पत्रकारांची ‘गोची’ राज ठाकरेंच्या लक्षात आली आणि त्यांनी ती बोलून दाखविली
![]()
पत्रकारांची ‘गोची’ राज ठाकरेंच्या लक्षात आली आणि त्यांनी ती बोलून दाखविली
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून राज ठाकरे यांचे आभार

मुंबई- आम्ही नेहमी सांगत असतो, “पत्रकारांच्या, संपादकांच्या हाती आता काही उरले नाही.. त्यांना मालकांच्या तालावर नाचावे लागते जनतेच्या शिव्या मात्र मालकांना नाही तर पत्रकारांना खाव्या लागतात” चौथा स्तंभ आता पत्रकारांच्या हाती राहिला नसून तो धनदांडग्या उद्योगपतींच्या हाती गेला आहे.. देशातील ९० टक्के मिडिया २५ उद्योगपतींच्या हाती एकवटलाय.. माध्यमांची ही एकाधिकारशाही लोकशाहीसाठी मोठा धोका आहे.. हा धोका देखील आम्ही सातत्यानं अधोरेखीत करीत आलो आहोत.. पत्रकारांची ही ‘गोची’ राज ठाकरे यांच्या बरोबर लक्षात आली आणि त्यांनी ती स्पष्टपणे बोलून देखील दाखविली त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
” तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोकऱ्या टिकविण्यासाठी पत्रकारांना sacrifice करावं लागतंय” असं मत राज ठाकरे यांनी काल ‘लोकमत’च्या मुलाखतीत व्यक्त केलंय. खा. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी ही मुलाखत घेतली होती .. ” माध्यमं निष्पक्ष राहिली नाहीत का”? असा प्रश्न त्यांना विचारला गेला होता.. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिलं.. राज ठाकरे पुढं असंही म्हणाले की,” ‘एनडीटीव्ही’ ही शेवटची आशा होती मात्र ती देखील आता संपली आहे”

