स्पर्धा परीक्षा आणि परिक्षार्थींचा कल..!
-{श्री शरद भिका पाटील
उपशिक्षक,आर्मी स्कूल अमळनेर)
![]()

स्पर्धा परीक्षा आणि परिक्षार्थींचा कल..!
-{श्री शरद भिका पाटील
उपशिक्षक,आर्मी स्कूल,
अमळनेर}
येणाऱ्या काळात अनेक स्पर्धा परीक्षा होऊ घातलेल्या आहेत.त्यानिमित्ताने परीक्षार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यात तलाठी,सरळसेवा,पोलीस,बँकींग इ.भरत्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. या सर्व वातावरणात वेगवेगळी मानसिकता ठेऊन परीक्षार्थी या स्पर्धेत उतरताहेत.काही हौशे-नौशे आहेत.तर काहींची मानसिकता दोन-तीन महिने टाइमपास करता येईल अशी आहे. खऱ्या यशाचा ध्यास असणाऱ्यांची व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असते.
स्पर्धापरीक्षा खरे तर, प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या व दृढनिश्चयी विद्यार्थ्यांसाठी वरदानच आहे.त्यासाठी त्यांनी खालील गोष्टींचे अवलोकन केल्यास या परीक्षांमध्ये यश मिळणं सुकर होईल.
◆१.त्यागाची भूमिका(Sacrifice): जीवनात काही मिळवायचे असेल तर प्रामुख्याने आपल्याला आवडणाऱ्या व वेळखाऊ गोष्टींचा त्याग करावा लागतो. तरच यशाची चव चाखता येते.अस म्हणतात की, ‘त्यागाशिवाय क्रांती नाही’.’आधी त्यागा,मग मागा’.’शोधा म्हणजे सापडेल,मागा म्हणजे मिळेल,ठोठावले म्हणजे तुमच्यासाठी दार निश्चित उघडेल’.आणि म्हणून परीक्षार्थींना स्मार्टफोन्स, उंच दर्जाची कपडे, काम नसताना फिरणे, कट्ट्यावरच्या गप्पा, व्हाट्सऍप, फेसबुकवरची निरर्थक चॅटिंग या सारख्या गोष्टींचा त्यासाठी त्याग करावाच लागेल.ज्यांनी ज्यांनी हा निर्णय घेतला व प्रकर्षाने पाळला,त्याला निर्विवाद यश मिळल्यावाचून राहणार नाही.हे मात्र नक्की.
◆२.आत्मविश्वास(Self- Confidence): सखोल विषय ज्ञान व अविरत सराव या दोन गोष्टींमुळेच ‘आत्मविश्वास’ वाढतो.म्हणून एखाद्या विषयाचा सातत्याने अभ्यास व सराव करणे फार महत्त्वाचे आहे.आणि आत्मविश्वासाशिवाय स्पर्धापरिक्षेत उतरणं म्हणजे शस्त्राशिवाय युद्धात उतरण्यासारखं आहे.’मी ही गोष्ट मिळवेलच’ हा दृढविश्वास मनी असला पाहिजे.आणि त्या अनुषंगाने खडतर मेहनत करण्याची तयारीही असली पाहिजे.
◆३.अथक परिश्रमाची तयारी(Ready to work hard):खूप मेहनत घेण्याची जिद्द मनी असली तरच यशाची कल्पना करावी.यशस्वी होणं पूर्णपणे तुमच्या मेहनतीवर अवलंबून असत. तुम्ही कोणत्या ठिकाणी जन्म घेतलाय,कशा परिस्थितीत गरीबीत का श्रीमंतीत, याला यशाच्या मार्गावर फार महत्त्व राहत नाही.कारण “चांगल्या घरात जन्म मिळणं दैवाधिन असलं, तरी शिल चोख राखणं मात्र प्रयत्नाधीन असतं”.तुम्ही कोणत्याही परिस्थितीत किती मेहनत करू शकता याला महत्त्व आहे.आंतरिक मनातून तुम्हाला वाटलं पाहिजे की, ‘मला जीवनात येऊन काहीतरी करायचंय’.’त्यासाठी मी वाट्टेल ते करेल’.
अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांना दोनवेळच्या जेवणाचीही परवड होती.तरी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशोशिखर गाठलं.आणि अशीही बरीच उदाहरणे आहेत की,ज्यांच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली,परंतु ध्येयाने झपाटल्यामुळे त्यांनी यश पादाक्रांत केले.म्हणून कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी परिस्थिती आड येत नाही.
आणि म्हणूनच खडतर मेहनत करण्याला पर्याय नाही.जीवनातली काही महिने किंवा काही वर्षे प्राणपणाने व प्रामाणिक मेहनत करा.वेडे होऊन अभ्यास करा.यश तुमच्या चरणी लोळण घेईल.कारण विना सायास काहीही मिळत नाही..! ◆४.जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन(Approach towards life):तुमची ऊठबस कोणासोबत आहे.कोणत्या वातावरणात तुम्ही नेहमी राहतात.सकारात्मक की नकारात्मक लोकांशी तुम्ही संपर्क ठेवता.यावरून तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरत असतो.म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे.स्पर्धापरिक्षांबाबत बऱ्याचदा नकारात्मक परीक्षण पाहायला मिळत.मी इतका अभ्यास करतोय,यशस्वी होईल की नाही? इतक्या लोकांमध्ये माझा कुठे टाळा बसणार...! अशा अनेक नकारात्मक विचारांनी त्याची आंतरिक शक्ती कमी व्हायला लागते. पर्यायाने तो अभ्यासात सातत्य राखू शकत नाही.मग त्याच्यासाठी यशाचा मार्ग कठीण वाटायला लागतो. यासाठी उमेदवारांनी नकारात्मक विचार डोक्यातून सपशेल काढून टाकायला हवेत.मला कोणती पोस्ट काढायची आहे,हे निश्चित करून स्वतःला झोकून द्या!किती जागा आहेत?आरक्षण किती आहे? अशा बाबींना फार महत्त्व देऊ नका!एक जागा असली तरी ती माझ्यासाठी आहे,आणि ती मी मिळवेलच!हा सकारात्मक विचार सदोदित आपल्या ठायी असला पाहिजे.तर कुठे-ना कुठे यश पादाक्रांत करता येईल.अन्यथा येरे माझ्या मागल्या अशी गत होईल.नी आपण निराशेच्या गर्तेत सापडल्यावाचून राहणार नाहीत...!
- शरद भिका पाटील

