सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे ‘ महात्मा दिन ‘ उत्साहात साजरा
![]()


सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे ‘ महात्मा दिन ‘ उत्साहात साजरा
क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना मुंबई येथे ११ मे १८८८ रोजी मुंबईच्या मांडवी कोळीवाडा सभागृहात बहुजन समाजातर्फे समारंभपूर्वक ‘ महात्मा ‘ ही पदवी अर्पण करण्यात आली. जोतिबा फुले यांच्या क्रांतीकारी समाजकार्याच्या सन्मानार्थ व त्या ऐतिहासिक अभुतपूर्व समारंभाच्या स्मरणार्थ ‘ महात्मा दिन ‘ शनिवार दि.११ मे २०२४ रोजी ‘ वात्सल्यसिंधु ‘ सदन असावा नगर, जळगाव येथे अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी ललित कला केंद्र चोपडा येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा कला व्यासंगी लेखक व व्याख्याते राजेंद्र महाजन तसेच अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यकर्ते महेश शिंपी सर उपस्थित होते.
ज्योतिराव फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण प्रमुख अतिथी निवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले.समीक्षा लुल्हे यांनी सत्यधर्माचा अखंड अर्थात महात्मा फुले लिखित प्रार्थना सादर केली. प्रार्थनेचे उपस्थितांनी सामुहिक अनुगायन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना देवकाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे यांनी केली.
सत्यशोधक समाजाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे मार्गदर्शनात म्हणाले की, ‘ जोतिराव फुले यांनी संपूर्ण आयुष्यात सेवा, त्याग व समर्पण यांचे मूल्याधिष्ठित मानदंड निर्माण केले.धर्मशास्त्राला सनातनांच्या अनैतिक चौकटीतून मुक्त करून मानवी मुल्यांची कालातीत निर्विवाद अतूट फ्रेम दिली. ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ देऊन आजीव विधायक संघर्ष करून स्वातंत्र्य,समता,बंधुता या चिरनुतन मूल्यांचा हक्क स्त्रिया व दीनदलितांना प्राप्त करून दिला.युगानूयुगांच्या गुलामगिरीतून मुक्त करून त्यांच्या जीवनात सर्वाथाने नवचैतन्य आणले.सत्यशोधक समाजांतर्गत फुले यांनी केलेले क्रांतिकारी शैक्षणिक,सामाजिक कार्यावरही लुल्हे यांनी प्रकाश टाकला. ‘ महात्मा ‘ या अभूतपूर्व उपाधी प्रदान समारंभाची मुद्देसूद माहिती व यासाठी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे व वंडेकर याचे अमूल्य योगदान सांगितले.प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या कार्यात पत्नीचा सिंहाचा वाटाअसतो.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वार्थाने महात्मा फुले यांची अतूट सावलीआणि दीनदलितांच्या माऊली होत्या असे सांगून लुल्हे यांनी सावित्रीमाईंच्या अजोड कार्याला उजाळा दिला.चित्रकार सुनील दाभाडे यांनी महात्मा फुलेंचे निवडक अखंड सादर केले.प्रमुख अतिथी महेश शिंपी सर यांनी जोतिराव फुले यांनी मानवाच्या न्याय हक्कासाठी केलेल्या क्रांतिकारी लेखनकर्तृत्वाची माहिती दिली. ‘ ब्राह्मणांचे कसब ‘ व ‘ गुलामगिरी ‘ या ग्रंथांचा संक्षेपाने परिचयही शिंपी यानी करून दिला.
[ जागतिक ग्रंथदिनाच्या औचित्याने सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे ग्रंथदान : – जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने डॉ.कलाम पुस्तक भिशी,जळगाव या संस्थेसाठी ७३५२ रुपये दर्शनी किंमतीची शैक्षणिक,सामाजिक, वैचारिक,वैज्ञानिक विषयांवरील दर्जेदार प्रकाशनाची व नामवंत लेखकांच्या ४६ पुस्तकांचे ग्रंथदान भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांना सुपूर्द केले. प्राचार्य महाजन यांनी उत्स्फूर्तपणे ५००० रुपयांची पुस्तके देण्याचे जाहिर केले . मात्र त्यांचा मोठेपणा हा की पाच हजाराच्या खरेदीत मिळालेल्या कमिशनची सुद्धा पुस्तके घेऊन ग्रंथदानात भर टाकली. ही ग्रंथनिष्ठा व वाचन व्रतस्थता निश्चित कौतुकास्पदच नव्हे तर वंदनीय व अनुकरणीय सुद्धाआहे.प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या दातृत्वाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान शाल व ‘ वात्सल्यसिंधु ‘ हा डॉ.नरेंद्र बापूजी खैरनार संपादित काव्यसंग्रह देऊन अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.महात्मा दिनाच्या औचित्याने सत्यशोधक समाज संघ,महाराष्ट्र राज्य प्रकाशित ‘ महात्मा जोतिबा फुले यांचे अमर जीवन ‘ हे शास्त्री नारो बाबाजी महाधट पाटील लिखित चरित्र पुस्तक विजय लुल्हे यांनी उपस्थितांना सप्रेम भेट दिले. ]
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा लुल्हे व आभार प्रदर्शन चित्रकार सुनील दाभाडे यांनी केले.कार्यक्रमास श्रीमती सिंधु सुतार यांसह पुस्तक भिशीचे सक्रीय सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज कार्यकर्ते रवींद्र तितरे,योगेश कोलते व सोनवणे यांनी अमूल्य सहकार्य केले.

