कृतीतुन साहित्याला रुजविणारा लेखक साने गुरुजी
![]()

कृतीतुन साहित्याला रुजविणारा लेखक साने गुरुजी
आज साने गुरुजींचा स्मृतीदिन..साने गुरुजी म्हटल म्हणजे अस्सल प्रेमाचा, माणुसकीचा सतत वाहणारा झरा..आपली जन्मभूमी सोडून कर्माचा आदर्श देण्यासाठी अमळनेर नगरीत स्थिरावलेलं व्यक्तिमत्त्व ..मायेच्या ऊबेने, संस्काराने मनावर देशसेवेचे व्रत बिंबवलेले मातृहृदय. असंख्य गरिबी पाहत, सोसत पण ध्येय न विसरणारे साने गुरुजी..त्यांच्या सखाराम नगरीत आल्याने अनेक विद्यार्थी घडले. ज्ञानाचा अखंड कुंभ त्यांना गवसला होता. गुरुजींनी शिक्षकाच्या प्रतिमेला स्वच्छतेची झळाळी दिली.
अमळनेरातून त्यांच्या क्रांतीकारी पर्वाला सुरुवात झाली. संस्काराचे दालन खुले करत त्यांनी विद्यार्थी घडविले. विद्यार्थ्यांवर इतके प्रेम की एकवेळ स्व:त उपास करुन उपाशीपोटी झोपणारा गुरुजी..मुलांना कष्टाने भाकरी बनवून देऊन शिक्षणाची तृष्णा भागविणारा गुरुजी आम्हाला मिळाला..गुरूजींनी जातीभेद, उच्चनीच कधी पाळले नाही. त्यांनी अस्पृश्य लोकांना मंदिर खुले करण्यासाठी संघर्ष केला. जीवनाला कलाटणी देणारं साहित्य लिहलं..आपला कारावास सत्कारणी लावला कारण त्यात त्यांच्या साहित्याला पालवी फुटली. माणुसकीची पताका घेऊन विश्वबंधुत्वाची ज्योत पेटविणारा गुरुजी अमळनेरकरांनी पाहिला. त्यांनी रचलेले गीत देशप्रेम व बंधुत्व यांची प्रचिती देतात. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे सुंदर गीत धर्माचा खरा अर्थ पटवुन देते. हा अर्थ जर सर्व जनतेने समजून घेतला तर धर्माच्या नावावर जातीय दंगली होणार नाही. ईस्लाम संस्कृतीवर त्यांचे पुस्तक मुहम्मद पैगंबराचा प्रेम संदेश व करुणा भाकतो. अखिल भारताला त्यांनी जोडण्यासाठी आंतरभारतीची सुंदर कल्पना मांडली. संकुचित विचार भूमीत तणासारखे वाढल्याने मानवतेचे पिक आले नाही. अशा थोर विभूती, साने गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन ..
साहित्यिक
एस.एच. भवरे.

