जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील स्टेट/सीबीएसई/आयसीएसई बोर्डाच्या इ.१०वी व १२वी परीक्षेत संस्कृत विषयात १००पैकी ९९ व १००गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.डाॅ.अखिलेश शर्मा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी डाॅ.लीना पाटील यांचे प्राचार्य डॉ.भारंबे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये संस्कृत विषयात विशेष नैपुण्य संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १५० विद्यार्थ्यांचा डाॅ.लीना पाटील व प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. भाग्यश्री भलवतकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अर्जुन शास्त्री मेटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रा.डाॅ. अखिलेश शर्मा यांनी संस्कृत विभागाचा गोषवारा सादर करतांना विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत अवगत केले. प्रा.डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी आपल्या महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच पदवी व पदव्युत्तर अर्थात् एम.ए.पर्यत संस्कृत विषयाच्या सुविधेसह असंख्य विद्यार्थ्यांना दरवर्षी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाची शिष्यवृत्ती तसेच संस्कृत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत याची माहिती सभागृहास दिली. प्रमुख अतिथी डॉ. लिना पाटील यांनी आपले विचार व्यक्त करतांना संस्कृतचे पौराणिक महत्व विषद करताना आजही ती भाषा तितकीच महत्त्वपूर्ण कशी आहे यावर सविस्तर विवेचन केले. संस्कृत भाषा ही शाश्वत सांस्कृतिक मूल्यांची वाहक असून यात साध्या आणि सुंदर स्वरूपात जीवन मूल्यांची, व्यवहाराची शिकवण आणि आदर्श संस्कार दिलेले आहेत. संस्कृत ही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आंतरिक सुसंगतता असलेली भाषा आहे, जी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सोपी आणि गोड आहे. असे प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आपल्या मनोगतात संस्कृतमध्ये वेद आणि पुराणांसह तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, भूगोल, शरीरशास्त्र, आनुवंशिकी, वास्तुशास्त्र, जीवशास्त्र, गणित, मानसशास्त्र, शस्त्रक्रिया आणि आयुर्वेद इत्यादींच्या ज्ञानाचा विपुल भांडार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, इ.११ वी आणि १२वीमध्ये देखील असेच मन लावून अभ्यास करा असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.सौ. सारिका वाणी, प्रास्ताविक व प्रमुख अतिथी परिचय प्रा.डाॅ.अखिलेश शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अर्जुन मेटे यांनी केले. तसेच ईशस्तवन कु.श्रावणी भालेराव हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत प्रसारिणी सभा जळगांवचे सर्व पदाधिकारी कार्याध्यक्ष डाॅ.अखिलेश शर्मा, सचिव सौ.पल्लवी जोशी, उपाध्यक्ष प्रा.अर्जुन शास्त्री मेटे, कोषाध्यक्ष प्रा.महेंद्र शिरुडे, प्रा.गुरुदत्त महाजन, श्री पंकज वराडे, सौ.अमिता निकम, सौ.सारिका बोरसे, सौ.हर्षदा उपासनी, सौ.आरती पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

