1 min read

कला शाखेच्या विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा.– जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.

Loading

कला शाखेच्या विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा.– जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.

जळगांव: सध्या जिल्ह्यात इ.११वीच्या प्रवेशाची लगबग सुरु आहे. सालाबादप्रमाणे यंदाही जिल्ह्याचा इ.१०वीचा निकाल उत्तम लागलेला असल्याने विद्यार्थी संख्येची अडचण येणार नाही असा कयास होता. मात्र वर्तमान परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात कला शाखा मरणासन्न अवस्थेतून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जेमतेम पास झालेले विद्यार्थी विज्ञान शाखेतच प्रवेश घेत असल्याने कला शाखेकडे बघण्याची विद्यार्थी आणि पालक वर्गाची नकारात्मक भूमिका कला शाखेच्या मुळावर उठलेली आहे. ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालयांत देखील विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी अनुत्सुक आहेत. आजतागायत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या पूर्ण झालेली नाही. वास्तविक कला शाखेतून प्रशासकीय अधिकारी, कायदेपंडित होण्याची संधी असते. मात्र असे असूनही विद्यार्थीवर्ग कला शाखेत प्रवेश घेण्यास स्पष्ट नकार देऊन विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी आग्रह करत आहेत. भरीस भर म्हणून स्वयं अर्थसहाय्य तत्वावरील कनिष्ठ महाविद्यालये देखील जेमतेम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता सरसकट विज्ञान शाखेत प्रवेश देत असल्याने कला शाखेला घरघर लागलेली असल्याचे भीषण चित्र निर्माण झालेले आहे. काही वर्षांपूर्वी वाणिज्य शाखेबाबत अशीच पठारावस्था निर्माण झालेली असताना शासनाने धोरणात्मक निर्णय घेत विद्यार्थी संख्येची अट शिथिल केल्याने सदर विद्याशाखेचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले होते. आज तशीच अवस्था कला शाखेबाबत निर्माण झालेली असल्याने या मूळ विद्याशाखेचे अस्तित्व टिकवण्यासाठी वरीष्ठ महाविद्यालयांना संलग्न असलेल्या शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या १२० वरून ६० आणि ग्रामीण माध्यमिकला संलग्न असलेली उच्च माध्यमिक विद्यालयांत ८० वरून ४० करणे नितांत गरजेचे ठरलेले आहे. असे न झाल्यास नजीकच्या भविष्यकाळात विद्यार्थी संख्येअभावी शिक्षक वर्ग अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झालेली आहे. अंशतः अनुदानित तत्वावरील शिक्षक बंधू -भगिनी तर आपली नोकरी कायमची घालवून बसतील अशी विदारक स्थिती निर्माण झालेली आहे.

शासनाद्वारे विनाविलंब कला शाखेची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून सदर विद्याशाखा जिवंत ठेवण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा नंदन वळींकार, प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष), प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.शैलेश राणे प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष), प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष), प्रा.सुधाकर ठाकूर (अध्यक्ष जळगाव ग्रामीण) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *