1 min read

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.
(जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन)

Loading

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.
(जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन)

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या माहे मार्च व एप्रिल २०२३चे वेतन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक विवंचनेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. घरातील आजारपण, गृह कर्ज हप्ते, एलआयसी हप्ते अशा विविध समस्या असताना वेळेवर हप्ते न भरल्यास हकनाहक आर्थिक भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे. नगरपालिका संचलित डी.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ, मुन्सीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर, न.पा.संचलित आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा, नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या चारही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन नियमित मिळत नसल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेद्वारा माध्यमिक वेतन पथक कार्यालयात वारंवार संपर्क साधला असता, एक कर्मचारी पुणे येथे गेलेला आहे, वेतनाची तरतूद आज होईल -उद्या होईल असे आश्वासन वेतन पथकाद्वारा दिले जात आहे. जिल्ह्यातील इतर खाजगी संस्थांमधील शिक्षकांचे वेतन नियमित होत असताना केवळ नगरपालिका संचलित शिक्षकांच्या बाबतच असा दुजाभाव का असा प्रश्न शिक्षकांद्वारा विचारला जात आहे.
वरील चारही उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी लवकरात लवकर फोडून गेल्या दोन महिन्यापासून रखडलेले वेतन त्वरित अदा करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागेल असा इशारा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा.सुनील सोनार, उपाध्यक्ष प्रा.डॉ.अतुल इंगळे, जेष्ठ मार्गदर्शकद्वय प्रा. डी. डी.पाटील, प्रा.सुनील गरुड, कार्याध्यक्षद्वय प्रा.सुनील पाटील, प्रा.शैलेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *