प्रेरणादायी कहानी….
आयुष्य हा कृतज्ञतेचा प्रवास आहे आनंदाकडे घेऊन जाणारा… आयआरएस पूजा कदम
![]()
प्रेरणादायी कहानी….
आयुष्य हा कृतज्ञतेचा प्रवास आहे आनंदाकडे घेऊन जाणारा… आयआरएस पूजा कदम
75 टक्के दृष्टी कमी असून देखील युपीएससीत मिळविली 577 रँक
मुलाखतीद्वारे उलगडले प्रेरणादायी यशाचे रहस्य



अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयआरएस पूजा कदम लातूर यांचे रोड मॅप टू सक्सेस यूपीएससी या विषयावर विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रकाश वाघ ,फ्रांस येथून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करून परत आलेले दिवेश पाटील निवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी मुलाखतीद्वारे आयआरएस पूजा कदम यांच्या यशाचे रहस्य उलगडले. आयुष्य हा कृतज्ञतेचा प्रवास आहे आनंदाकडे घेऊन जाणारा, जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी या आपल्याला बळ देत असतात प्रत्येक यशाचे क्षण पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. मी लातूर जिल्ह्यातील टाका या छोट्याशा खेड्यातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी शिक्षण घेत होते हा काळ माझ्यासाठी फार अडचणीचा होता. याच काळात माझ्या डोळ्यांना रेटीना डिसीजमुळे माझी 75 टक्के दृष्टी कमी झाली त्यामुळे दिसणे खूपच कमी झाले. मनात यूपीएससी करायचे असे ठाम मत होते. आई वडील भाऊ बहीण या सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केले. कॉलेजमध्ये शिकत असताना सहकारी मित्र व अनेक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन मिळाले. दृष्टी कमी झाल्यामुळे यूपीएससीच्या अभ्यासात अनेक अडचणी होत्या तरी देखील खचून न जाता ऑडिओ बुक्स, स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास सुरू केला दोन-तीन वेळा अपयश आले तरी डिप्रेशन मध्ये न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करायची. हार मे भी जीत मे भी किंचित नही भयभीत मै !,कर्तव्य पथ पर जो मिला यह भी सही वह भी सही! या उक्तीप्रमाणे प्रवास सुरू ठेवला आणि शेवटी यशस्वी झाले.ए.पी.जे.अब्दुल कलाम व जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे माझे आदर्श आहेत त्यांच्या जीवन चरित्रातून खूप प्रेरणा मिळाली. आयुष्यात किती पण अडचणी असल्या तरी हिंमत न हारता आपण आपले कार्य करत राहिलो तर यश नक्की मिळते. एक्सलन्स इज की टू सक्सेस प्रत्येक काम उत्कृष्टपणे केले तर यश निश्चित आहे. माझ्या जीवनात मी विपश्यनेला खूप महत्त्वाचे स्थान देते त्यामुळे माझे मन स्थिर व आनंदी राहण्यासाठी खूप मदत झाली.विपश्यनेने माझे जीवन पुर्णपणे बदलले.विद्यार्थ्यांनी यूपीएससीचा अभ्यास करताना सकाळी लवकर उठून व्यायाम योगा विपश्यना यांनी जर सुरुवात केली तर अभ्यासात मन प्रसन्न राहते. पूर्व मुख्य परीक्षा व मुलाखत याची तयारी कशी करावी. कोणती पुस्तके वाचावीत उत्तरे लिहिण्याचा सराव कसा करावा वाचन केल्यानंतर थॉट प्रोसेस फार महत्त्वाचे असते ती प्रत्येकाने करावी. यूपीएससीचा अभ्यास करत असताना प्लॅन बी जरूर तयार ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली या मुलाखतीद्वारे पूजा कदम यांचा यशस्वीतेच्या प्रवास ऐकून विद्यार्थी व पालक वर्ग पूर्णपणे भारावला.
दिवेश पाटील
याचबरोबर नुकतेच फ्रान्स या देशातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास करून परत आलेले व अंमळनेरचे रहिवासी असलेले दिवेश पाटील यांनीही आपला शैक्षणिक प्रवास वर्णन करतांना सांगितले की मी चौथीत असताना माझे पितृछत्र हरपले आईने जिद्दीने मला शिकविले दहावीपर्यंतचे शिक्षण अमळनेर येथे पूर्ण करून पदवी शिक्षण पुण्याला पूर्ण केले .अशोका यूनिवर्सिटी कडून परदेशात जायची संधी प्राप्त झाली. कितीही परिस्थिती बिकट असू द्या आपल्याकडे गुणवत्ता असेल तर समाजातील अनेक दाते मदत करण्यासाठी पुढे येतात त्यामुळे परिस्थिती कधीही आडवी येत नाही. जगामध्ये खूप संधी आहेत शिकत असताना आपण त्यांची माहिती करून घेतली पाहिजे माझ्या प्रवासात मला अनेक लोकांनी सहकार्य केले.यावेळी दिवेश व त्याची आई या दोघांचा वाचनालयातर्फे विशेष गौरव करण्यात आला.
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून एक आदर्श निर्माण केलेला आहे. फी न घेता गेल्या सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहात हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आयआरएस पूजा कदम यांनी केले. शिक्षक प्रेमराज पवार सोपान भवरे हे यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विजयसिंह पवार यांनी केले.

