राज्यस्तरीय सत्यशोधक समाज महिला संघाची छत्रपती संभाजी नगर येथे बैठक संपन्न
![]()

राज्यस्तरीय सत्यशोधक समाज महिला संघाची छत्रपती संभाजी नगर येथे बैठक संपन्न
[ क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनी १० मार्च २०२४ रोजी एक दिवसीय महिला राज्य अधिवेशन आयोजनाचा एकमताने संकल्प ]
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५० वर्षेपूर्तीच्या निमित्ताने सावित्रीमाईंच्या लेकींचे विशेष अधिवेशन आयोजनाच्या उद्दिष्टाने छत्रपती संभाजी नगर येथील श्रेय नगरमध्ये रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी अनौपचारीक बैठक सत्यशोधिका वंदनाताई वनकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.बैठकीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागपूर,वैजापूर,माळीवाडा,नाशिक, छत्रपती संभाजीनगर,जळगाव,बुलढाणा येथून कार्यकर्त्या नियोजीत बैठकीसाठी बहुसंख्येने उपस्थित होत्या.सभेत सांगोपांग चर्चेअंती एकमताने पुढील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
१ ) शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला,रांगोळी स्पर्धा आयोजन करून सत्यशोधकीय विचारांचे बिजारोपण करणे.२ ) महिला सक्षमीकरण अभियान राबवणे.३ ) महिलांना वैचारीक व्यासपीठ उपलब्ध करून समाजोन्नती व राष्ट्रीय सेवेचे कृती कार्यक्रम देऊन महिलांना अष्टपैलू बनवणे.४ ) महिन्यात किमान १ बैठक घेऊन वैचारिक मंथन करून नियोजनबद्ध सृजनशील कार्यक्रम घेणे.५ ) क्रांतिज्योती सावित्रीमाई,राजमाता जिजाऊ भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ,माता रमाई यांचे स्मृतिदिन,जन्मदिन वैचारिक पद्धतीने नियोजनबद्ध साजरे करणे.६ ) उपस्थित कार्यकर्त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीआईच्या स्मृतिदिनी १० मार्च २०२४ रोजी ‘ सावित्रीआई स्मृती संकल्प अभियाना ‘ अंतर्गत एक दिवसीय महिला राज्यस्तरीय अधिवेशन सावित्रीमाईंच्या माहेरी नायगाव येथे आयोजित करून सर्व शक्तिनिशी यशस्वी करण्याचा दृढ निर्धार केला.७ ) अधिवेशनाच्या पूर्वतयारी साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तळागाळाच्या सर्वस्तरातून ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींसह उत्साही व अभ्यासू नुतन कार्यकर्त्या भगिनींना प्रत्यक्ष संपर्क करून आमंत्रित करावे.
सभेस अनिताताई देवतकर,शशिकला हरकळ,डॉ.कुंदा धुळे,सुभद्रा तांबे,सुरेखा दणके,संगिता खोबरे,अनिता बनकर,कल्पना जाधव,कल्पना महाजन,सुनीता जाधव,मनीषा वारे ,अक्षदा तांबे,सविता खोबरे,रूपाली हिवाळे,ज्योती तांबे,प्रमिला गांगुर्डे,कविता महाजन,आस्था खैरनार,कृतिका तांबे मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.
सभेच्या प्रारंभी भगवान पांडुरंग यांनी महात्मा जोतीराव-सावित्री गौरव गीत कमलेश हटवार (नागपूर ) यांनी सुमधुर आवाजात सादर करून वातावरण निर्मिती केली.सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार,संस्थापक राज्यसचिव डॉ.सुरेश झाल्टे व डॉ.धुळे यांनी महिला अधिवेशन यशस्वी करण्यासाठी काय काय केले पाहिजे याबाबत सांगोपांग मार्गदर्शन केले.महात्मा जोतिबा फुले लिखित सत्यधर्माच्या सामूहिक प्रार्थनेने सभेचा समारोप झाला. सुत्रसंचालन संगिता खोबरे व आभार प्रदर्शन अर्चना खैरनार यांनी केले.सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊन बैठकीची सांगता झाली.बैठकीचे नियोजन सत्यशोधक समाज महिला संघाने केले.

