अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
![]()


अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र)
: विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या मुख्यप्रतोदपदी व विरोधी पक्ष नेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली. आहे. काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे संपर्क साधला असता प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. या राजकीय धुळवडीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर अनेक मिम्स वायरल होत आहेत. शरद पवार मात्र पत्रकार परिषदेत अत्यंत शांत व खेळीमेळीच्या वातावरणात होते. कोणत्याही प्रकारची न्यायालयीन लढाई मी लढणार नाही असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इडीच्या दबावाखाली अनेक आमदार व नेते आहेत व त्यामुळे राजकीय चिखल होत आहे अशी प्रतिक्रिया विजय महाजन यांनी दिली. तर जितेंद्र पंचाल यांच्या मते राजकीय नेत्यांवरील सर्व सामान्य माणसांचा विश्वास उडत चालला आहे अशी टिप्पणी केली. नव्या मंत्री मंडळातील नियुक्तीमुळे शिंदे गटात फार मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे असे मत उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी व्यक्त केले…
अमळनेरला राष्ट्रवादीचे आमदार अनिल दादा पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करत पेढे वाटप केले.. जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील म्हणाल्या की अनिल दादाच्या रूपाने मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे अमळनेर तालुक्याचा विकास जलद गतीने होईल व दादांच्या कामाचे चीज झाले. राष्ट्रवादीने जो विश्वास दाखवला तो आम्ही कदापी विसरू शकत नाही.. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आनंद व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे धन्यवाद व्यक्त केले..





