संजीवन समाधी सोहळा- त्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराजाबद्दल दोन शब्द-
![]()

संजीवन समाधी सोहळा- त्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज दोन शब्द-
“प्रपंच असून परमार्थ साधावा
वाचे आठवावा पाडुरंग..।”
आपल्या कर्मावर निष्ठा ठेवून कर्तव्याला महत्त्व देणारे तसेच भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत शिरोमणी सावता महाराज हे खरोखरच इतर संतांपेक्षा वेगळे होते. सन १२५० चा तो कार्यकाळ. त्या काळात अज्ञान, अंधश्रद्धा एवढी जबरदस्त असताना सुद्धा समाज प्रबोधनाचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून संत शिरोमणी सावता महाराजांनी केले. आजार, रोगराई हे दैविकोपासुन होत नसून आपल्या सभोवतालच्या अस्वच्छतेमुळे, दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते. असे ते समाजाला पटवून त्या काळात सांगत होते. आणि त्यामुळेच ते इतर संतांपेक्षा वेगळे होते .असं म्हणायला हरकत नाही .समाज मनाचे शारीरिक आजाराबरोबरच, मानसिक आजारावर त्यांनी अज्ञान ,अंधश्रद्धे विरुद्ध एक जोरदार लढा दिला. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खर्ची घातले. ते सुद्धा आपलं कर्तव्य करून आपला घर संसार प्रपंच सांभाळून….! समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी अविरत केले.
पंढरपूर पासून 18 मैलावर असलेल्या अरण भेंडी गावात परसू माळ्याच्या पोटी संत सावता महाराजांचा जन्म झाला. आई नंदिता तसेच वडील परसूला खूप आनंद झाला. दिवसभर शेतात राबावे.मेहनत करून, त्यातूनच थोडीशी जमीन त्याने खरेदी केली. भाजीपाला ते पिकवू लागले. आणि त्याच शेतात संत सावता महाराज विठ्ठल भक्ती रमू लागले. आई वडील सुद्धा विठ्ठल भक्ती मध्ये रमू लागल्यामुळे संत सावता महाराज वडिलांना शेताच्या कामात मदत करीत .त्याचबरोबर भजन सुद्धा करू लागले .मोट चालवणे ,वाफे बांधणे, भाजीपाला विकायला घेऊन जाणे। असे सर्व काम करू लागले. त्याचबरोबर” तहानलेल्या पाणी भुकेलेला अन्न देऊ लागले” सावताची अशी कामाप्रती निष्ठा व विठ्ठल भक्ती पाहून गावचे पाटील भानवसे खूष झाले. त्यांनी आपली मुलगी जनाबाई साठी सुयोग वर म्हणून सावताची निवड केली. परसु व नंदिता बाईला सून म्हणून जनाबाई पसंत पडली. सावता जनाबाईच्या विवाह झाला. आहे जनाबाई स्वतः कष्टाळू होती. तिला सावताच्या विठ्ठल भक्तीच्या खूप अभिमान वाटे. संत सावता मळ्यात काम करता करता विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन होत .आरण भेंडी गाव पंढरपूर पासून जवळ असल्यामुळे पंढरपूरला जाणारे वारकरी त्या गावावरून जात. त्याच्या घरावरूनच तो रस्ता होता .येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांचे ते स्वागत करीत .त्यांच्या मळ्यात वारकरी विश्रांती घेत .तरी स्वतः कधी विठ्ठल भेटीला पंढरपूरला गेले नाहीत .कुणी वारकऱ्यांनी त्यांना पंढरपूर भेटीच्या आग्रह केला तर ते म्हणायचे-
“कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी
लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी
मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी
सावता ने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा”
हातचे काम सोडून पंढरपूरला जावे असे त्यांना कधीच वाटले नाही .ते उत्तम प्रकारे कीर्तन करू लागले. त्यांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी वाढू लागली .काशीबा गुरव त्यांचे अभंग लिहून घेऊ लागले .मुखी विठ्ठलाचे नाम व हातात शेतीचे काम .सावता कामात तल्लीन तसेच ते देवाचे नाव घेताना सुद्धा तल्लीन होत .त्यांची वृत्ती साधी सरळ आचरण विनयशील होते. ते नम्रपणाने आपलं काम करीत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढू लागली .त्यांच्या कीर्तनाला गर्दी वाढू लागली .
नेमके हेच ओमकार स्वामी तसेच महादेव शास्त्रीला आवडले नाही.।
“एका शूद्र कीर्तन करतो .त्याला कीर्तन करण्याचे अधिकार कोणी दिला…? त्याने मळा राखावा. फुलबाजा लावाव्यात .वेळ पडल्यात फुलांचे हार करून विकावे पण कीर्तन करून शुद्रा मध्ये जागृतीचे काम करू नये..?”
महादेव शास्त्री आग ओकतात.
हजारो वर्षाच्या जातीभेदाच्या ,उच-नीच च्या शूद्र अति शुद्रा च्या त्या लढ्यात संत सावता महाराजांची होरपड होते।
त्यात नागराच्या पाळाला भला मोठा दगड अडकला. तो संत सावता महाराजांनी उचलून बांधावर ठेवला. आणि निमित्त मात्र झाले.
” म्हसोबाचा कोप झाला शिवाय राहणार नाही ‘
नेमकं त्याचवेळी गावात पटकी आली .आणि गावात पटकीची साथ पसरली .लोक आजारी पडू लागले. म्हसोबा कोपला म्हणून गावात ओंकार स्वामी अफवा पसरू लागले. सावताने शेतात म्हसोबा हलवला म्हणून गावात पटकी पसरली असं सांगू लागले .
सावता चे काम सुरू होते .मुखी अभंग रचले जात होते .मळ्यात भाजीपाला बहरत होता.
आमची माळीयाची जात शेत लावू बागायत
आम्हा हाती मोठा नाडा पाणी जाते फुल झाडा
शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई वाली
सावता ने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा
गावातील सारे शेतकरी गोळा झाले. निमित्त मात्र झाले. संत
सावता महाराज मुळे कोप झाला .सारे महाराजांना बकरा देण्यास सांगतात .
परंतु मुक्या जनावराचा बळी देणे महाराजांना मान्य नव्हते. ते लोकांना समजवण्याच्या प्रयत्न करतात परंतु महादेव शास्त्री गावात गैरव समाज पसवतात .
-आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक संत सावता महाराजांच्या मळ्याचे नासाडी करतात .सार शेत भुई सपाट करतात. सावताला मारझोड करू लागतात. ते जखमी घेऊन खाली कोसळतात.
तरीही ते शांत असतात .त्याही संकटातून ते बाहेर पडतात .पुन्हा आपला मळा मेहनतीने पेरतात.
जुन्या गोष्टी विसरून पुन्हा कीर्तनात रंगून जातात . .
इकडे पुन्हा भाजीपाल्याने मळा बहरू लागतो .घर संसार वेल ही रंगते. जनाबाई व संत सावताला मुलगी होते तिचे नाव “नागू “ठेवले जाते. त्याचवेळी नियतीला काही वेगळेच मान्य असतं. ज्याने संत सावता विरुद्ध अफवा पसरली त्यात महादेव शास्त्री चा मुलगा तापाने आजारी पडतो. पुष्कळ औषधी होतात परंतु ताप उतरत नाही. त्यावेळी नाईलाजाने सावताला बोलावणं पाठवलं जातं. लाजे शरमेने महादेव शास्त्री खाली मान घालून उभा असतो. तरीही संत सावता इलाज करतात . त्याचा ताप कमी करतात. त्या ला वन औषधी दिली जातात .दोन दिवसात मुलगा चांगला होतो .महादेव शास्त्री खाली वाकून संत सावता चे पाय धरतात.
“सारी ही पांडुरंगाची कृपा..!” संत सावता सहज बोलतात.
त्या ची आपल्या शेतीवरील निष्ठा व पांडुरंगाची भक्ती साऱ्या पंचक्रोशीत पसरते . किर्तनाच्या माध्यमातून आपल्या कामाची महती ते सांगतात. कर्म हेच महत्त्वाचे ,आपल्या कामातच विठ्ठल भक्ती आहे .असं सांगतात. दिवसा मळ्यात राहून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करतात .त्यामुळे संत ज्ञानेश्वर ,संत नामदेवासारखे विठ्ठल भक्त त्यांच्या दर्शनासाठी आतुर होतात . संत नामदेव तसेच संत ज्ञानदेव हे नियमित पंढरपूरची वारी करीत असतात .विठ्ठलाच्या नाम जप करीत असतात. त्या उलट संत सावता महाराज कधीही पंढरपूरची वारी करत नाही. परंतु आपल्या आरण भेंडी येथील मळ्यात मेहनतीने आपल्या भक्तीचा मळा बहरवितात. त्यांची ख्याती जसजशी पसरते .तसे संत नामदेव व संत एक ज्ञानदेव एक दिवस स्वतः अरणभेडीला भेटीला येतात .
“आपल्या वाटेला असलेले काम चांगल्या प्रकारे करणे हीच आपली भक्ती ..!
संत सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाहीत पण त्यांच्या
तिल पाडुरंगा ची खरी भक्ती बघुन संत नामदेव व संत ज्ञानदेव प्रसन्न झाले
धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निदान सावता तो
सावता सागर प्रेमाचा आगर
घेतला अवतार माळ्याद्वारीअसे संत सावता काबाडकष्ट करून ,सारं जीवन व्यतीत झाल्यावर सारे शरीर थकले.
ईकडे मळा बहरत होता. पहिल्यांदाच त्रास देणारे सारे लोक आता त्यांचे भक्त बनले होते.
देवाचे बोलावून आलं.
तापाच्या रूपाने संत सावता महाराज आजारी पडले .जनाबाई त्यांची सेवा करू लागली.
“मी फार भाग्याची आपल्यासारखे विठ्ठल भक्त, पती मला मिळाले. मला उपदेश द्या.।
जनाबाई म्हणाली.
“मी कोण पंडित.. मी तुला काय उपदेश देणार ..?तरी सांगतो.. विठ्ठलाला विसरु नको ..सारं विश्व हे त्याचे रूप आहे.. दिलेले काम प्रामाणिकपणे कर…!”
ते उपदेश करतात .
-आणि दिनांक 12 जुलै 1295 रोजी विठ्ठल नामाच्या जप करीत या जगाच्या निरोप घेतात .
एक महान कर्मयोगी भक्त आपल्यातून निघून जातो. अत्यंत साधा, कामात रमणारा हा संत होता. मृत्यूनंतर सुद्धा स्वर्ग सुखाची अपेक्षा न बाळगणारा हा महान संत होता..!
गोकुळ बागूल अमळनेर. मो.9422276140

