आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ अनेक त्रुटींनी युक्त !
![]()

आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ अनेक त्रुटींनी युक्त !
येत्या ३० ऑगष्टपासून पाकिस्तानच्या यजमान पदाखाली पाकिस्तान व श्रीलंकेत हायब्रीड स्वरूपात एकदिवसीय सामन्यांची आशिया चषक स्पर्धा १७ सप्टेंबर पर्यंत खेळविली जाणार आहे. हि रचना केवळ भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे करण्यात आली आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, आफगाणिस्तान व नेपाळ हे सहा संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. एकूण तेरा पैकी ९ सामने श्रीलंकेत तर ४ सामने पाकिस्तानात खेळविले जातील तर अंतिम सामना श्रीलंकेतच होणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे आतापर्यंत सर्वाधिक सात विजेतेपद मिळविणाऱ्या भारताने आपले आठवे विजेतेपद मिळण्याच्या आशेने १७ + १ = १८ सदस्यीय संघ निवडला आहे. वरकरणी भारताचा संघ मजबूत, समतोल व विजेतेपद मिळविण्यासाठी भक्कम असा भासत आहे. मात्र वास्तवता वेगळीच आहे. फलंदाजांची भक्कम फळी, धारदार तेज ताफा, दर्जेदार फिरकी मारा, उत्तम अष्टपैलू खेळाडू असा कागदोपत्री नजर दिपवणारा भारताचा संघ दिसत आहे. परंतु या तगड्या भासणाऱ्या संघात अनेक त्रुटी असून या अनेक दोषयुक्त टिम इंडियावर एक दृष्टीक्षेप टाकूया... संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. आयपीएलचे सर्वाधिक पाच विजेतेपद रोहितने मुंबई इंडियन्सला मिळवून दिले असल्याने त्याची टिम इंडियाचा कर्णधारपदी नियुक्ती झाली. मात्र मागील टि-२० चा आशिया चषक, टि-२० विश्वचषक, कसोटीचा विश्वचषक याच रोहितच्या नेतृत्वाखाली भारताच्या हातून निसटले. मात्र यावेळी रोहितकडे सर्व भारतीय क्रिकेट रसिक मोठया आशेने पाहात आहेत. शिवाय त्याचा फिटनेस व फलंदाजीतील अनियमित यशस्वीता भारताच्या यशाची कशी पायाभरणी करते हे बघणे मनोरंजक ठरेल. रोहितचा दुसरा सलामीचा साथीदार शुभमन गिल आयपीएल मध्ये जोशात होता. तोच जोर त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात दाखविता येत नाही. शिवाय सलग अपयशानंतर संघातून हकालपट्टी होणार हे लक्षात आल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलेल्या सामन्यात स्वार्थी खेळ करून संघातील स्वतःची जागा राखण्यात यशस्वी होण्याची हि चाल किती काळ त्याला साथ देते. यावरच त्याचे व संघाचे यश अवलंबून असेल. भारताचा या संघातला सर्वात यशस्वी फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली बऱ्यापैकी फॉर्मात परतला आहे खरा पण तो रोहितला विजेता कर्णधार म्हणून बनविण्यात खरोखर अग्रणी राहील ? सुर्यकुमार यादव या संघात निवडला गेला आहे. पण टि२० मध्ये मिळालेले यश त्याला एकदिवसीय सामन्यात मिळत नाही. त्यामुळे त्याची हि निवड आश्चर्यकारक मानली जाते. परंतु सुर्याला या वेळी चमकणे भारताच्या यशासाठी गरजेचे असणार आहे. अन्यथा वनडेच्या पटलावरून या सुर्याचा अस्त दूर नसेल. यष्टीरक्षक - फलंदाज लोकेश राहुल आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतरच्या शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होऊन संघात परतला खरा, परंतु त्याच्या तंदुरुस्तीवर दस्तुरखुद्द निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राहुलचे खेळणे व यशस्वी होणे
गुलदस्यातच दिसते. त्यामुळेच राहुलला कव्हर म्हणून संजू सॅमसनची राखीव खेळाडू म्हणून निवड झालेली आहे. याच संजू बद्दलच बोलायचे ठरले तर त्याला आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेनुसार फारशी संधी मिळाली नाही, आणि मिळालेल्या संधीचे त्याला सातत्यपूर्ण खेळीत रूपांतरही करता आले नाही. म्हणजे त्याच्या बाबत ठणठण गोपाळच म्हणावं लागेल.
श्रेयस अय्यर हा आणखी एक दुखापतीतून सावरून परतलेला महत्वाचा फलंदाज पण कोणताही स्पर्धात्मक मोठा सराव न करता या स्पर्धेत उतरत असल्याने त्याच्या यशाबद्दल खुद्द निवड समितीलाच साशंकता असल्याने त्याला बॅकअप म्हणून नवख्या तिलक वर्माला वन डे संघात प्रथमच निवडले आहे. तिलक आयपीएलमध्ये चमकल्याने विंडीज विरूध्द पाच टि२० चांगले खेळला मात्र आयर्लंड विरूध्द पहिल्या दोन सामन्यात साफ अपयशी ठरल्याने या स्पर्धेत तो उच्च आत्मविश्वासाने कसा सामोरा जाईल ? हा लाखमोलाचा सवाल उभा राहातोच. संघात दुसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात निवडलेला ईशान किशन त्याच्या पसंतीच्या सलामीला संधी न मिळाल्यास इतर क्रमांकावर तो कितपत यशस्वी ठरेल याबद्दल शंका वाटते. हार्दिक पांड्या उपकप्तान आहे. तंदुरूस्त झाल्यापासून फलंदाजी व गोलंदाजीत बऱ्यापैकी कामगिरी करत आहे. मात्र फिटनेस त्याला कधी दगा देईल
सांगता येत नाही.
जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा हा भारताचा वेगवान गोलंदाजांचा ताफा कागदोपत्री भारदस्त दिसत असला तरी त्यातील बुमराहा व कृष्णा मोठया कालखंडानंतर दुखापतीतून उठून संघात परतल्याने त्यांच्या कितपत यश मिळेल हे सांगता येत नाही. त्यातच हे सर्व उजव्या हाताचे गोलंदाज आहेत. ह्यामध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव नक्कीच जाणवणार हे पक्कं !
हि स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टयांवर होणार असल्याने भारताची फिरकीची बाजू जरा जास्तच लंगडी दिसते. रविंद्र जडेजा, कुलदिप यादव व अक्षर पटेल हे तिघेही डावखुरे असल्याने भारताच्या फिरकी माऱ्यात वैविध्य दिसत नाहीत. शिवाय संघात उजव्या हाताचा ऑफस्पिनर नाही, लेगस्पिनर नाही. त्यामुळे भारताची कमकुवत बाजू विरोधी संघाच्या पथ्यावर पडण्याचीच शक्यता दिसते. या ताफ्यात रविचंद्रन आश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एक जण संघात असायला हवा होता तर यजुवेंद्र चहल या मॅचविनरची उणीव टिम इंडियाला चांगलीच भोवणार हि काळ्या दगडावरची रेष ठरणार !
शिवाय नेहमीसारख अंतिम संघ निवडीचा घोळ भारताला कसा सावरणार हा लाखमोलाचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
एवढया सगळ्या कमजोर बाबीनंतर भारताने बाजी मारली तर ते जगातल्या महाआश्चर्यांपैकीच एक ठरेल.
लेखक –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

