1 min read

डॉ.भिमराव आंबेडकरांसारखा जगात नेता झाला नाही!!!

Loading

डॉ.भिमराव आंबेडकरांसारखा जगात नेता झाला नाही!!!

जगात काही माणसे जन्माला येतात ते केवळ युगनिर्माते ही भूमिका साकारण्यासाठी होय. अशाच सुंदर सकपाळ नाव असलेल्या कुटुंबात एक प्रज्ञेच्या प्रांतातील दीपस्तंभ जन्माला आला. सकपाळ घराणे सेवाभावी विचाराचे अध्यात्मिक अधिष्ठान असलेले होते. इंग्रजांच्या सैन्यात प्रामाणिक सेवा देणाचे काम करणाऱ्या सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे मुळचे अंबावडे गावचे पुढे त्या गावाच्या नावात अपभ्रंश होऊन यांचे नाव आंबेडकर पडले. जगाने स्मरण करावा असा दिवस 14 एप्रिल 1891 ला जगाच्या प्रत्येक व्यक्तीने प्रेमाने, करुणेने, शील, विवेक, बुध्दीप्रामाण्याने, समतेने जगावे अशा नेत्याचा जन्म झाला. लहानपणापासून जातीभेदाच्या कलंकित रोगाचा सामना भिमरावाला करावा लागला. अतिशय जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, नीडरपणा असलेल्या भिमाने देशाच्या विषमतेची चौकट मोडुन काढण्याचा चंग बांधला. तेव्हापासून शिक्षण घेण्याची म्हणजेच ज्ञानाच्या विशाल कक्षेत स्वतःचे स्थान निर्माण करण्याची तसेच आपल्या बहुजनांना सन्मानाने जगण्यासाठी कंबर कसली.भिमरावाला दीन, दलित, वंचित, पीडित यांचे दु:ख दिसत होते. यासाठी शिक्षण हाच त्यावर उपाय आहे. भिमाची बुद्धीमत्ता पाहुन अर्जुन कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुध्दाच्या चरित्राचे पुस्तक भेट दिले. राजे सयाजीराव गायकवाड यांच्या कडे भिमाच्या विदेशातील शिक्षण घेण्याची शिष्यवृत्तीची सोय करुन दिली. ज्ञान घेण्यासाठी ज्या प्रमाणे सिंह आपल्या सावज मिळण्यासाठी झेप घेतो त्याप्रमाणे भिमराव पुस्तकासाठी तडफडत असायचे. एकदा त्यांचे पुस्तके येण्याचे जहाज बुडाले त्यावेळी त्यांना दु:ख झाले. विदेशात ज्ञान घेत जगाच्या पश्नावर विद्वान लोकांशी चर्चा करायचे. ज्ञानामृत प्यालेला ज्ञानसुर्य ज्ञानाची शिदोरी सर्वांसाठी खुली करत राहिला.सर्वच प्रकारच्या क्षेत्रात बाबासाहेब अव्वल ठरले. समाज जागृतीसाठी वृत्तपत्रे सुरु केले. एकही ओळ स्वार्थासाठी लिहली. त्यांची लेखणी विकाऊ नव्हती. त्यांनी सत्य मांडण्याचे खडतर काम केले. वामन दादा कर्डक म्हणतात भिमाची लेखणी किती सामर्थ्यवान होती. झुकली कुणापुढे नाही. आजची पत्रकारिता लाचारीची पत्रकारिता आहे.बोटावर मोजता येतील एवढेच पत्रकार सत्य मांडण्याचे धाडस करतात. आज मीडियात पक्षाधारित पत्रकारिता दिसते. बाबासाहेब संत तुकारामाचा विद्रोही विचार घेऊन मांडणी करायचे..आज उपजीवीकेसाठी, खंडणी साठी लेखणी चालते. बाबासाहेब शीलवान,प्रज्ञावान होते. त्यांचे नैतिक वजन,उत्तम आचरण होते. आज अनुयायी भरपूर आहेत परंतू कुणापुढे पैशाने, लोभाने, लालसेने झुकणारे दिसतील. स्वार्थासाठी अनेक पक्ष काढुन स्वार्थाची दुकाने मांडतांना दिसतात. बाबासाहेब एकटे संघर्ष करुन लढले. आज अनेक आहेत संघटना त्या बहुजनासाठी एक होत नाही. भिमरावाची समाजाकडून, शिकलेल्या कडून अपेक्षा होती की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. जगातल्या साऱ्या पुस्तकाचे ज्ञान बाबासाहेबांनी घेतले होते. त्यात मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, भाषा , कायदा, साहित्य, धर्म, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्त्व, वेद, पुराण, पाश्चात्य विचारवंत त्यांचे सिध्दांत,भारतीय विचारवंत अशा सर्वच पंथ, संप्रदाय अभ्यासले. ह्या सर्व अभ्यासाअंती निष्कर्ष काढला की सर्व धर्म, साहित्य देव केंद्रित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना नितीच्या, समतेच्या, बंधुतेच्या, प्रेमाच्या, आत्मियतेच्या, सत्याच्या, विवेकाच्या, तर्काच्या, ज्ञानाच्या मार्गाने जाणारा धम्म दिला. धम्म मानवाचा जगण्याचा उच्चत्तम मार्ग दिला. त्यात विज्ञान आहे, वास्तवता आहे. ज्ञानाने क्रांती होत नसेल तर ते ज्ञान खुजे आहे. समाजभिमुख पत्रकारिता बाबासाहेबांनी केली. मनुवादी कायदयाची जाळुन होळी केली. कुणी एक विशिष्ट जात श्रेष्ठ असू शकत नाही. जन्माने श्रेष्ठत्व देण्याची पध्दत कालबाह्य ठरविली. ज्ञानाचा हा झंजावात प्रकाशाची मशाल फिरवत राहिला. बाबासाहेब हे धर्मसुधारक होते. कोणताही धर्म असो त्यावर त्यांनी सुधारात्मक भाष्य केले. बुध्द धम्मातील काही गोष्ठी ज्या बुध्दाच्या विचाराशी विसंगत वाटल्या त्यावर टिका केली. बहुजनातून राजकिय चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. कधीही हिंसात्मक मार्गाने न्याय मिळवून दिला नाही. आपल्या बहुजनाचा इतिहास उजागर केला. एक उत्तम लेखक होते. मानवाच्या प्रगतीसाठी त्यांनी साहित्य लिहिले. पुस्तके विक्री होण्यासाठी साहित्य नाही लिहले. मानवावर लादलेल्या धर्माच्या, जातीयतेच्या, हुकूमशाही च्या, अज्ञानाच्या बेळयावर विचाराने वार केले. ज्ञानाच्या वाटेवरील अज्ञानावर प्रहार करणारे वारकरी होते. बॅरिस्टर होते त्यांनी कधी अन्यायाची बाजू घेतली नाही. परखड वकिली केली. बाबासाहेब हे खर पाहता पुस्तकाचे डाॅक्टर होते. अनेक पुस्तकाची तपासणी करुन त्याचा रोग बहुजनांना लागू नये याची दक्षता त्यांनी घेतली. त्यांना संगिताची आवड होते. मनाला विरंगुळा म्हणून ते व्हायोलिन वाजवायचे..त्यांना कबीराच्या संत्संगाने भुरळ घातली. अगदी परखड वाणी त्यात सत्याचा प्रकाश होता. मानवाचा विकास होता. बाबासाहेब हे घटनेचे निर्माते होते. आज भारत विविध जाती,धर्म असुनही एकसंघ राहिला त्याला संविधानाचे कवच आहे. तरी भारतात एकाच धर्माचे सरकार, राज्य यावे ही फुटीरवाद्यांचे म्हणणे आहे. राजकारणात सर्वच घटकांना न्याय मिळावा हा हेतू बाबासाहेब आंबेडकरांचा होता. मार्क्स वादाला भिमरावाने नैतिकतेने संघटित राहुन संघर्ष करण्याचा सल्ला दिला. वादातून संवादाकडे नेणारी समतावादी दृष्टी त्यांची होती. अनेक पैलूवर बाबासाहेब आंबेडकर यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. आपल्या शीलाच्या,ज्ञानाच्या,विवेका च्या, बुध्दीप्रामाण्य सामर्थ्याने सारे जग जिंकले .असा नेता बाबासाहेब गेल्यानंतर झाला नाही. बहुजनाची जी प्रगती झाली ती बाबासाहेब आंबेडकर यांची मेहरबानी आहे. आज खाजगीकरण करुन बहुजन विकासाचा मार्ग बंद केला जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारलेला धम्म हाच त्यावर पर्याय आहे. त्यांनी कर्मकांड विरहित धम्म स्वीकारून आदर्श जीवन जगण्याचा पाया घालुन दिला. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन..

एस. एच. भवरे
पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *