1 min read

श्री गणेशोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात महायागाचे आयोजन; ९ जोडप्यांचा सहभाग

Loading

श्री गणेशोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात महायागाचे आयोजन; ९ जोडप्यांचा सहभाग

अमळनेर : येथील मंगळग्रह मंदिरात श्री गणेशात्सवानिमित्त २३ सप्टेंबर रोजी गणेश महायागाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान दोन सत्रांत पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रांतील एकूण ९ मानकरी सपत्नीक होते. श्री गणेशोत्सवात यंंदा प्रथमच आयोजिलेल्या अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणातील महायागावेळी हजारो भाविकांची साक्ष नेत्रदीपक ठरली.
अंधकासूर आणि महादेव यांच्या युद्धात अंधकासुराचे रक्त व महादेवाचा घाम एकत्रित होऊन भूमीवर पडतो आणि भूमी दोन भागांत विभाजित होते व यातून श्री मंगळदेव प्रकट होतात, हा अतिशय सुंदर देखावा यावेळी साकारलेला होता.
नऊ हा मंगळग्रह देवाचा शुभांक मानला जातो. या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची आकर्षित अन् तितकीच मनोहारी उत्सवमूर्तीसह विविध फुलमाळांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. महायागाच्या प्रारंभी गणपती पुण्याहवाचन मंडल, गौर्यादि मातृका मंडल, चतु:षष्ट योगिनी मंडल, वास्तु मंडल, क्षेत्रपाल मंडल, सर्वतोभद्र मंडल, सूर्यादि नवग्रह मंडल, चतुषष्टि भैरव देवता मंडल व ईशान्य रुद्र मंडल स्थापित करण्यात आले. त्यानंतर पाठांचे हवन करण्यात येऊन सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महाआरतीने महायागाचा समारोप झाला. यासाठी मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, सौरभ वैष्णव, अक्षय जोशी व मेहूल कुलकर्णी यांनी महायाग विधी निरूपणासह पौरोहित्य केले. अंकुश जोशी यांनी नालवर साथसंगत केली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंदिरातील सेवेकरींनी महायाग यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

श्री गणेश महायागाचे महत्त्व
श्री गणेश महायाग विशेषत्वाने गणेश जयंती, गणेशात्सव याप्रसंगी अनेक गणेशभक्त आपापल्यापरीने काही विशेष उद्देश मनात साठवून करीत असतात. गणेश देवतेच्या प्रीत्यर्थ अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने, अभिषेक तसेच आहुती देऊन जो याग किंवा महायाग केला जातो, त्यास सर्वसाधारणपणे गणेश महायाग म्हटले जाते. यात भक्तगण आपल्यावर येणाऱ्या किंवा आलेल्या नानाविध संकटांतून सुटका व्हावी, सर्व प्रकारची विघ्ने दूर व्हावीत, विद्या प्राप्ती व्हावी, तसेच मनातील इच्छा-आकांशा पूर्ण व्हाव्यात यासाठी श्री गणेशाचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावेत, यासाठी श्री गणेश महायाग हे प्रभावी अनुष्ठान मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *