1 min read

डॉ.आंबेडकरांनी स्रीयांना,शोषित, बहुजनानां आत्मसन्मान प्राप्त करून दिला.
डॉ. मिलिंद बागुल

Loading

डॉ.आंबेडकरांनी स्रीयांना,शोषित, बहुजनानां आत्मसन्मान प्राप्त करून दिला.
डॉ. मिलिंद बागुल
भारतीय जनमानसामध्ये पिढ्यानपिढ्या परंपरेने आलेल्या गुलामगिरीत जगण्याची जी रूढ पद्धती मानसिक गुलामगिरीच्या अनुषंगाने कार्यरत होती ती मानसिकता बदलविण्यासोबतच गुलामीचा काळवंडलेला इतिहास बदलविण्याचे धाडस त्यासोबतच स्रीया, वंचित, शोषित बहुजन वर्गाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे मत साहित्यिक, सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री उद्धाराचे कार्य” या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना, आर्ट सर्कल, होस्टेल कमिटी आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य गौरी राणे होत्या.डॉ.बागुल बोलतांना पुढे म्हणाले,
संविधानाने महिलांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण केला. देशाचे भवितव्य महिलांच्या हाती संविधानानेच दिलेले आहे. जात, धर्म बाजूला सारून प्रत्येकाने डोळसपणे व विज्ञानवादी होऊन डॉ. आंबेडकरांचे साहित्य अभ्यासले तसेच संविधान वाचले तरच हिंदू कोड बिल समजू शकते. खऱ्या अर्थाने आत्मसन्मान जागृत करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून केले असल्याचे देखील त्यांनी मांडले.
प्राचार्य डॉ .गौरी राणे यांनी अध्यक्षीय मनोगतात संविधानामुळेच सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा, दर्जा, आणि मानाचे स्थान प्राप्त झाले आहे, आज आपण संविधानाने दिलेले अधिकार उपभोगत आहोत, मात्र आपल्या कर्तव्याची जाणीवही असणे आवश्यक आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना दिलेले हक्क आणि अधिकारांची जाणीव ठेवत आपण समाजाचे, देशाचे देणे लागतो हे भान ठेवत सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी हा आपला महत्त्वाचा घटक स्त्रियांनी जाणण्याची खरी गरज असून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला या जबाबदाऱ्या लक्षात घेणे काळाची गरज असल्याचे मत देखील त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. राजेश कोष्टी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. रंजना पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच उपप्राचार्य डॉ. पी.एन.तायडे , उपप्राचार्य सुनीता पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *