स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते !
![]()
स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते !
प्रा डॉ विजय तुंटे; अमळनेरला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

अमळनेर- स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सभोवताली जे काही घडत आहे ते डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. विद्यार्थ्यांमधील योग्यता अचूकपणे तपासण्याचे मंच म्हणजेच स्पर्धा परीक्षा होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये कौशल्य असते, मात्र ते दाखवता आले पाहिजे. तुमच्यातील कौशल्य हे स्वहित, राष्ट्रहित व समाज उपयोगी असले पाहिजे, असे मत येथील प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा सीसीएमसी केंद्राचे संयोजक प्रा डॉ विजय तुंटे यांनी व्यक्त केले. येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र (बीएड) महाविद्यालयात झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत “स्पर्धा परीक्षा काळाची एक गरज” या विषयावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी.पी. चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा डॉ जयेश गुजराथी, प्रा डॉ नयना वाणी, प्रा डॉ जे एन चव्हाण, प्रा डॉ ए के जोशी, प्रा एस सी तायडे, प्रा यु बी पाटील, प्रा के वाय देवरे, प्रा डॉ नरेंद्र पाचपांडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांनी “स्पर्धा परीक्षा व आजचा युवक” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या युवकांनी केवळ स्पर्धा परीक्षा हे टार्गेट न ठेवता आपला “प्लॅन बी” नेहमी तयार ठेवा. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यास खचून जाऊ नका. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या व्यक्तीनुसार समस्यांना सामोरे जा. स्पर्धा ही नेहमी निकोप असली पाहिजे. एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांच्या सहकार्याने हातात हात घालून जीवन प्रवास केल्यास अपेक्षित यश लवकर गाठता येते, यासाठी सकारात्मक वृत्ती जोपासण्याचे आवाहनही त्यानी केले. प्रा डॉ ए के जोशी यांनी सुरुवातीला वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा डॉ ए के जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा डॉ जे एन चव्हाण यांनी आभार मानले. अनिकेत सूर्यवंशी, किरण रावळ, विनोद सोनवणे, राजेंद्र वाघ यांनी सहकार्य केले.
अमळनेर- येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यशाळात बोलताना प्रा डॉ विजय तुंटे. शेजारी उमेश काटे व मान्यवर

