1 min read

‘लाल परी’ ले विमल गुटखा ना रंग दी ते दखा,नई तरी बारासनी माय खाटलावर जीव जाय

Loading

‘लाल परी’ ले विमल गुटखा ना रंग दी ते दखा,नई तरी बारासनी माय खाटलावर जीव जाय

गोरगरीब श्रमिक कष्टकऱ्यांचे हक्काचं वाहन म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस अर्थात सर्वांची आवडती ‘लाल परी’. काही घटकांना मोफत सवलत असली तरी माता-भगिनींच्या अर्धे भाडे सवलतीमुळे वाढत्या गर्दीचा परिणाम, यात्रा-जत्रा, यामुळे विठोबा, खंडोबा, तुळजाई, गडावरची सप्तश्रृंगी माता लाल परिला पावली. त्यामुळे तीला बरे दिवस आले आहेत. बरे दिवस आले असले तरी तिची अवस्था बरी आहे का? हा संशोधनाचा विषय नाहीच. कारण सदोष गाड्यांमुळे होणारे अपघात, रस्त्यावर बंद पडणाऱ्या बसेस. बंद गाडीला धक्के मारणारे प्रवासी तिची अवस्था दिसण्यास पुरेसे कारण आहे. बसच्या आतील प्रवासी निर्मित कचऱ्याचे दृष्य सर्वदूर दिसते. देशातला उच्चपदस्थ नेताही उद्‌घाटन केल्यानंतर कापलेली फीत, कव्हर घाण होऊ नये म्हणून आपल्या खिशात त्या कचऱ्याला जागा करून देतात हे दृष्य सर्व देशवासियांनी पाहिले; पण लाल परीतला प्रवासी साधी रिकामी विमलची पुडी आपल्या खिशात ठेऊ शकत नाही हे लाल परिचे दुर्दैवच म्हणावे लागेल. बिचारे चालक-वाहकही लाल परिची काळजी घेत असतात. स्थानपरत्वे रोडवर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना सेवाभावाने ते सांगत असतात, ‘‘गाडी मा जागा नयी, मांगे रिकामी गाडी यी ऱ्हायनी तिम्हा बठा.’’ बिचारे चालकही खूप आज्ञाधारक आहेत. मध्यंतरी त्यांचा मोबाईल वाहकाकडे जमा करावा असा फतवा निघाला होता त्यांचे तंतोतंत पालन होत आहे. वाहक गाडी सुटण्यापूर्वीच चालकाकडून मोबाईल जमा करीत आहेत. प्रवाशांनी भिंग लावून शोधले तरी गाडी चालवितांना मोबाईलवर बोलतांना एकही चालक आढळणार नाही (अर्थात तो मोबाईल वाहकाकडे असतो तर कसा दिसेल?) त्यामुळे ठिकठिकाणी लालपरी चेक करणारे साहेब लोकही या शिस्तबद्धतेबद्दल ‘जाम’ खुश आहेत. प्रवासीही कळीचे नारद असतात. चालक बदनाम व्हावा म्हणून ड्रायव्हर सिटच्या बाजुलालच खाली व खिडकीलगत विमल गुटक्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या असतात. कोणीबी यावे पिचकारी मारून जावे ‘बठ्ठासले थुकाले रान मोक्यय शे’ सोबतच्या छायाचित्रावरून हे लक्षात येईलच. त्यातच ‘कोठेबी थुकसू गाडी तुन्हा तुन्हा बापनी शे का?’’ असे ‘कानबने’ आणि ‘बनचुके’ प्रवाशांचीही कमी नाही. गुटख्याला महाराष्ट्रात बंदी असल्यावर ही अवस्था, बंदी उठवली तर काय परिस्थिती असेल आणि येणारी सरकारे ही शेरास सव्वाशेर असणार आहेत. त्यामुळे त्यांनी गुटखा बंदीचा निर्णय उठवला तरी आश्र्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा लाल परिचा पूर्ण रंगच जर विमल गुटखा सदृष्य केला तर महामंडळाची काय हरकत आहे? लाल परिनी इज्जत बी वाची आणि गुटखाप्रेमी पब्लिकनी सोयबी व्हई. महामंडळाने ‘विमल गुटखा’ कलर देऊनच टाकावा व लालपरीची अवहेलना थांबवावी नईतरी लाल परि नी अवस्था ‘बारासनी माय आणि खाटलावर जीव जाय’ अशी व्हयेलच शे. कोणशे बिचारीना वाली? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *