बहुजन समाजास क्रांतीस्तव दिलेली हाक : क्रांती लहर-साहित्यिक जयसिंग वाघ
![]()


बहुजन समाजास क्रांतीस्तव दिलेली हाक : क्रांती लहर
भारतात बहुजन समाज छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आदर्श मानतो . आम्हा बहुजन समाजास या व अन्य काही महापुरुषांनी आपल्या उद्धाराचा , स्वाभिमानाचा आदर्श दाखवून दिला आहे . देशात जेंव्हा जेंव्हा परिवर्तनाची , पुरोगामित्वाची , संघर्षाची भाषा केली जाते तेंव्हा तेंव्हा या बहुजनवादी महापुरुषांच्या विचारांचे , कार्याचे दाखले दिले जातात . बहुजनवादी विचारधारा देशात नवी क्रांती आणू शकते एवढी तिची ताकत आहे . हाच धागा पकडून अमळनेर येथील युवा कवी अजय भामरे यांनी ' क्रांती लहर ' हा काव्य संग्रह प्रकाशीत केला. त्यांचा हा पाहिलाच काव्यसंग्रह आहे . या संग्रहातील प्रत्येक कविता कवितेच्या प्रत्येक अंगाने जशी परिपूर्ण आहे तशीच ती बहुजनवादी विचारधारेच्या चौकटीत घट्ट बसणारी आहे . कवी भामरे यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवन अत्यंत संघर्षमय राहिलेले आहे . त्या संघर्षातुन त्यांची वैचारिक जडण - घडण होत गेली . प्राथमिक शाळेत मराठी विषयाच्या शिक्षकामुळे त्यांना कविता ऐकण्याची , लिहीण्याची गोडी लागली . यातूनच ते वास्तववादी कविता लिहू लागले . लहानपणीचा संघर्ष त्या वास्तवतेस रोखठोकपण व विद्रोहीपण देत गेला . कवी फुले , शाहू , आंबेडकर या महापुरुषांचे विचार , कार्य अभ्यासत गेले व त्यामुळे ते अधिक प्रभावित होत गेले . या सर्व बाबिंचा परिपाक म्हणजे ' क्रांतीलहर ' हा काव्यसंग्रह होय . कवी आपल्या मनोगतात लिहितातकी , बहुजनांचा इतिहास हा क्रांतीचा आहे . त्यामुळे ' बहुजन समाजातील व्यक्तिने जीवन जगतांना स्वतः पुरते जीवन न जगता आपण समाजाचे देणं
लागतो या उदात्त भावनेने जीवन जगावे ‘. असा उपदेश ते देतात . त्यांचा हा उपदेश सर्वच समाजाकरीता उपयुक्त ठरणारा आहे . कारण प्रत्येक व्यक्तिमध्ये सामाजिकभान , सामाजिक बांधीलकी ही अलिकड कमी कमी होतांना दिसत आहे . कवी बहुजन समाजास आपल्या इतिहासाची जशी जाणीव करुन देतात त्याचप्रमाणे आपला देश हा समता , स्वातंत्र्य , न्याय , बंधुता या तत्वावर आधारित लोकशाही मानणारा देश आहे याचीही जाणीव करुन देतात . आपल्या देशाला भगवान बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची तसेच संत कबीर , संत रविदास , संत तुकाराम या विद्रोही संतांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे , यांच्या चळवळीने हा देश घडला आहे या घटनेचा माझ्यावर परिणाम झाला आहे , त्यातूनच क्रांतीलहर या काव्यसंग्रहाचा जन्म झाला असे ते नमूद करतात . या सर्व बाबिंवरुन कवीची वैचारिक परिपक्वता दिसून येते .
कवी भामरे आजच्या समाजमनाची वास्तवता अतिशय कमी शब्दात पण अतिशय समर्पकपणे मांडतात . ‘ माणूस ‘ या कवितेत ते लिहितात …..
एका मंडळी सांगतो तुम्हाला
खऱ्या अनुभवाची बात
विरोधात जे शिवरायांचे
ते मला विचारतात जात ( २६ )
‘जात ‘ आपल्या समाजाचे एक अभिन्न अंग आहे , जातिवरुन संत , महापुरुष विभागले जातात , आपण एखाद्या महापुरुषाचे नाव घेतले की त्यांची जात आपल्याला लावली जाते , असे असले तरी कवी ‘ क्रांतीचे गीत ‘ गातात , प्रबोधनाची वाट दाखवितात …….
प्रबोधनाची नवी वाट दाऊ ,
क्रांतीमय होउनी जाउ
कर्तव्यापरी जागृत राहू
चला क्रांतीचे गीत गाऊ …(३१ )
क्रांतीचे गीत गात असतांना भारतातील जाती व्यवस्था आपसुकच येते. भारतात जात हा क्रांतीच्या विरोधातील मुख्य अडथळा आहे . या जात बद्दल ते आपल्या ‘ जात ‘ या कवितेत सांगतात ….
एके काळी कृषी संस्कृति होती या देशात
नांदत होती इथे , फक्त माणूस नावाची जात
पृथ्वीतलावर येणाऱ्या जीवाला, शिकका नाही जातीचा
अजय म्हणे बहुजन एक , मूलनिवासी तू या मातीचा ! ….( ३९ )
असे असतांना सुद्धा आम्ही आमची संस्कृति विसरतो व आपापसात भांडत बसतो , हे एक विदारक सत्य कवीने ‘ महामारी ‘ या कवितेत मांडले आहे . त्यात ते म्हणतात ……
बलाढ्य समजती स्वतःला
सदा तयार हे युद्धाला
भोग हे निष्पाप जिवाला
चालला देश रसातळाला …(४९)
असे असले तरी कवी जाती जातीत विभागलेल्या भारतियांमध्ये मैत्री निर्माण करण्याचा संदेश देतात . वेगवेगळ्या जातीत , मानवा मानवात मैत्री निर्माण करतांना कोणी सोबत नसतो याचीही जाणीव कवीला आहे. आपल्या ‘ मानुसकीचेरंग ‘ या कवितेत ते लिहितात …..
मी ही बांधला , मैत्रीचा चंग
पण नसे कोणी सोबती संग
नको असत्य , असू दे सत्य
खोट्याचे का मैत्रित असे सोंग
दोन दिवसात जातील रे होळीचे रंग
माणूसकीचा ओलावा खरा
राहिल आयुष्यभर संग …! (४७)
माणसातील माणूसकी ही महत्वाची असते , त्या वरुनच माणसाची ओळख होते हे आपण लक्षात घ्यावे हा कवीचा संदेश महत्वपूर्ण आहे .
कवी भामरे हे परिवर्तनशील आहेत , प्रबोधनावर त्यांचा विश्वास आहे , बहुजन समाजाला लोकशाही संरक्षणा करीता , भावी पिढीला सक्षम करण्या करीता प्रबोधनाची आज गरज असल्याचे ते आपल्या ‘ बहुजन जागृतीचे गीत , या कवितेत लिहितात की ……..
आज गरज प्रबोधनाची
व्यवस्था परिवर्तनाची
सुरवात झाली क्रांतीची
वेळ बहुजन जागृतीची
लोकशाहीच्या SS रक्षणाकरिता ,
भावी पिढीला सक्षम बनवायचे ……(५५)
भारतातील जात वास्तव मांडून , बहुजनांच्या प्रबोधनातुन क्रांतीची भाषा करुन ते ‘ परिवर्तनाची मशाल ‘ या कवितेत म्हणतात …..
तू जात आहे मावळ्याची
शक्ती संचारू दे संघर्षाची
छाती ठेव पोलादी पहाडाची
नको भीती बाळगू वादळाची …(५४)
याच बरोबर ‘शिक्षण घे , तू संघर्ष कर ‘ यात ते
पशूवानी रे माणसं ही विचित्र
देशाच बदलत नाहीरे चित्र
अत्याचार दिसे इथे ठायी ठायी
तुला चीड़ का रे येत नाही
पुरोगामी तू हो मानवा
परिवर्तनाचा मार्ग धरावा …(२३) असे परखड़ विचार मांडतात .
कवी आपल्या परखड़ विचारधारेतुन माणसाची मानसिकता मांडतात , आज माणसा माणसा मध्ये जिव्हाळा राहिलेला नाही , पवित्र अशी नाती मातिमोल झाली आहेत याचे वर्णन ते ‘ नाती ‘ मध्ये करतात व आवाहन करतात की , …..
आपल्या या वसुंधरेची , आहे पावन माती
लावू समतेची ज्योत , संपुनी टाकू साऱ्या जाती (५८) असेच आवाहन ते ‘ जे निर्माण होतं ते नष्ट होते ‘ या कवितेत करतात …..
डोक्यात तुझ्या गर्वाची हवा
तृष्णने तहानलेल्या मानवा
नियतीचा डाव हा आहे जूना
आतातरी सावधान हो मानवा (६०)
याच परखड़ विचारातून ते आजच्या तरुणाईचे वर्णन ‘ लोकशाहीचा चौथा स्तंभ ‘ मध्ये करतात …
नशेमध्ये बुडाली तरुणाई , अल्पवयीनवर अत्याचार
धक्के खाणारा युवक त्याला मिळेना रोजगार
‘जय जवान’ ‘जय किसान’ वर
भारत देश चालतो खरा
बेईमान झाली माणसं इथे
सामान्यांचा होइ कोंडमारा …..(६२)
सर्वसामान्य कार्यकर्ता आज कसा वागत आहे या विषई कवी तेवढ्याच परखडपणे आपले मत नोंदवितात . ‘शिक्षण घे, तू संघर्ष कर ‘ या कवितेत ते लिहितात ……..
डझनभर पुढारी इथे झाले
दीड दमड़ीत विकले गेले
अन्यायाकड़े दुर्लक्ष केले
समाजाचे बघ तुकडे झाले ….(२३) असेच निरीक्षण ते ‘ खेद ‘ मध्ये नोंदवितात त्यात ते लिहितात …..
आज इथे हा अनुयायी
पुनः गुलाम झाला
सलाम करू लागला
या चमचा युगाला …..(२२)
कवी अजय भामरे यांनी आपल्या या काव्यसंग्रहात महापुरुषां बरोबरच आई , बाप , शेती , महामारी , निसर्ग , संगीत अश्या अनेक विषयांवर लेखन केले आहे . त्यांचा हा क्रांतीलहर बहुजन समाजात क्रांतीची लहर नक्कीच निर्माण करेल .या काव्यसंग्रहास प्रसिद्ध साहित्तीक शुक्राचार्य गायकवाड यांनी प्रस्तावना दिली आहे , मिलिंद निकम यांनी आकर्षक मुखपृष्ठ तयार केले असून जळगावच्या प्रशांत पब्लिकेशन्स ने प्रकाशित केले आहे .
समीक्षक जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक , जळगाव संपर्क ९८८१९२८८८१

