1 min read

शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे एक आदर्शवत दैवत – प्रतिक राजेंद्र साळुंखे

Loading

शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे एक आदर्शवत दैवत – प्रतिक राजेंद्र साळुंखे

साळुंखे घराणे हे महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत प्रतिष्ठित क्षत्रिय मराठा घराणे. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील साळुंखे घराणे हे पराक्रमी घराणे म्हणून नावारूपास होते. आपल्या तेजाने पराक्रमाने पुढे आलेल्या या सुर्यवंशीय घराण्याचे गोत्र भारद्वाज. कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि ऐच्छिक आराध्यदैवत श्रीराम. ज्ञानोजींचा वंशवृक्ष फारच विशाल. साऱ्या महाराष्ट्रात व कर्नाटक राज्यात तो विस्तारला आहे. ज्ञानोजींना महादेव, सदाशिव, परशराम, रामचंद्र व गोविंद ( हेच शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी ) हे पाच मुलगे तर सारजाबाई, जनाबाई या दोन मुली.

     देशभक्त क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला लढवय्या वीरांबरोबरच संत परंपरेचाही वारसा लाभला आहे. हा वारसा जपत गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे म्हणजेच शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर येथे दि.९ जून १९१९ रोजी झाला.

      महाराष्ट्रातील शैक्षणीक विकासाचा इतिहास लिहिताना शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या प्रचंड कार्याचा आढावा घेतल्याशिवाय, त्याची नोंद घेतल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. त्यांचे या क्षेत्रातील कार्य फार महत्वाचे व अद्वितीय आहे. बापूजींनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. तन, मन व धन अर्पन केले. अपार कष्ट उपसले. दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा यात पिचत पडलेल्या दुःखी समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही हे बापूजींनी ओळखले होते. ‘ जीवनात उदात्तता वाढली पाहीजे. बोलण्याप्रमाणे कृती असली पाहीजे. तरच स्वतंत्र देशातील नागरिक सुसंस्कारी होतील. ‘ ‘ ज्ञान पवित्र आहे. ते माणसाने मिळवल्यानंतर माणसाचे जीवन पवित्र होईल. म्हणून ते पावित्र्याने  दिले व घेतले पाहिजे. तरच त्याचे परिणाम इष्ट स्वरूपात दिसतील. हे पावित्र्य कटाक्षाने सांभाळून शिक्षणप्रसार झाला आणि होत राहिला तर समाज निकोप राहील, सदृढ बनत जाईल व पर्यायाने सुखी व समाधानी बनेल. ‘ या श्रद्धेने व बदलती परिस्थिती आणि बदलत्या सामाजिक गरजा यांना अनुरूप अशा चिरंतन तत्वांची व त्यांच्या आचरणाची आवश्यकता ओळखून बापूजींनी नवीन शिक्षणसंस्था स्थापन करण्याचे ठरविले.

     ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीवर आधारित सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, त्याग व सेवा या खडतर तत्वांचा अंगीकार करून श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था १९५५ साली सुरू केली. अल्पावधीत या बीजाचे डेरेदार वृक्षात रूपांतर केले. शिक्षणासाठी तहानलेल्या, भुकेल्यांसाठी, दीन-दलितांसाठी त्यांच्या दारापर्यंत गंगोत्री नेऊन पोहचवली. सामान्य माणसांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची प्रकाशवाट खुली केली. बहुजनातील हजारो गुरुदेव कार्यकर्त्यांची कुटुंबे उभी राहीली. लाखो मुले शिकली. बापूजींनी शिक्षणाची गंगोत्री महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यापर्यंत पोहचवली. आजसुद्धा लाखो विद्यार्थी बापूजींनी सुरू केलेल्या शैक्षणीक डेरेदार वटवृक्षाखाली आयुष्याची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात. बापूजींच्या विचारांचे आचारात रूपांतर करीत श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने सुमारे ४०० हून अधिक शाळा महाविद्यालये उभी करून शिक्षणाची ज्ञानगंगा आज सात दशकांनंतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.

     बापूजींनी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या निर्मितीतून एक आदर्श निकोप, संस्थात्मक स्वरूप महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. बापूजींच्या आदर्श जीवनाचे व सुसंस्कृत मनाचे उत्कट चित्रन संस्थेच्या ब्रीदवाक्यात दृष्टीगोचर होते. ” ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार ” हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य. बापूजींना या ब्रीदवाक्याचा जो नेमका अर्थ अभिप्रेत आहे तो असा. ज्ञान म्हणजे सत्य, प्रेम, चारित्र्य, प्रामाणिकपणा, पिळवणूक प्रवृत्तीस आळा, सेवा आणि त्याग यांचे ज्ञान. विज्ञान म्हणजे या तत्वांचे आचरण. हे आचरण केल्याने मनुष्य सुसंस्कारी बनेल व सुसंस्कारी मनुष्यच ईश्वराचा अविष्कार आहे. आणि यांसाठी शिक्षणप्रसाराची आवश्यकता आहे. ही बापूजींची जीवन निष्ठा आहे.

     शिक्षणक्षेत्रातील बापूजींचे भव्य-दिव्य कार्य पाहून समाज त्यांना ‘ शिक्षणमहर्षी ‘ म्हणू लागला. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘ दलित मित्र ‘ या किताबाने गौरविले. ११ फेब्रुवारी १९८६ रोजी शिवाजी विद्यापीठाने त्यांना ‘ डी.लिट ‘ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अशा प्रकारे स्वतः चंदनासारखे झिजून बहूजन समाजास शिक्षणरूपी प्रकाश देणाऱ्या थोर महापुरुषाची प्राणज्योत ८ ऑगस्ट १९८७ रोजी पंचतत्वात विलीन झाली.

     आपल्या त्यागमय जीवनाने हजारो कार्यकर्त्यांना स्फूर्ती व ऊर्जा पुरविणारे महापुरुष शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांनी जिथे चिरविश्रांती घेतली तो समाधी परिसर आजही गुरुदेव कार्यकर्त्यांना स्फूर्ती व प्रेरणा देतो. अशा थोर महापुरुषाचा,देवदूताचा नातू होण्याचे भाग्य माझ्या नशिबी लाभले. जीवन सार्थक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *