1 min read

अमळनेरचा यात्रोत्सव म्हणजे आनंदोत्सव

Loading

👉अमळनेरचा यात्रोत्सव म्हणजे आनंदोत्सव 👈

श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थान आणि गादीवरचे महाराज यांच्याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच अत्यंत आदर वाटत आला आहे.त्याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण संत परंपरेविषयी कुतुहलही वाटत असते.श्री सखाराम महाराज यात्रोत्सव म्हणजे परिसरातील नागरिकांनी आनंदाची पर्वणीच असते.वैशाख शु|| ३ म्हणजे अक्षय्य तृतीयेला यात्रोत्सवाची मुहूर्तमेढ होते.या दिवशी वाळवंटात श्री सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोपण होते व यात्रेला सुरुवात होते.वैशाख शु|| १० रोजी श्री सखाराम महाराज यांचे एक शिष्य श्री शाहू महाराज बेलापूरकर यांना महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितले की,”वैशाख शुद्ध वारीला पंढरपूर ऐवजी अमळनेर येथे जावे.” त्याप्रमाणे या दिवशी सकाळी ८वाजता श्री बेलापूरकर महाराजांचे अमळनेरात आगमन होते.त्यांचे स्वागत करुन त्यांची मिरवणूक काढून समाधीपर्यंत आणतात.त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष श्री पांडुरंग अमळनेरला येतात ही भावना परंपरागत चालत आलेली आहे.वैशाख शु|| ११ रोजी सायंकाळी ६ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरूवात होते.दोन लाकडी घोडे, सारथ्य करणारा अर्जुनाची लाकडी प्रतिमा व भव्य रथ हे सजविलेले असतात.भरजरी पोषाख व सुवर्ण अलंकार घातलेली,हाती चांदीचा धनुष्यबाण धारण केलेली श्री लालजीची मूर्ती रथात ठेवल्यानंतर रथाची विधिवत पूजा झाल्यावर शृंगारलेल्या रथाची मिरवणूक पहाटे ५ वाजेपर्यंत वाडीजवळ परत येते.यावेळी वाळवंटात फटाक्यांची आतषबाजी होते.वैशाख शु|| १२ रोजी अंबॠषीच्या टेकडीवर जाऊन आल्यानंतर वाळवंटात खिरापतीचे भजन होते व खिरापत वाटली जाते.वैशाख शु||१३ रोजी गरुड, हनुमंत यांच्या मूर्तीची वाहन मिरवणूक वाडीपासून निघून या मूर्ती श्री सखाराम महाराज यांच्या समाधीवर ठेवतात.पुढील यात्राकाळात या मूर्ती तिथेच असतात.
वैशाख शु||१४ रोजी श्री सखाराम महाराजांची पुण्यतिथी रात्री मोठ्या प्रमाणात साजरी करतात.यावेळी पुरण व तळलेल्या वड्याचा प्रसाद भोजनानंतर वाटला जातो.वैशाख शु||१५ रोजी पालखी सोहळा असतो.हा दिवस महत्त्वाचा मानतात.दोन्ही खानदेशातील लाखो भाविक या उत्सवात सहभागी होतात.भरजरी पोषाख केलेली, विविध अलंकारांनी नटलेली,हाती चांदीची ढाल तलवार घेतलेली श्री लालजीची मूर्ती पालखीत विराजमान होते.पालखीच्या मागे मेणा असतो,त्यात श्री सखाराम महाराज यांच्या पादुका असतात.मिरवणुकीत अनेक दिंड्या, लेझीम पथके,सन्ई चौघडा,शृंगारलेले अश्व,निरनिराळी बॅन्ड पथके सहभागी होतात.दशमी ते पौर्णिमा या काळात वाडीत व समाधी पुढे भागवत वाचन,भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम अखंड सुरू असतात.वैशाख व||१ रोजी दुपारी श्री सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर श्री बेलापूरकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन यात्रोत्सवाची सांगता होते.ही परंपरा शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे, म्हणूनच अमळनेर ही श्री सखाराम महाराजांची पुण्यभूमी व प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाते.
श्री सखाराम महाराज यांच्या गादीची अत्यंत खडतर आचारधर्म असलेली धुरा श्री प्रसाद महाराज यांनी आपल्या खांद्यावर घेतली, त्या घटनेला २३जुलै २०२३ रोजी ३६ वर्षे पूर्ण होतील.या कालावधीत त्यांनी पूर्वपरंपरेनुसार चालत आलेले सर्व नियम,धर्म उत्तम प्रकारे सांभाळले आहेत.त्याबरोबरच नवीन कालानुसार त्यात अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत.त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.शेवटी सांगावे असे वाटते-

“मागणे ते एक तुजप्रती आहे| देशील तरी पाहे पांडुरंगा ||
या संतासी निरवी हेचि मज देई| आणिक दुजे काही न मागे तुज||
तुका म्हणे आता उदार तू होई|मज ठेवी पायी संताचिया ||

सौ.वसुंधरा दशरथ लांडगे
संचालिका अर्बन बँक अमळनेर
विश्वस्त खा.शि.मंडळ अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *