1 min read

यूथकौन्सिल नेरुळ तर्फे शहापूर येथील खंडुचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Loading

यूथकौन्सिल नेरुळ तर्फे शहापूर येथील खंडुचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

नवी मुंबई : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नेरुळ येथील यूथकौन्सिल नेरुळ या समाजसेवी संस्थेतर्फे शहापूर तालुक्यातील खंडुचीवाडी या जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते पाचवी मधील जवळपास तीस विद्यार्थ्यांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी वर्गात बसण्यासाठी सतरंज्या, शालेय उपयोगी वस्तू स्कूल बॅगा, वह्या, पेन्सिली तसेच टॉवेल्स, रुमाल, साबण तेलाच्या बॉटल, बिस्किट्स, चॉकलेट्स इत्यादी शैक्षणिक तसेच नित्य उपयोगी साहित्याचे वाटप जॉय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर यूथकौन्सिलचे सचिव सुभाष हांडे देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या हस्ते सरस्वती पुजन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारत माता यांच्या प्रतिमांचे पुजन तसेच द्विपप्रज्वलन करण्यात आले. मुख्य शिक्षिका योगीता बिरारी व रेखा बयस यांनी पाहुण्यांचे यथोचित स्वागत केले.

याप्रसंगी यूथकौन्सिलचे शिवाजीराव शिंदे, रमेश सुर्वे, अशोकराव महाजन, दत्ताराम आंब्रे, दिलीपराव चिंचोळे, सुनील कोदे, रविंद्र कांबळे, रमेश माळवदे, सुजाता वाघ, देवकी ताई, अलका बोरसे, पत्रकार अनंत बोरसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांशी संवाद साधताना यूथकौन्सिल या सेवाभावी संस्थेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन गणेश हिरवे म्हणाले की, तुम्ही शाळेत शिकून भविष्यात मोठे होऊन उच्च पदावर काम करायला लागल्यावर, जीवनात यशस्वी ठरल्यावर, आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर आपल्या शाळेला कधी विसरू नका. या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला शिकवलं, आपल्याला घडवलं, संस्कारक्षम केलं त्या शाळेच्या शिक्षकांना आपण कधीही विसरता कामा नये. आपल्याला जी जी शक्य होईल ती ती मदत आपण या शाळेला वेळोवेळी करत राहायला हवी असेही त्यांनी सुचित केले.

मुख्य शिक्षिका योगीता बिरारी यांनी शाळे संबधित विस्ताराने माहिती देतांना हा संपुर्ण आदिवासी भाग असुन येथे केवळ जिल्हा परिषदेच्या शाळा हे एकमेव शिक्षणाचे माध्यम आहे असे सांगत शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. असं सांगून त्यापुढे म्हणाल्या की, ही शाळा अतिशय दुर्गम भागात असली तरी आम्ही कष्टपूर्वक या शाळेच्या मुलांची काळजी घेत आहोत त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुले आणि त्यांच्या पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काम करण्यास आनंद वाटतो. मुलांच्या मूलभूत गरजेच्या वस्तूंची उपलब्धता यूथकौन्सिलने करून दिल्याबद्दल संस्थेचे त्यांनी मनापासून आभार मानले.

सुभाष हांडे देशमुख यांनी सांगितले की, यूथकौन्सिल नेरुळ या संस्थेतर्फे गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत त्यात प्रामुख्याने ग्राम विकास, वनवासी कल्याण आश्रमातील मुले, अनाथ आश्रमातील मुले. आदिवासी क्षेत्रात येत असलेल्या व आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या मुलांना त्यांच्या मूलभूत गरजेच्या वस्तूंची सातत्याने वेळोवेळी उपलब्धता करून दिली जाते. भविष्यात शक्य होईल ती मदत संस्थेतर्फे आपल्या शाळेला केली जाईल असेही त्यांनी सुचित केले. यावेळी शिवाजीराव शिंदे, रमेश सुर्वे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.

बिरारी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे करून कार्यक्रमाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. तर सौ. योगीता बिरारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
——————————-+-
प्रेषक :
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *