“भारतीय संघ प्रबंधनाची नमक हरामी “
फायनलमध्ये पोहचविणाऱ्या आश्विनलाच लावल्या वाटाण्याच्या अक्षदा !
![]()

“भारतीय संघ प्रबंधनाची नमक हरामी “
फायनलमध्ये पोहचविणाऱ्या आश्विनलाच लावल्या वाटाण्याच्या अक्षदा !
सलग दुसऱ्या " विश्वचषक कसोटी अजिंक्यपद " स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टिम इंडियाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल मिळविला. मात्र यावेळीही संघाची निवड करताना पुन्हा एकदा संघ प्रबंधनाने गंभीर चुक केली आणि पहिल्याच दिवशी आयसीसीच्या विजेतेपदाच्या स्वप्ना विषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वांचं लक्ष लागलेल्या सामन्यात हिरव्यागार खेळपट्टीवर भारताने चार जलदगती गोलंदाज व रविंद्र जडेजाच्या रूपात एकच फिरकीपटू संघात निवडला. मात्र सलग दुसऱ्या कसोटी अंतिम फेरीत टिम इंडियाला स्थान मिळवून देणारा जगातला नंबर एकचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला संघाबाहेर ठेवण्याचा आत्मघातकी निर्णय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा व संघ प्रबंधनाने घेतला. त्याचा परिणाम सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताची अवस्था वाईट दिसत आहे. रविचंद्रन आश्विन ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वाधिक ११४ बळी घेणारा जगातला क्रमांक एकचा फिरकी गोलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाजांना सर्वाधीक वेळा बाद करणारा जगातला अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन संघात पाच डावखुरे फलंदाज आहेत. स्टिव्हन स्मिथ सारखा अव्वल फलंदाज आश्विनचं गिऱ्हाईक आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या सर्वच गोलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियन फलंदाज आश्विनलाच सर्वात जास्त घाबरतात. इतकंच नाही तर एखाद्या स्पेशल फलंदाजापेक्षा त्याची फलंदाजीतील कामगिरी सरस आहे. त्याच्या नावावर कसोटीत पाच शतकं आहेत. शिवाय संघासाठी सर्वस्व झोकण्याची तयारी सातत्याने दाखविण्यात तो जराही मागे हटत नसताना संघ प्रबंधन संघ हिताचा कुठलाही निर्णय न घेता अन्यायपूर्वक आश्विन वर अन्याय करत असल्याचे मागील घटनांचा विचार केला तर स्पष्ट जाणवते. ऑस्ट्रेलियाचा असली कर्दनकाळच संघात नसल्याने त्यांच्यावरील तणाव नष्ट झाल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. टिम इंडियाने मागील पाच मालिका ऑस्ट्रेलियाविरूध्द जिंकलेल्या आहेत. त्या सर्वांचा सुत्रधार आश्विनच आहेत. परंतु काहीतरी ढोबळ कारण ठरवून खास करून इंग्लंडमध्ये त्याला कसोटीत न खेळवण्याचा अट्टाहास भारताला महागात पडण्याचे लक्षणं दिसत असून सर्वच देशातील आजी माजी क्रिकेटपटू, क्रिकेट तज्ञ द्रविड अँड कंपनीवर तुटून पडले आहेत. तीन गडी स्वस्तात परतल्यानंतर स्टिव्हन स्मिथ व ट्रेव्हिस हेड जोडीने नाबाद २५१ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेले असले तरी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे विसरून चालणार नाही. भारतीय गोलंदाजांनी अजूनही झालेल्या चुकांचा अभ्यास करून राहिलेले सात कांगारू फलंदाज लवकर गुंडाळले तर भारताला पुन्हा एकदा सामन्यात परतता येऊ शकेल. इतकेच नाही तर प्रत्येक भारतीय फलंदाजाने स्वतःवर कुठलाही मानसिक दबाव न घेत जबाबदारीने मेहनत घेऊन धावा जमविल्या तर भारताचे आव्हान जिवंत ठेवता येईल. भारतीय फलंदाजांनी यापूर्वी अशी चमत्कारीक कामगिरी केली असल्याने हितचितंकांनी निराश होण्याची गरज नाही. मात्र सकारात्मकता सोडता कामे नाही. कसोटी सामना चार डावांचा असल्याने तसेच चौथा डाव भारताला खेळायचा आहे. भारतातल्या सारखी इंग्लंडमध्ये चौथ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी खराब होत नाही. कितीही मोठे आव्हान यशस्वीरित्या पार होऊ शकते. त्यामुळे टिम इंडिया जितके पॉझिटिव्ह खेळेल तितके विजेते पदाकडे जाणे शक्य होईल. अजून वेळ गेली नाही. फक्त आपल्या ताकदीचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे.
लेखक –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

