डब्ल्यूटीसी फायनल
गोलंदाज सुधारले ; फलंदाजांनी नौका डुबवली, आता सबकुछ रामभरोसे !
![]()

डब्ल्यूटीसी फायनल
गोलंदाज सुधारले ; फलंदाजांनी नौका डुबवली, आता सबकुछ रामभरोसे ! डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवशी हिरव्यागार खेळपट्टीच्या मोहजाळात भारतीय कर्णधार व टिम मॅनेजमेंट पुरते फसले. अनुभवी व हुकमी एक्का रविचंद्रन आश्विनला वॉटरबॉय बनवून आपल्याच नशिबावर पाणी फेरून घेतले. आश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगत ऑस्ट्रेलियाने पावणे पाचशे धावांची गंगाजळी जमा केली व त्यामध्ये दोन्ही डाव मिळवून भारतीय फलंदाजांना डुबवून मारण्याची परिस्थिती आता तरी निर्माण करून ठेवली आहे. ग्रीन टॉप पिचवर चेंडू स्पीन घेणार नाही म्हणून चक्क आश्विनला संघाबाहेर बसविण्याचा जुगार भारताच्या चांगलाच अंगलट आला. डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा एक्सपर्ट असलेला आश्विन संघात नव्हता याचा लाभ ऑस्ट्रेलियाचे डावखुरे फलंदाज ट्रेव्हीस हेड (१६३), डेव्हीड वॉर्नर (४६), अॅलेक्स कॅरी (४८) यांनी जोरदारपणे उठवला तर आश्विन घाबरून असणाऱ्या स्टिव्हन स्मिथने १२१ धावा ठोकून दिवाळीच साजरी केली. दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी केवळ १४२ धावात ७ कांगारूंना तंबूचा रस्ता दाखवून पहिल्या दिवसाच्या अपयशाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तोपर्यंत ४६९ धावा करून ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाची गदा मिळविण्यासाठीची हनुमान झेप घेतली होती. पहिल्या दिवसाच्या तुलनेत खेळपट्टीने आपले रंग दाखवायला सुरुवात केल्याने दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून तब्बल बारा गडी बाद झाले. शिवाय रविंद्र जडेजा व नाथन लियानच्या चेंडूने कलाबाजी सुरू केल्याने आश्चिनच्या निवडीवर टिम इंडियाच्या मॅनेजमेंटला जास्तच पश्चाताप होत असणार ! ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या जरी रचली असली तरी आयपीएलमध्ये धावांचे डोंगर उभे करणारे शेळपट भारतीय फलंदाज भारतीय संघालाच नव्हे तर समस्त भारतीय क्रिकेट शौकीनांच्या आशा आकांक्षांवर तिन चोळ पाणी सोडून ' तू चल मै आया ' या गाण्याच्या तालावर तंबूच्या दिशेने परतत होते. शुभमन गिल आयपीएलचा हिरो ठरला जरी असला तरी असली क्रिकेट काय असतं ते त्याला इथे कळले असणार ? चेंडू कुठे जातो हेच त्याला समजले नाही. तीच गत चेतेश्वर पुजाराची शंभरावर कसोटी खेळला, मागील काही दिवस इंग्लंडमध्ये थांबून या विशेष सामन्यासाठी सराव करत होता. पण सर्व काही मातीत घातलं. अनुभवी कोहली केवळ आक्रास्तळेपणा करण्यातच वाकबगार आहे. महत्वाच्या सामन्यात हातचं राखायचं व संघाला वाऱ्यावर सोडून परतायचं. हे मात्र तो ईमाने इतबारे करतो. कर्णधार रोहित शर्मा तर या सामन्याचा खऱ्या अर्थाने खलनायक ठरत आहे. ना संघ निवड ठिक केली, ना गोलंदाजांचा योग्य उपयोग केला, हे कमी की काय म्हणून फलंदाजीत हाराकीरी करून चांगल्या सुरुवातीनंतर बेजबाबरपणे बाद होऊन परतला. रविंद्र जडेज (४८) याने अजिंक्य राहाणे सोबत डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला मात्र लायनच्या फिरकीने त्याचा व भारताचा घात केला. अठरा महिन्यांचा वनवासा नंतर संघात परतलेल्या अजिंक्य राहाणे ( नाबाद २९ ) याने डाव सांभाळला असला तरी भारताचे तळाचे फलंदाज त्याला कशी साथ देतात यावरच सर्व काही अवलंबून आहे. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी अजून ११८ धावांची गरज आहे. भारत जर हि कामगिरी यशस्वी पार पाडू शकला तर या सामन्यात थोडया फार आशा बाळगता येतील. अन्यथा भारताचा पराभव पक्का असेल. मात्र तो आजच झाला तर अतिशयोक्ती मानू नये.
लेखक –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

