प्रोत्साहन अनुदान रखडले ; हजारो शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत !
![]()
प्रोत्साहन अनुदान रखडले ; हजारो शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत !
जळकोट / प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जळकोट तालुक्यासह अतनूर परिसरातील २८ गाव-वाडी-तांडा-वस्तीतील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.
यापुर्वी बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला असताना बाकीचे हजारो शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच खरीपातील सोयाबीनसाठी घेतलेल्या पिकविम्याची रक्कम देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शासनाने जाहीर केलेली पहिली, दुसरी आणि तिसऱ्या यादीत अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. आता चौथी यादीतील अतनूर परिसरातील २८ गाव-वाडी-तांडा-वस्तीतील शेतकरी अनुदानाची रक्कम कधी मिळणार यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तहसलिदार कार्यालय आणि सहकारी सेवा संस्थांमध्ये विचारणा करत आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयसह कोणतीही संस्था याबद्दल ठोस आणि योग्य उत्तर देत नाही. त्यामुळे ही रक्कम मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या हजारो शेतकरी शासकीय सर्व नियम आणि अटींमध्ये पात्र ठरले असतानाही त्यांना अनुदानाच्या रक्कमेपासून वंचित ठेवले जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सोयाबीन, मूग, तूर, उडीद, आणि खरीप व रब्बी पिकासाठी पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचे पिक गारपीठ, अतिवृष्टी व पुरामध्ये गेले आहे. त्याचा पंचनामा झाला. शासनाने ही रक्कम ताबडतोब देण्यास सांगितले असतानाही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखेची व राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या आदेशाला जुमानत नाहीत, असे चित्र आहे…..
‘शासनाकडून वारंवार घोषणा करुनही पीककर्ज प्रोत्साहनात्मक आणि पिक विम्याची रक्कम दिली जात नाही. हजारो शेतकरी यापासून वंचित आहेत.
बी.जी.शिंदे,शेतकरी अतनूर

