संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांसह साजरा झाला भारतीय वन्यजीव सप्ताह
![]()

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांसह साजरा झाला भारतीय वन्यजीव सप्ताह
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण दक्षता मंडळ संस्था विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रबोधन निर्माण व्हावे म्हणून दरवर्षी निसर्गमेळा आयोजित करते. यावर्षी निसर्गमेळा २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर या दोन दिवशी निसर्गमेळा घेण्यात आला. दरवर्षी निसर्गमेळ्यासाठी विशेष थीम ठरवली जाते. यावर्षी “काजवा” हि थीम घेतली होती. परिसंस्थेतील लुप्त होत असलेले काजवे आपल्या जैवविविधतेत महत्वाची भूमिका बजावत असतात त्याचे संवर्धन केले पाहिजे हा संदेश निसर्गमेळ्यातून देण्यात आला.
पर्यावरण दक्षता मंडळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि एन्विरो व्हिजिल आयोजित निसर्गमेळा आज दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते १२ वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडला.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या स्पर्धाचे नावीन्य म्हणजे या स्पर्धा निसर्गात घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना निसर्ग जतनाची आवड व्हावी म्हणून या स्पर्धाचे आयोजन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात – मानपाडा निसर्ग परिचय केंद्र येथे घेण्यात आल्या. वनस्पती हा निसर्गातील महत्वाचा घटक आणि या विविध वनस्पतीचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या अनुषंगाने “झाडे ओळखा” हि स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्रातील झाडाची निसर्ग भटकंती श्री. सोमनाथ कंग्राळकर (वनपस्ती अभ्यासक) आणि श्रद्धा सोनावणे (वनपस्ती अभ्यासक) यांनी घेतली. या भटकंतीत जवळपास जंगलातील ४० हुन जास्त झाडांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर त्यावर त्यांनी झाडे ओळखा हि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेतली. या स्पर्धेला एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आजच तंत्रज्ञानाचं युग. विद्यार्थ्यांना हेच तंत्रज्ञान वापरून निसर्गातील विविध घटकांची ओळख व्हावी आणि निरीक्षण वाढावे यासाठी निसर्गात जाऊन फोटोग्राफी करणे यासाठी नेचर फोटोग्राफी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी संस्थेने आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. निसर्ग परिचय केंद्रात जी विविधता आहे त्याचे फोटो काढून त्यातील चांगले तीन फोटो परीक्षकांकडे विद्यार्थ्यांनी दिले. या स्पर्धेचे परीक्षण श्री. कुमार जयवंत (फोटो सर्कल सोसायटी) आणि श्री. गणेश शेंडे (पर्यावरण दक्षता मंडळ) यांनी केले. याच ठिकाणी खजिना शोध हि तिसरी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना क्लु दिले जातात आणि एका क्लु वरून बाकी सगळे क्लु ओळखायला सांगितले जाते. खरंतर हि स्पर्धा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता , शारीरिक क्षमता आणि विद्यार्थ्यांना असणारे पर्यावरणाचे ज्ञान ओळखण्याच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरते. या स्पर्धेसाठी परीक्षण डॉ. मानसी जोशी (पर्यावरण दक्षता मंडळ), डॉ. प्राची सावंत (पर्यावरण दक्षता मंडळ) आणि सौ. अनुजा वाशिवले (पर्यावरण दक्षता मंडळ) यांनी केले.
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी, लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ च्या पर्यावरण विभाग मुख्य लायन नयना तारे, लायन्स क्लब ठाणे नॉर्थ च्या फर्स्ट लेडी लायन हर्षदा एच टी, लायन्स क्लब ठाणे नॉर्थचे लायन अशोक गिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिमंडळ वन अधिकारी श्री रमाकांत मोरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनरक्षक श्री. सुभाष चव्हाण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनरक्षक बाळू शेळके व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि निसर्ग माझा आहे या भावनेने निसर्गाला जपले पाहिजे असा संदेश दिला.
आज घेण्यात येणाऱ्या तिन्ही स्पर्धा अनोख्या रंगाढंगात आयोजित केल्या आहेत आणि त्यातला आलेला प्रतिसाद बघून मला खूप आनंद होत आहे असे श्री. रमाकांत मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमाला पर्यावरण दक्षता मंडळाचे संस्थापक श्री. विद्याधर वालावलकर, लायन्स क्लबचे सभासद लायन सतीश तारे, लायन अशोक वाडेकर, लायन अर्चना वाडेकर, लायन सुनील कुलकर्णी, लायन रसिक खवणेकर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसेवक श्री. विनोद ठाकूर, श्री. सचिन भौर्य, श्री. राजेंद्र द्यात उपस्थित होते. त्याचप्रमाणे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे स्वयंसेवकही या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्याची मोलाची मदत झाली. त्याचप्रमाणे संस्थेचे स्वयंसेवक सौ. स्वाती पाटील, सौ. राजश्री जगदाळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सर्व स्पर्धेतील विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. सौ. पौर्णिमा शिरगावकर (पर्यावरण शाळा, ठाणे प्रमुख) यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.

