1 min read

पत्रकारांची हक्काची चळवळ मोडून काढण्याचा कुटील डाव हाणून पाडा

Loading

पत्रकारांची हक्काची चळवळ मोडून काढण्याचा कुटील डाव हाणून पाडा

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे राज्यातील समग्र पत्र सृष्टीला आवाहन

मुंबई- 85 वर्षाची लढाऊ परंपरा असलेली स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय योगदान असलेली मराठी पत्रकार परिषद हक्काची चळवळ मोडून काढण्याचे षडयंत्र सध्या सुरु असून माध्यम स्वातंत्र्य टिकावे असे ज्यांना वाटते त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व कुटील डाव हाणून पाडावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी राज्यातील पत्रसृष्टीला केले आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलेल्या, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या, आणीबाणी आणि बिहार प्रेस बिलाच्या विरोधात तुरूंगवास भोगणाऱ्या आणि 85 वर्षांची लढाऊ परंपरा असलेल्या देशातील सर्वात जुनी पत्रकार संघटना अशी ओळख असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला बदनाम करण्याची एक “शिस्तबद्ध” मोहिम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.. शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने उभी केलेली पत्रकारांच्या हक्काची चळवळ मोडून काढत पत्रकारांचा आवाज बंद करण्याचे षड्‌यंत्र या मोहिमेमागे आहे.. माध्यम स्वातंत्र्य टिकले पाहिजे असे ज्यांना वाटते अशा सर्वांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे..राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद मराठी पत्रकारांची पहिली आणि एकमेव सर्वसमावेशक संस्था आहे.

1982 साली दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बिहार प्रेस विधेयक आणून जेव्हा पत्रकारांची लिखाण स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठी पत्रकार परिषदेने आवाज उठविला, सत्याग्रह, तुरुंगवास भोगला, सरकारला हे बील मागे घ्यावे लागले. आणिबाणीतही अनेक दैनिकांच्या कार्यालयाला टाळे लागले होते, त्यावेळी मराठी पत्रकार परिषदेने आपला आवाज बुलंद ठेवला. अनेक संपादंकांनी तुरुंगवास भोगला. अग्रलेखाची जागा मोकळी ठेऊन काळी चौकट टाकून आणीबाणीचा निषेध केला. असे नमुद करीत एसेम देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात आणखी कितीही पत्रकार संघटना निघाल्या तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू कारण गटातटाने का होईनात पत्रकार संघटीत झाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. आमचा विरोध आहे तो मालक पुरस्कृत संघटनांना; कारण बड्या भांडवलदार मालकांना पत्रकारांची चळवळ मोडीत काढावयाची आहे आणि आम्ही हे कदापि होवू देणार नाही असा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला.


,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *