विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
गोऱ्या इंग्रजांचे काळे कारनामे ; भारताचा प्रतिकार सुरूच !
![]()

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
गोऱ्या इंग्रजांचे काळे कारनामे ; भारताचा प्रतिकार सुरूच !
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हल, लंडन येथे सुरू असलेली डब्ल्यूटीसी फायनल अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली असून विजयासाठी आवश्यक असलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशी ३ बाद १६५ धावा जमविल्या असून विजयासाठी अजूनही २८० धावा काढाव्या लागणार आहेत. सामन्याचे चारही दिवस ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतानेही पिछाडीवर असूनही पलटवार करत आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. भारताचा हाच लढा असाच होत गेला तर आजच्या दिवस अखेरीस भारत कसोटीचा
नवा वर्ल्ड चॅंपियन बनला असेल आणि आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा भारत पहिला देश ठरेल. भारत जरी या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमी दिसत असला तरी अंतिम सामना जसा व्हायला हवा अगदी तसाच हा सामना होत असून प्रत्येक जण यातील वेेगळंच थ्रील अनुभवत आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या पडझडीनंतर सावध, सयंमी व नंतर आक्रमक खेळ करत भारतासमोर ४४४ या जादूई धावांचे लक्ष्य ठेवले.
कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने भारताच्या डावाची जोरदार सुरुवात करत ४१ धावांची सलामी दिली. नेमके त्याच वेळेस स्कॉट बोलँडच्या चेंडूवर शुभमन गिलच्या बॅटला चाटून चेंडू स्लिप च्या दिशेने गेला. तेंव्हा तेथे असलेल्या उंच्यापुऱ्या कॅमरून ग्रिनने डावीकडे सुर मारून झेल टिपल्याचे जोरदार अपिल झाले. त्यावेळी तिसरे पंच इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबरो यांनी उपलब्ध पुरावे व घटनेचा योग्य अभ्यास न करता गिलला बाद असल्याचा निर्णय दिला. वास्तविक ग्रीनच्या बोटांमध्ये चेंडू बसण्यापूर्वी जमिनीला पुसटसा घासला होता व नंतर ग्रीनने शिताफीने झेल घेतल्याचे अपिल करून सिलेब्रेशन सुरु केले. मात्र या नंतर स्टेडियम, कॉमेंटेटर बॉक्स, सोशल मिडियावर अक्षरश: हाहाकार माजला.
भारतावर राज्य करणारे गोरे इंग्रज आजही भारताला खाली खेचण्याची कोणतीही संधी सोडत नाही. तसेच अतिशय नाजुक प्रसंगी भारताला पिछाडीवर ढकलण्यासाठी हा मुद्दा पुरेसा होता. नेमके या प्रसंगाला खतपाणी घालण्याचे काम टिव्ही अंपायर इंग्लंडच्या रिचर्ड कॅटलबरो यांनी केले.
याच रिचर्ड कॅटलबरो यांच्या बाबत एक आख्यायिका आहे की, ते आयसीसी स्पर्धांच्या निर्णायक सामन्यात पंच असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झालेला आहे. मग ते मैदानी पंच असो वा टिव्ही पंच. रिचर्ड कॅटलबरो यांच्या या जाणूनबुजून दिलेल्या निर्णयाने भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासाला धक्का पोहचून त्याचा नकळत लाभ दुसऱ्या गोऱ्या म्हणजे ऑस्ट्रेलियाला व्हावा हि गोऱ्या इंग्रजांची काळी रणनिती असल्याचे साफ जाणवते. ” सुंब जळाला तरी पिळ कायम असल्याचाच ” हा प्रकार आहे. नियमानुसार सबळ पुरावे नसल्यास रिचर्ड कॅटलबरो यांनी गिलला नाबाद ठरविणे गरजेचे होते. परंतु असे झाले नाही.
या धक्कयातून भारत सावरतोय असे वाटत असतानाच कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी चेतेश्वर पुजारा त्यांच्या लौकीकाच्या विपरीत बेजबाबदार फटके मारून पाठोपाठ बाद झाले. त्यामुळे भारताचे काम आधीच अवघड असताना आणखी कठीण बनले.
त्यानंतर अनुभवी विराट कोहली व पहिल्या डावातील संघाचा तारणहार अजिंक्य राहाणे यांनी कोणतीही अतिरिक्त पडझड होऊ न देता विश्वविजयाचे दिवास्वप्न घेऊन दिवसाचा समारोप केला.
भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी आजवर जगातला कोणताच संघ करू शकला नाही ती अवघड कामगिरी पार पाडायची आहे. भारताला ४४४ धावांची विजयासाठी गरज असून क्रिकेटच्या आठशे वर्षांच्या इतिहासात आजवर इतक्या धावा चौथ्या डावात करून कोणताही संघ जिंकलेला नाही.
भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे याच मैदानावर सन १९७९ मध्ये इंग्लंडने चौथ्या डावात भारताला ४३८ धावांचे लक्ष दिले होते. दिवसाचा निर्धारीत खेळ संपला तेंव्हा भारताच्या ७ बाद ४२९ धावा झाल्या होत्या. भारताला विजयासाठी केवळ नऊ धावा कमी पडल्यामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपला.
सन १९७५-७६ च्या पोर्ट ऑफ स्पेन येथे विंडीज विरूध्द ४०६ धावांचा यशस्वी पाठलाग भारताने केला असल्यामुळे तशी कामगिरी विद्यमान संघास साध्य होऊ शकते.
सन १९७८ मध्ये अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला ४९३ धावांचे लक्ष दिले होते, मात्र भारत ४४५ धावाच करू शकल्याने भारताला सामना गमवावा लागला होता. तरीही या धावा भारताच्या चौथ्या डावातील सर्वोत्तम धावा ठरल्या असल्याने नेमका आज तोच विक्रम मागे टाकण्याची व विश्व पराक्रम करण्याची संधी टिम इंडिया साधू शकते.
भारतासाठी आणखी दिलासादायक बाब म्हणजे दोन वर्षापूर्वीच कांगारूंच्या भूमीतच त्यांचा ३३ वर्ष अबाधीत असलेला गाबाचा किल्ला भारताचा अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखालील नवख्या संघाने ३२९ धावांचे अशक्यप्राय आव्हान तीन गडी राखून पार करत उद्धवस्त केला होता.
त्यामुळे आता कोहली, राहाणे, जडेजा, शार्दूल, शमी, उमेश, सिराज यांना हे लक्ष गाठण्यास उंच मनोबल मिळेल अशी आशा धरून परमेश्वराजवळ भारतीय विजेतेपदाची प्रार्थना करू या !
लेखक –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

