ग्रामीण रुग्णालय अमळगांव अधिकारी / कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता
![]()
ग्रामीण रुग्णालय अमळगांव अधिकारी / कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता
१४ कोटी ८० लाखाच्या खर्चाला मान्यता,मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ग्रामीण रुग्णालय अमळगांव जि. जळगांव येथील अधिकारी/कर्मचारी निवासस्थान बांधकामांचे रु.१४८०.४७ लक्ष (चौदा कोटी ऐशी लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतक्या रक्कमचे अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :ग्रामीण रुग्णालय अमळगांव जि. जळगांव येथील अधिकारी/कर्मचारी निवासस्थान बांधकामांचे अंदाजपत्रक सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे. सदर अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंमळनेर यांनी तयार केले आहेत. सदर अंदाजपत्रकामध्ये आकस्मिक खर्च ४ टक्के, जीएसटी १८ टक्के, विम्यासाठी १ टक्का व भाववाढ १० टक्के, ग्रीन इमारत ५ टक्के इ. ची तरतूद केली असून त्यानुसार एकूण रु. १४८०.४७ लक्ष ( चौदा कोटी ऐशी लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना सोबत जोडण्यात आलेल्या Recapitulation sheet प्रमाणे खालील अटी व शर्तींच्या अधिन राहून या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे :-
अटी व शर्ती :-
१) कामासाठी निविदा मागविण्याआधी सदर कामास सार्वजनिक बांधकाम विभागातील सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक राहील.
२) बांधकाम सुरु करण्यापुर्वी सदर नकाशा वास्तुशास्त्रज्ञ, सा.बा. विभाग नाशिक यांचेकडून मंजुर करुन घ्यावे.
३) सदर कामाची निविदा काढतांना प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा न काढता नमूद सर्व कामांसाठी एकच निविदा काढण्यात यावी.
४) सोबत जोडण्यात आलेल्या Recapitulation sheet मध्ये करण्यात आलेल्या तरतूदीनुसार तसेच त्यामध्ये वस्तूमध्ये कोणताही बदल करण्यात येवू नये.
५) क्षेत्रिय जागेच्या परिस्थितीनुसार व आरोग्य संस्थांच्या आवश्यकतेनुसार प्रस्तावित कामाची किंमत वाढणे शक्य असल्यामुळे त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्यात्या- भागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून करुन घ्यावेत.
६) सदरचे अंदाजपत्रक हे ढोबळ नमुना अंदाजपत्रक असल्याने, या कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकांना तांत्रिकदृष्ट्या मान्यता ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या त्यात्या- क्षेत्राच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. अशी तांत्रिक मान्यता करीत असताना आरोग्य खात्याच्या त्यात्या – आरोग्य सेवा मंडळाच्या उप संचालकांच्या सहमतीने तरतुदी अंतिम करण्यात याव्यात.
७) सदरचे काम नवीन नमुना नकाशांप्रमाणे करावयाचे झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने
नियुक्त केलेल्या खाजगी वास्तुशास्त्रज्ञामार्फत नकाशांप्रमाणे वास्तुमांडणी आराखडा मंजूर करुन घेण्यात यावा. तसेच स्थानिक ग्रामीण नगर विकास संस्थेच्या संबंधित नियमानुसार बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी सदर नवनियुक्त वास्तुशास्त्रज्ञ व जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील. तसेच ही परवानगी मागण्यासाठीचा पत्रव्यवहार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने करण्यात यावा.
८) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य / उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञाकडून या कामांच्या नकाशे व वास्तुमांडणी आराखड्यांना वेगळ्या मंजूरीची आवश्यकता नाही.
९) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र. इएनव्ही- २०१३/प्र.क्र.१७७/तां.क. १ दि. १० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
१०) उपरोक्त कामे सदर रक्कमेत पूर्ण होतील यांची दक्षता घ्यावी.
११) सदर काम करतांना कामाची पुनरावृत्ती (Duplication) होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यकारी अभियंता यांनी घ्यावी.
सदर बांधकामावरील खर्च मागणी क्रमांक- एच -८, मुख्यलेखाशिर्ष ४२१०- वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यावरील भांडवली खर्च, ०२ – ग्रामीण आरोग्य सेवा, ०४- सार्वजनिक आरोग्य, १०४- सामुहिक आरोग्य केंद्र, (००) (०१) मोठी बांधकामे (४२१००३९१), ५३ – मोठी बांधकामे याखाली भागविण्यात येईल.
ग्रामीण रुग्णालय अमळगांव जि. जळगांव येथील अधिकारी / कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी लागणाऱ्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई यांनी त्वरीत शासनास सादर करावा असे पत्रकातील आदेशात म्हटले आहे…


