1 min read

प्रा. जे.बी.जैन सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

Loading

प्रा. जे.बी.जैन सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचे
संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. जे. बी. जैन यांचा सेवापूर्ती सोहळा दि.३१ऑगस्ट रोजी पूज्य सानेगुरुजी सभागृहात संपन्न झाला. संख्याशास्त्र विभागात त्यांनी ३७ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी महाविद्यालयापासून तर विद्यापीठस्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. महाविद्यालयातील परीक्षा विभागाच्या कामात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच प्राध्यापक संघटनेतील त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. या कृतज्ञतेतून त्यांचा एन.मुकटो, एन.मुक्ता, व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने महाविद्यालयात सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते. यावेळी व्यासपीठावर कबचौउमवि जळगावचे माजी प्रभारी कुलगुरू प्रा.शिवाजीराव पाटील, माजी प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर. शिरोडे, प्रा. जे.बी.जैन, सौ.अनुपमा जे. जैन, एन.मुकटो स्थानिक शाखेचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, एन. मुक्ता स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ. नीलेश पवार, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे हे उपस्थित होते.
या सेवापूर्ती समारंभानिमित्त माजी प्रभारी कुलगुरू डॉ. शिवाजीराव पाटील म्हणाले की, “नोकरीच्या काळात कौटुंबिक स्तरावर आपल्याकडून अनेक महत्वाच्या गोष्टी राहून जातात. त्या सेवानिवृत्ती निमित्ताने पूर्ण करायला हव्यात. प्रा. जे बी.जैन यांनी सदतीस वर्ष निष्ठेने सेवा केली,नोकरी करताना आपले अध्ययन व अध्यापनाचे तत्व सोडले नाही. सतत हसतमुख असलेले हे व्यक्तिमत्व आहे.” असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी म्हणाले की, “प्रा. जे.बी.जैन अत्यंत स्पष्ट आणि परखडपणाने बोलणारा माणूस आहे. ते नेहमीच अध्ययन व अध्यापनाशी एकरूप राहिले. संख्याशास्त्र विभागात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.”असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. पी. बी. भराटे या वेळी बोलताना म्हणाले की, “महाविद्यालयातील विविध कामांमध्ये प्रा.जे.बी.जैन यांनी मोलाचे योगदान दिले आहे. संख्याशास्त्र विभागाला त्यांनी सतत प्रवाहित ठेवले. सामाजिक कार्यातही ते नेहमी तत्पर राहिले आहेत. सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी विभागाला व महाविद्यालयाला सहकार्य करावे” अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्याचप्रमाणे सिनेट सदस्य प्रा.डॉ. संदीप नेरकर, प्रा. एस. बी. सोनार, डॉ. नलिनी पाटील, माजी उपप्राचार्य डॉ. एस.ओ. माळी, प्रा.डॉ. विजय तुंटे प्रा.आर.पी. बडगुजर, प्रा. एस. आर. पाटील, इंजि. गिरीश पाटील, डॉ. दिनेश पाटील (शिरपूर), प्रा. एस.के.सोमानी यांनी प्रा.जे.बी.जैन यांच्याप्रती असलेला स्नेहभाव व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना प्रा.जे.बी.जैन म्हणाले की, “खान्देश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयाकडून मला सतत सहकार्याची भावना मिळत गेली, प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाला, विविध कामं करण्याची संधी मिळाली. त्यांचे अनंत ऋण माझ्यावर आहेत. त्यातच मी कृतकृतार्थ झालो आहे.” अशी भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए.बी.जैन म्हणाले की, “महाविद्यालयाची विविध कामे त्यांनी अत्यंत सेवावृत्तीने आणि समर्पण भावनेने केले. परीक्षेची व इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडल्या. प्रा.जे.बी.जैन हे अतिशय तत्वनिष्ठ व रोखठोक विचारसरणीचे व्यक्ती आहेत.” अशी भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्रचार्य प्रा.डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा.डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा.डॉ. विजय मांटे, कुलसचिव आबासाहेब मैराळे, कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच प्रा. जे.बी.जैन यांच्या परिवारातील सदस्य तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार परिसरातील प्राचार्य, प्राध्यापक,माजी प्राध्यापक, विद्यार्थी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. जे.बी.जैन यांच्याकडून सुरुची भोजन देण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश तोरवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *