1 min read

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर-जैताणेत सफाई कामगारांचा सन्मान!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर-जैताणेत सफाई कामगारांचा सन्मान!

निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या सफाई कामगारांना सपत्नीक साडी-चोळी, टोपी-उपरणे, संस्थेचा टी-शर्ट, मिठाईची पाकिटे व गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. निजामपूरच्या जुन्या पोलीस स्टेशनजवळ नुकताच हा नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रम राबविण्यात आला. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे अध्यक्षस्थानी होते.

“दोन्ही गावांची स्वच्छता करणारे सफाई कामगार हे वंचित व दुर्लक्षित घटक खऱ्या अर्थाने स्वच्छतादूत असून संत गाडगे महाराजांनी दिलेला स्वच्छतेचा वसा ते आपल्या कृतीतून चालवतात,” असे यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांनी सांगितले. सफाई कामगारांना दिवाळीचा फराळही यावेळी वाटप करण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक बापूजी जगदाळे, कैलास सोनवणे, भय्या गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या संचालक मंडळासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दोन्ही गावातील सफाई कामगारांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सुनील वाघ व गीताबाई वाघ ह्या सफाई कामगारांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सपत्नीक पूजन करण्यात आले व पुष्पहारही अर्पण करण्यात आला. “आजपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात आम्हाला प्रतिमापूजनाचा मान मिळाला नसून मातोश्री सेवाभावी संस्थेने प्रथमच संधी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही सदैव ऋणी राहू,” असे सफाई कामगार सुनील वाघ यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते भय्या गुरव व सुनील वाघ आदींनी मनोगते व्यक्त केली. “सफाई कामगारांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंदी भाव पाहून आम्हाला मनस्वी समाधान वाटले,” असे सामाजिक कार्यकर्ते भय्या गुरव यांनी सांगितले. संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. संस्थेचे उपाध्यक्ष राजनारायण जगदाळे, खजिनदार जगदीश खैरनार, संचालक भारत जाधव, संचालक आशुतोष जगदाळे, संचालक अनुराग जगदाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सामाजिक कार्यकर्ते सईद पठाण, ब्रिजलाल सोनवणे, अमित मोहने, प्रशांत मोरे, संदीप मुसळे, समाधान खैरनार, चेतन शेवाळे, गोपाल वारुडे आदींचे सहकार्य लाभले. दरम्यान जैताणे ग्रामपंचायतीच्या परिसरात संचालक आशुतोष जगदाळे यांनी सफाई कामगारांना दिवाळीच्या फराळासह भेटवस्तू देऊन सन्मानित केले. जैताणे ग्रामपंचायतीचे मुख्य लिपिक यादव भदाणे, कर्मचारी अनिल बागुल, रोहिदास साळुंके आदींनी त्यांना सहकार्य केले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *